नोकरदार असो की गृहिणी, स्रियांना स्वयंपाकघरात उभं राहून काम करणं चुकलेलं नाही. पण घर, नोकरी, मुलं, जबाबदाऱ्या सगळं उत्तम प्रकारे सांभाळताना, या उभं राहून काम करण्यामुळे उद्भवणारी पायदुखी, थकवा, गुडघेदुखी हे नेहमीचेच झालेले त्रास स्रियांना चुकलेले नाहीत. वय वाढल्यावर हा त्रास आणखी वाढतो. पण यावर काही सोप्या पण प्रभावी उपायांनी महिलांना आराम मिळू शकतो. हे उपाय कोणताही विशेष खर्च किंवा शारीरिक मेहनत न घेता घरच्या घरी सहज करता येतात.
© घरात असणारा छोटा रबरचा चेंडू घ्या. एका खुर्चीवर बसून चेंडू पायाखाली ठेवावा व तो पुढे-मागे फिरवावा. यामुळे पायांतील ताण कमी होतो. नसा सैलावतात आणि ताजेतवाने वाटते.
© दररोज काही वेळ पायाच्या बोटांवर चालण्याचा प्रयत्न करा. टाच जमिनीपासून थोडी वर ठेवावी. हे चालणं पायातील स्नायूंना व्यायाम मिळवून देतं. बोटांतील वेदना हळूहळू कमी होतात.
© एक सुती रुमाल जमिनीवर टाका. त्यावर उभं राहून पायाच्या बोटांनी रुमाल पकडून सोडण्याचा सराव करा. दिवसातून दोन-तीन वेळा हा उपाय केल्यास बोटांवरील ताण कमी होतो. दीर्घकाळ उभं राहिल्याने आलेला ताण हळूहळू कमी होतो.
© पायाच्या बोटांनंतर टाचांवर चालण्याचा थोडा सराव करा. हे उलटं चालणं वाटलं तरी उपयोगी आहे. टाचांवरचा दबाव कमी होतो आणि दुखत असल्यास बरे वाटते.
© झोपताना किंवा बसल्यावर पाय सरळ पसरवून, हलके हलवावेत. थकलेले पाय शिथील होतात. रक्ताभिसरण सुधारते आणि पायांना विश्र्ांती मिळते.
© आजकाल बाजारात विविध प्रकारची पायांची मालिश करणारी उपकरणं मिळतात. ती उपयोगात आणा.
पायांची मालिश करणारी विविध उपकरणं आज बाजारात सहज उपलब्ध असून, ती घरच्या घरी वापरण्यास सोपी आणि आरोग्यास उपयुक्त आहेत. अनेक महिला, विशेषतः दिवसभर उभं राहून स्वयंपाक किंवा इतर कामं करणाऱ्या गृहिणी, यांना पायांमध्ये थकवा, वेदना, सूज किंवा ताण जाणवतो. अशावेळी ही उपकरणं खूप उपयुक्त ठरतात.
सर्वात साधं आणि पारंपरिक साधन म्हणजे लाकडी किंवा प्लास्टिकचा पाय रोलर. हे छोटे आणि हलकं उपकरण असतं. ते जमिनीवर ठेवून त्यावर पाय पुढे-पुढे फिरवायचा. यामुळे पंजामध्ये, बोटांमध्ये आणि टाचांमध्ये आलेला ताण कमी होतो. काहीजण अशा रोलरमध्ये बारीक मसाज करणाऱ्या गाठी असलेल्या रचना वापरतात, ज्यामुळे विशिष्ट बिंदूंवर दाब पडून रक्ताभिसरण सुधारतं.
त्यापेक्षा थोडं आधुनिक आणि आरामदायी साधन म्हणजे इलेक्ट्रिक फुट मसाजर. हे विजेवर चालणारे यंत्र असून त्यात कंपन, दाब, उष्णता अशा अनेक सुविधा असतात. यामुळे पायांच्या खोल मांसपेशींवर परिणाम होतो. शिआत्सू तंत्र वापरणाऱ्या मसाजर्समध्ये फिरणारे बॉल्स किंवा नोड्स असतात जे पायाच्या विशिष्ट भागांवर दाब टाकतात. यामुळे दिवसभराचा थकवा कमी होतो आणि झोपही चांगली लागते.
फुट स्पा मशीन हे आणखी एक प्रभावी उपकरण आहे. यात पाणी भरून त्यात पाय ठेवायचे असतात. पाण्याला गरम करण्याची सुविधा, बबल मसाज, वायब्रेशन अशा विविध पर्यायांमुळे पायांना विशेष विश्र्ांती मिळते.
दररोज या क्रिया करण्यासाठी फक्त 15-20 मिनिटे द्या आणि पायदुखीच्या समस्येला निरोप द्या. शरीर थकलेलं असेल तर मनही थकते. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र