आजच्या काळात युद्धाचे स्वरूप केवळ सीमा, रणगाडे आणि क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित राहिलेले नाही. डिजिटल रुपात आता एक नवीन आघाडी उघडली गेली असून ती अदृश्य असूनही सातत्याने सक्रिय आहे. या युद्धामध्ये गोळ्यांचा आवाज येत नाही, परंतु त्याचे परिणाम तितकेच विनाशकारी असतात. आता कोणताही देश सीमा ओलांडल्याशिवाय शत्रूची अर्थव्यवस्था, ऊर्जा व्यवस्था किंवा दळणवळण यंत्रणेला थेट लक्ष्य करू शकतो. आधुनिक युद्ध आता दोन समांतर प्रवाहांमध्ये चालते – एक पारंपारिक आणि दुसरे सायबर. पण अनेक वेळा सायबर आघाडी अधिक निर्णायक ठरते.
इराण या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभा असलेले एक गुंतागुंतीचे उदाहरण आहे – कधी हल्ल्याचा बळी, तर कधी प्रतिसादात्मक रणनीतीचा निर्माता. वर्ष 2010 मध्ये ‘स्टक्सनेट’ नावाच्या सायबर आक्रमणाने इराणच्या नतांझ अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य केले होते आणि तिथल्या सेंट्रीफ्यूज मशीनचे गंभीर नुकसान केले होते. ती पहिली अशी घटना होती, जेव्हा एखाद्या सायबर हल्ल्याने थेट भौतिक संरचनेवर परिणाम केला होता. त्या घटनेने सांकेतिक कोड केवळ माहितीचे माध्यम नसून विनाशाचे साधनही बनू शकतो, हे जगाला शिकवले. त्या घटनेनंतर इराणने आपली धोरणात्मक दिशा बदलली आणि सायबर क्षमतेला प्राधान्य देण्यास सुरुवात केली. इराणने वेगाने आपली सायबर संरचना विकसित केली आणि अशा यंत्रणा तयार केल्या, ज्या थेट राज्याशी संबंधित न राहता त्याच्या हिताचे रक्षण करू शकतील. ‘पे-टू-की’ सारख्या भेदक हल्ल्यांच्या माध्यमातून इस्रायली कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले. अलीकडच्या वर्षांत इस्रायलविरुद्धच्या सायबर हल्ल्यांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. ही बाब एका दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे, ज्यामध्ये सायबर हल्ले, मानसिक दबाव आणि आर्थिक अडथळे एकाच वेळी काम करतात. इराणने हे समजून घेतले आहे की डिजिटल आघाडीवरील लढाई कमी खर्चात अधिक प्रभाव पाडू शकते.
अर्थात हा संघर्ष एकतर्फी नाही. इराणला स्वतःलाही अनेक मोठ्या सायबर हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. वर्ष 2021 मध्ये त्याच्या इंधन वितरण यंत्रणेवर झालेल्या सायबर हल्ल्याने संपूर्ण देशातील पेट्रोलचा पुरवठा विस्कळीत केला होता, ज्यामुळे लांबच लांब रांगा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर 2023 मध्ये गॅस स्टेशनचा मोठा हिस्सा ठप्प झाल्याच्या घटनेने हे दाखवून दिले की सायबर हल्ला थेट सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करू शकतो. वर्ष 2024 मध्ये इराणच्या बँकिंग यंत्रणेवर झालेल्या हल्ल्यात अनेक वित्तीय संस्था प्रभावित झाल्या, ज्यामुळे आर्थिक अस्थिरतेचा धोका वाढला. या घटना पुरावा आहेत की सायबर युद्ध आता केवळ धोरणात्मक राहिले नसून सामाजिक आणि आर्थिक संकटही निर्माण करू शकते. वर्ष 2026 पर्यंत पोहोचता पोहोचता हा संघर्ष अधिक जागतिक स्वरूप धारण करून बसला आहे.
इराणशी संबंधित सायबर गटांवर परदेशी कंपन्या, विशेषतः आरोग्य आणि तांत्रिक क्षेत्रांना लक्ष्य केल्याचे आरोप झाले आहेत. या युद्धात सायबर स्पेसची किती मोठी भूमिका आहे, याचे संकेत यूएस सेंट्रल कमांडचे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी देताना म्हटले होते की, आपण समुद्राच्या खोलीपासून अंतराळ आणि सायबर स्पेसपर्यंत इराणवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. दुसरीकडे इराणने स्पष्ट केलेच आहे की जर त्याच्या तेल आणि गॅसशी संबंधित संरचनांवर हल्ला झाला, तर त्या बदल्यात तो अमेरिका आणि त्याच्या प्रादेशिक मित्रराष्ट्रांच्या ऊर्जा प्रणाली, आयटी प्रणाली आणि पाणी शुद्धीकरण सुविधांना लक्ष्य करेल. युरोप आणि अमेरिकेतील अनेक संस्थांनी आपल्या यंत्रणेची सुरक्षा वाढवली आहे, कारण अशा हल्ल्यांचा धोका वाढत आहे. हे स्पष्ट आहे की सायबर युद्ध आता कोणत्याही एका क्षेत्रापुरते किंवा देशापुरते मर्यादित नाही, तर जागतिक पुरवठा साखळी, वित्तीय बाजार आणि सार्वजनिक सेवांना थेट प्रभावित करू शकते.
इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेले ‘सायबर युद्ध’ या संपूर्ण परिस्थितीचे सर्वात अचूक उदाहरण आहे. येथे संघर्ष केवळ जमीन किंवा आकाशापुरता मर्यादित नसून सर्व्हर आणि डेटा केंद्रांपर्यंत पसरला आहे. एकीकडे इराण समर्थित गट ऊर्जा कंपन्या आणि सरकारी यंत्रणांवर हल्ले करत आहेत, तर दुसरीकडे इस्रायलशी संबंधित सायबर मोहिमा इराणचे रेल्वे नेटवर्क, पोलाद उद्योग आणि वित्तीय व्यवस्थेला लक्ष्य करत आहेत. अनेक वेळा हे हल्ले केवळ नुकसान करण्यासाठी नसून धोरणात्मक संदेश देण्यासाठी असतात – की शत्रूची पोहोच तुमच्या प्रणालीच्या आतपर्यंत आहे. सायबर युद्धाचे तांत्रिक स्वरूप समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे. हे युद्ध अनेक टप्प्यांत चालवले जाते – आधी लक्ष्याची ओळख, मग त्याच्या यंत्रणेतील कमकुवतपणाचे विलेषण, त्यानंतर प्रवेशासाठी कपटी संदेश किंवा दुर्भावनापूर्ण कूट संकेतांचा वापर आणि शेवटी यंत्रणेच्या आत नियंत्रण प्रस्थापित करणे. बऱ्याच वेळा ‘रॅन्समवेअर’ सारख्या हल्ल्यांच्या माध्यमातून डेटा ओलीस धरला जातो, तर ‘डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस’ सारख्या हल्ल्यांमुळे एखादी सेवा ठप्प केली जाते. प्रगत हल्ल्यांमध्ये वीज प्रकल्प किंवा पाणीपुरवठा यंत्रणेवरही थेट परिणाम केला जातो. याच कारणामुळे हे युद्ध अदृश्य असूनही अत्यंत क्लिष्ट आणि घातक आहे. एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) या संपूर्ण समीकरणाला अधिक धोकादायक बनवत आहे. सायबर हल्ले आता केवळ मानवी कौशल्यावर अवलंबून नाहीत. एआयच्या मदतीने हल्ले वेगवान, स्वयंचलित आणि अधिक अचूक झाले आहेत. एखाद्या यंत्रणेतील उणिवा शोधणे, कपटी संदेश तयार करणे आणि माहिती चोरणे आता यंत्रांद्वारे संचालित होऊ शकते.
अमेरिका, चीन, रशिया आणि उत्तर कोरिया यांसारख्या देशांनीही सायबर युद्धाला आपल्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग बनवले आहे. निवडणुकांमध्ये हस्तक्षेप, औद्योगिक हेरगिरी आणि डिजिटल तोडफोड आता सामान्य रणनीती बनल्या आहेत. सायबर क्षेत्र हे नवीन भू-राजकीय रणांगण बनले आहे, जिथे शक्तीचे प्रदर्शन उघडपणे नाही तर छुपे हल्ल्यांच्या माध्यमातून होते. भविष्यातील युद्ध सीमांच्या सोबतच आपल्या डेटा, नेटवर्क आणि डिजिटल जीवनाच्या प्रत्येक भागात अस्तित्वात असेल. इराणचे उदाहरण या बदलत्या युगाची चेतावणी आहे की शक्तीचे खरे केंद्र आता दारूगोळा नसून कूट संकेत (कोड) बनत चालले आहे. भविष्यात आपल्या सीमांचे रक्षण ज्याप्रकारे केले जाते, तितक्याच सायबर संरचना मजबुतीने सुरक्षित ठेवू शकतील, तेच देश सुरक्षित राहतील.
पुढचा मार्ग स्पष्ट आहे. देशांना आपल्या सायबर सुरक्षा क्षमतेतील गुंतवणूक वाढवावी लागेल, कुशल तज्ञ तयार करावे लागतील आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करावे लागेल. भारतासाठी देखील ही स्थिती चिंताजनक आहे. डिजिटल इंडिया, ऑनलाईन बँकिंग, यूपीआय आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांनी देशाला तांत्रिकदृष्ट्या मजबूत बनवले आहे, परंतु जोखीम देखील वाढली आहे.
-प्रभात सिन्हा,सायबर तंत्रज्ञान तज्ज्ञ
Check Also
अविवेकाच्या अंधारात श्रद्धेचा बाजार
महाराष्ट्र हा संतांचा, समाजसुधारकांचा आणि क्रांतीकारकांचा देश म्हणून ओळखला जातो. ज्या मातीने देशाला विज्ञानाची कास …
पांचजन्य वृत्तपत्र