लेख-समिक्षण

हादरवणाऱ्या ‌‘फाईल्स‌’

अमेरिकेत सध्या जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडल गाजते आहे. या प्रकरणातील गोपनीय फाइल्स सार्वजनिक झाल्याने जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांत खळबळ माजली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे समोर येत आहेत. या फाइल्समध्ये जगातील नामवंत उद्योगपती, राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्तींचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. या फाईल्स जाहीर झाल्यानंतर अमेरिकन सरकारला काही महत्त्वाच्या बाबींवर खुलासा करावा लागणार आहे. कागदपत्रातील कोणते भाग ब्लॅकआऊट करण्यात आले आहेत आणि त्यामागचे कारण काय ते स्पष्ट करावे लागणार आहे. तसेच कोणती माहिती जनतेसमोर आणली गेली आणि कोणती माहिती अजूनही गोपनीय ठेवण्यात आली आहे, तेही सांगावे लागणार आहे.
सरकारला या प्रकरणाशी संबंधित सर्व सरकारी अधिकारी आणि राजकीयदृष्ट्‌‍या प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर करावी लागेल. कायद्यानुसार, फाइल्स प्रसिद्ध झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत ही सर्व माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक आहे. या प्रकरणाशी संबंधित हजारो पानांची कागदपत्रे, सुमारे 95 हजार फोटो, आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड आणि इतर महत्त्वाचे पुरावे या फाइल्समध्ये आहेत. अमेरिकेच्या संसदेतील हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या डेमोक्रॅट सदस्यांनी 68 नवीन फोटो जाहीर केले. या फोटोमध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस्‌‍, गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन, चित्रपट दिग्दर्शक बुडी ॲलन, तत्वज्ञ नोम चॉम्स्की आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव बॅनन यांच्यासह पाच मोठ्या व्यक्तींची नावे आहेत.
या प्रकरणाची सुरुवात 2005 मध्ये फ्लोरिडामध्ये झाली. एका 14 वर्षाच्या मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्या म्हणण्यानुसार, एपस्टीनने, मसाजच्या नावाखाली तिच्या मुलीला आपल्या आलिशान घरात बोलावले आणि तिथे तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. हे एकच प्रकरण नव्हते. पुढील तपासात सुमारे 50 अल्पवयीन मुलींनी एपस्टीनविरोधात तक्रारी केल्याचे आढळून आले. एपस्टीनच्या मॅनहॅटन आणि पाम बीच येथील आलिशान व्हिला आणि खासगी जेट ‌‘लोलिता एक्स्प्रेस‌’ यांचा या गुन्ह्यासाठी वापर केल्याचे दिसून आले आहे. एपस्टीन प्रकरणाशी संबंधित अनेक कागदपत्रे याआधीच समोर आली आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने आणि एफबीआयने काही गोपनीय फाइल्स प्रसिद्ध केल्या होत्या. एपस्टीन मुलींना पैशाचे, दागिन्यांचे आमिष दाखवत असे आणि धमक्याही देत असे. या सर्व प्रकारात त्याची मैत्रीण गिस्लोन मॅक्सवेल त्याला मदत करत होती.
अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन संबंधित बाललैंगिक गुन्ह्यासंबंधीची काही कागदपत्रे शुक्रवारी प्रसिद्ध केली. ती खुली करताना राजकारण केल्याचा आरोप होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची छायाचित्रे कमी प्रमाणात उघड केल्याचा दावा केला जात आहे. पहिल्या टप्प्यात प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती, तपासाची कागदपत्रे, फोन कॉल, मुलाखती यांचा समावेश आहे. न्याय विभागाने कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव लपविले जात नसल्याचे म्हटले आहे. कागदपत्रांमध्ये ट्रम्प, क्लिंटन, ॲन्ड्यू माऊंटबॅटन – विंडसर, डायना रॉस, मिक जॅगर, मायकेल जॅक्सन, ख्रिस टकर यांच्या नावांचा उल्लेख आहे.
एपस्टीन हा अतिशय विकृत माणूस होता. त्याने केवळ बाललैंगिक शोषण केले नाही तर त्याने जगभरातील धनाढ्य लोकांना लहान मुली पुरवल्या. अनेक वर्षेत्याचा हा धंदा सुरू होता. त्याचे स्वतःच्या मालकीचे एक बेट देखील होते. लैंगिक शोषण होत असताना त्याचे त्याने शूटिंग केले होते. या शूटिंगच्या जोरावर त्याने अनेक कामे करून घेतली. एपस्टीनचे जाळे अत्यंत सुरक्षित असे होते. अल्पवयीन मुलींना पाम बीच, न्यूयॉर्क आणि खासगी बेटावर बोलावले जायचे. मुलींना मॉडेलिंग अथवा मसाजच्या नोकरीचे आमिष दाखवले जायचे. मसाजपासून सुरू झालेले किळसवाणे कृत्य प्रत्यक्षात लैंगिक शोषणापर्यंत जायचे तेव्हा त्या मुलींना दुसरा पर्याय उरलेला नसायचा.
एपस्टीन फाइल्समध्ये 300 जीबी पेक्षा जास्त डेटा आहे. त्यात लक्षावधी ई-मेल्स, फोटो आणि व्हीडीओ आहेत. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी अमेरिकेत भारताचे राजदूत होते तेव्हा पाच-सहा वेळा त्यांचे नाव या फाईलमध्ये आले होते. माजी खासदार आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचे नावही फाईलमध्ये आहे. ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव बॅनन यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घालून देण्याची विनंती एपस्टीन यांना केली होती. अमेरिकेत बाललैंगिक शोषण हा मोठा गुन्हा आहे. भारतात देखील तो मोठा गुन्हा आहे. एपस्टीन हा इस्रायलचा गुप्तहेर होता असेही सांगितले जाते. त्याने ऑगस्ट 2019 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली तर त्याचा खून झाल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. एपस्टीन याच्याकडे बड्या लोकांना गुंतवून त्यांना ब्लॅकमेल करायचे काम देण्यात आले होते. एपस्टीन याच्या कारनाम्याचे मोठे परिणाम भारतीय राजकारणावर होऊ शकतात. एपस्टीन फाईलमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांचे म्हणणे आहे की, आमच्याशी संपर्क साधण्यात आला होता परंतु त्यात आम्ही सामील झालो नाही. एपस्टीन हा ‌’दलाल‌’ छाप उद्योगपती होता. ‌’राजकारण्यांची सर्व सोय पाहणारा‌’ अशी त्याची ख्याती होती. संस्कार, नीतिमत्ता, चारित्र्य, धर्म यावर प्रवचने झोडणाऱ्यांचे पुरते वस्त्रहरण एपस्टीन फाइल्समध्ये झाले आहे. भारतातील किती राजकीय नेत्यांना या फाइल्सचा फटका बसेल ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. या फाईल्समधील माहिती जगाला हादरवणारी असेल यात शंका नाही.- विनायक सरदेसाई

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …