जीवाश्म इंधनाच्या (फॉसिल फ्युएल) बेसुमार वापरामुळे निर्माण झालेल्या हवामान संकटामुळे आज संपूर्ण जगाला स्वच्छ इंधनाची निकड भासू लागली आहे. मात्र, या दिशेने होणारे प्रयत्न अत्यंत अपुरे असल्याचे दिसून येते. स्वच्छ इंधन आणि अक्षय ऊर्जेबाबत (रिन्यूएबल एनर्जी) कागदावर अनेक योजना आखल्या जात असल्या तरी, त्यांच्या अंमलबजावणीचा वेग कमालीचा संथ आहे. आजही जगाचा कल जीवाश्म इंधनावरच अधिक असल्याने, हवामान बदलाबाबत जागतिक स्तरावर केवळ चिंता व्यक्त केली जात आहे, परंतु त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी गांभीर्याने काम होताना दिसत नाही.
जागतिक आर्थिक मंचाने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात या परिस्थितीवर स्पष्ट बोट ठेवले आहे. स्वच्छ इंधनाशी संबंधित निर्धारित उद्दिष्टे गाठण्यासाठी 2030 पर्यंत या क्षेत्रातील गुंतवणूक चार पटीने वाढवून ती वार्षिक 100 अब्ज डॉलरपर्यंत नेणे आवश्यक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जर अशा इशारावजा सूचनांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर भविष्यात त्याचे अत्यंत भीषण परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागतील, यात शंका नाही.
सध्याच्या घडीला जगभरात स्वच्छ इंधनावर वर्षाला केवळ 25 अब्ज डॉलर खर्च केले जात आहेत. स्वच्छ इंधनाबाबतचे दावे मोठ्या प्रमाणावर केले जात असले तरी, या प्रकल्पांसाठी लागणारा प्रचंड खर्च पाहून अनेक देश यातून माघार घेताना दिसतात. विशेषतः सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करणारे विकसित देश स्वतःच्या जबाबदारीतून अंग काढून घेत आहेत आणि विकसनशील व लहान देशांवर उत्सर्जन कपातीसाठी नाहक दबाव टाकत आहेत. अशा प्रवृत्तीमुळे स्वच्छ इंधनासाठीच्या जागतिक सहकार्याचे उद्दिष्ट मागे पडत चालले आहे.
हवामान संकटावर मात करण्यासाठी स्वच्छ इंधन हाच एकमेव प्रभावी मार्ग ठरू शकतो. उद्योगधंदे आणि वाहतूक क्षेत्रातून होणारे विषारी वायूंचे उत्सर्जन हळूहळू कमी करण्यासाठी या इंधनाचा वापर अपरिहार्य आहे. त्यामुळे स्वच्छ इंधनाचे ध्येय केवळ कागदावर न ठेवता ते जमिनीवर उतरवण्यासाठी केवळ विश्वासार्ह प्रकल्प आखणे पुरेसे नाही, तर त्यांची कठोर अंमलबजावणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
जीवाश्म इंधनाच्या सततच्या वापरामुळे जगभरात वायू प्रदूषणाची समस्या जीवघेणी ठरत आहे. शहरांचा श्वास कोंडत असून मानवी आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. या संकटातून सुटका करून घेण्यासाठी स्वच्छ इंधन आणि अक्षय ऊर्जा हेच सर्वोत्तम आणि एकमेव पर्याय आहेत. आता वेळ केवळ चर्चा करण्याची नाही, तर भविष्यातील पिढीसाठी एक सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त जग निर्माण करण्यासाठी गुंतवणुकीचा आणि अंमलबजावणीचा वेग वाढवण्याची आहे. -राजीव मुळ्ये, ज्येष्ठ पत्रकार
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र