सार्वजनिक कार्यक्रमात गायक किंवा गायिकांनी नटून थटून गाणे म्हणणे ठीक आहे. परंतु केवळ प्रेक्षकांवर छाप पाडण्याच्या प्रवृत्तीने गायकांच्या प्रतिभेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्याच्या काळात नवोदित गायक किंवा गायिका या आवाजापेक्षा ग्लॅमरसतेमुळे अधिक चर्चेत राहताना दिसतात. याउलट जुन्या जमान्यातील गायक आणि गायिकांचा भर साधेपणावर असायचा आणि त्यांचे सर्व लक्ष मेहनतीकडे, सरावाकडे असायचे.गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना तर या चर्चेपासून खूपच लांब ठेवले पाहिजे. कारण त्यांच्या वागण्यातून नेहमीच सरस्वतीची अनुभूती आलेली आहे. तत्कालिन काळातील सुमन कल्याणपूर, शमशाद बेगम, गीता दत्त आणि अलिकडच्या काळातील कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, श्रेया घोषाळ आदी गायिकांनी देखील साधेपणातून सभ्यता जपली. – सोनम परब
——
बॉलिवुडपटात एकाहून एक हीट गाणे देणारी सुनीधी चव्हाण ही बर्याच काळापासून एक वेगळ्याच मुद्यावरून चर्चेत राहिली आहे. वयाच्या 41 वर्षांत देखील तिने स्वत:चा ग्लॅमरस लुक कायम ठेवला आहे. तिला खूप गाणी मिळाली नाहीत, परंतु ती वैयक्तिक आयुष्य आणि लुकवरूनच अधिक चर्चेत राहिली. 2000 च्या दशकांतील आघाडीची गायिका सुनीधीला चांगली लोकप्रियता मिळाली आणि तीने काही अंशी साधेपणा टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र आताच्या गायिका आवाजाऐवजी ग्लॅमरला फॉलो करण्यात धन्यता मानत आहेत. या कारणांमुळेच उदयोन्मुख कलाकार गायक कमी ग्लॅमर गर्ल किंवा बॉय म्हणून ओळखले जावू लागले आहेत.
लुक आणि पेहरावावर भर
एका मुलाखतीत गायिका नेहा कक्कड खूपच ग्लॅमरस दिसली. कारण आवाजापेक्षा ती राहणीमान, बोलण्याची शैली याकडे अधिक लक्ष देत होती. ती बर्याच काळापासून एकाच म्युझिक कंपनीशी बांधील राहिलेली आहे. तिच्या लोकप्रियतेचे मुळ कारण म्हणजे रिमिक्स गाणे. म्हणून ती आव्हानात्मक गाण्यापासून दूर राहते. तरीही ती चर्चेत राहिली. तिचा जबरदस्त लुक प्रेक्षकांवर छाप पाडणारा आहे. काहीवेळा तो अतिरेक वाटतो. अर्थात नटून थटून तयार होत सार्वजनिक कार्यक्रमात गाणे सादर करणे चुकीचे नाही. परंतु केवळ आपल्या लुकच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाते तेव्हा काहीतरी गडबड आहे, असे दिसते. या स्पर्धेत नेहा कक्कड, आदिती कक्कड, पलक मुच्छल यांच्याशिवाय भानुशाली, हर्षदीप कौर, तुलसी, नीती मोहन, कनिका कपूर, मोनाली ठाकूर, श्यामली, भूमि त्रिवेदी, ज्योनिता गांधी आदीं गायिकांची मोठी यादीच आहे. या लोकांनी आवाजापेक्षा लुकवरच अधिक मेहनत घेतली आहे.
लूक महत्त्वाचा असतो
सध्याच्या गायिकांचा लुक पाहिला तर जुन्या जमान्यातील गायिका आठवतात. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना तर या चर्चेपासून खूपच लांब ठेवले पाहिजे. कारण त्यांच्या वागण्यातून नेहमीच सरस्वतीची अनुभूती आलेली आहे. तत्कालिन काळातील सुमन कल्याणपूर, शमशाद बेगम, गीता दत्त आणि अलिकडच्या काळातील कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, श्रेया घोषाळ आदी गायिकांनी देखील साधेपणातून सभ्यता जपली. त्याचवेळी नुरजहाँ, सुरैय्या आणि त्यानंतरच्या काही कलाकारांना नटण्याची हौस होती. लता मंगेशकर यांची भगिनी आशा भोसले यांचा देखील यात समावेश करावा लागेल. परंतु त्यांच्या आवाजाने या सर्व गोष्टींवर मात केली. पहाडी आवाजाच्या गायिका उषा उत्थुप या आजही साडीत नटूनथटून वावरतात. केसात गजरा, कपाळावर मोठे कुंकू, रेशीम साडी घालून त्या स्टेजवर हुकुमत गाजवतात. पण त्यांच्या आवाजाने लोकांची मने जिंकली. एकप्रकारे त्यांनी आपल्या पेहरावातून भारतीय संस्कृती सातासमुद्रापार नेली आहे.
ग्लॅमरचा काळ
सध्या नव्या पिढीतील गायिका मात्र ग्लॅमरच्या पातळीवर खुपच पुढे आहेत. नव्या गायिका मोनाली ठाकूरचे उदाहरण घ्या. ती टिव्हीवर अनेकदा चमकली आणि चित्रपटातूनही झळकली. तिच्या मते, मी संगीतामध्ये करियर करु इच्छिते.पण लुकमुळे मला कामही मिळतात. संधी मिळाली तर त्यात वाईट काय. दुसरीकडे गायिका पलक मुच्छल म्हणते, सध्याचा ग्लॅमरचा काळ आहे आणि शो वर्ल्डमध्ये या गोष्टीचाच बोलबाला राहतो. यासंदर्भात सुनीधी चव्हाण म्हणते, लता मंगेशकर असो किंवा जुन्या काळातील कोणत्याही गायिका असो, त्यांचा ग्लॅमर हा केवळ आवाज असायचा. त्यांनी आपल्या आवाजात बराच काळ जीवंतपणा ठेवला आणि ते एकप्रकारचे गुढच म्हणावे लागेल. परंतु जेव्हा आमच्यापिढीतील गायिका सराव करतात तेव्हा आमचे लक्ष स्टाईल मेंन्टेंन करण्यावरच अधिक असते.
पडद्यावरील गायिकांचा आवाज
चित्रपट इतिहास पाहिला तर अनेक नायिकांचा आवाज सुरेल राहिला आहे. पण त्यांच्या आवाजाचा वापर एखाद्या कलाकाराच्या पार्श्वगायनासाठी केला नाही. अभिनेत्री मीनाकुमारीच्या आवाजात खूपच माधुर्य होते. परंतु त्यांनी कधीही गाणे म्हणण्यात रस दाखविला नाही. त्यानंतरच्या काळात देखील अनेक नायिकांचा आवाज चांगला राहिलेला आहे. परंतु त्यांनी स्वत:ला पडद्यावरच काम करणे सोयीचे वाटले. उदाहरण घ्यायचे असेल तर रेखा आणि त्यानंतर प्रियांका चोप्राचा आवाज देखील चांगला होता. नव्या काळातील परिणिती चोप्रा, श्रद्धा कपूर, आलिया भट्टचा देखील आवाज चांगला आहे. त्यांनी काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. परंतु पुढे त्यांची गाडी सरकली नाही.
हा डोक्यातील विचार
एकाहून एक हीट गाणे देणारी श्रेया घोषाळ म्हणते, गायन आणि ग्लॅमरला एकाचवेळी जोडणे ही संगीत क्षेत्रात गल्लाभरू तत्त्व बाळगणार्यांच्या डोक्यातून निघालेली सुपीक कल्पना आहे. भारतीय संगीताला समृद्ध परंपरा राहिलेली आहे. एखाद्या गायिकेचे गाणे तिच्या म्युझिक व्हिडिओच्या कारणामुळे प्रेक्षकांच्या तोंडी येत असेल तर याचा अर्थ ती सर्वोत्तम गायिका आहे, असे म्हणता येणार नाही. या बाबतीत लताजी या सर्वांसाठी नेहमीच आदर्श राहतील. असेच मत अन्य गायिकांनी देखील मांडले आहे. कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, साधना सरगम, मधुश्री, रुची शर्मा यासारख्या बहुतांश गायिकांचा इथे उल्लेख करता येईल.
गाण्यातील श्रद्धा हरपली
संगीत क्षेत्रात ग्लॅमरला दिले जाणारे महत्त्व पाहता गाण्यामधील सात्विक भाव कमी झाला आहे.गीता दत्त, लता मंगेशकर, आशा भोसले आदी जुन्या जमान्यातील महान गायिकांच्या परंपरेत आता नव्याने कोणाचा समावेश करावा, असा प्रश्न पडतो. यादरम्यान कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम, अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक यांच्यासारख्या प्रतिभावान गायिका येतात आणि त्यांनी दबदबाही निर्माण केला. परंतु संगीत जगातील राजकारणाने त्यांना मागे ढकलले. चित्रपट संगीत सध्या झगमगटाच्या चक्रव्यूहात अडकलेले आहे. त्यामुळे हे मळभ कधी दूर होईल, याची वाट पाहू.
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र