लेख-समिक्षण

संसदेत महिला खासदारांचा रुद्रावतार

संसदेत महिला खासदार असण्याकडे दुर्लक्ष करून भाजपचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे यांनी नेहरू-गांधी कुटुंबावर संतापजनक व घाणेरडी वक्तव्ये केली. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी अभूतपूर्व गदारोळ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता बोलणार होते. मात्र, विरोधी पक्षाच्या महिला खासदार पंतप्रधान मोदी यांच्या आसनाजवळ पोहोचल्या. या प्रचंड गदारोळामुळे कामकाज तहकूब झाले आणि यावेळी पंतप्रधानांचे संबोधन टळले. तर, या घटनेनंतर भाजपने विरोधकांवर ‌‘पंतप्रधानांवर हल्ल्‌‍याचा प्रयत्न‌’ केल्याचा आरोप केला.
लोकसभेत गोंधळ आणि निषेधाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार प्रस्तावाला दिलेले उत्तर पुढे ढकलण्यात आले. दुपारी 2 वाजता जेव्हा कामकाज सुरू झाले, तेव्हापासूनच विरोधक विविध मुद्यांवरून आक्रमक झाले होते. भाजपचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे यांनी सहा पुस्तकांचा संदर्भ देऊन नेहरू-गांधी कुटुंबावर संतापजनक वक्तव्ये केली. यावेळी त्यांना सभागृहात महिला खासदार आहे, याचेही भान राहिले नाही. यावेळी तालिका अध्यक्ष संध्या राय सभागृहाच्या पीठासीन अधिकारी होत्या. त्याकडेही निशिकांत दुबे यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी केलेल्या टीकेनंतर वातावरण अधिकच तापले. 5 वाजता जेव्हा पंतप्रधान उत्तरासाठी उभे राहणार होते, तेव्हा विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी सुरू केली. सभापतींनी वारंवार शांत राहण्याचे आवाहन करूनही गदारोळ न थांबल्याने कामकाज तहकूब करावे लागले. कार्यवाही स्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षाचे खासदार बॅनर आणि पोस्टर्स घेऊन ‌‘वेल‌’मध्ये उतरले. काही खासदार ट्रेजरी बेंचच्या (सत्ताधारी बाकांकडे) दिशेने धावले. यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव, मंत्री किरण रिजिजू, अनुराग ठाकूर हे विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले. मंत्री अश्विनी वैष्णव मधात आले नसते तर निशिकांत दुबे यांना काँग्रेसच्या महिला खासदारांनी चोप दिला असता. ट्रेझरी बाकांजवळ निदर्शने सुरू राहिल्याने कामकाज तहकूब करण्यात आले. नंतर, अनेक केंद्रीय मंत्र्यांनी महिला खासदारांना समजावल्यानंतर त्या पांगल्या. तथापि, पंतप्रधानांचे भाषण झाले नाही आणि दिवसाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले की, विरोधी पक्षाच्या खासदारांच्या निषेधामुळे आणि महिला खासदारांनी ट्रेझरी बाकांवर बॅनर घेऊन जाण्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यामुळे अध्यक्षांना कामकाज तहकूब करावे लागले. सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले की, जेव्हा कामकाज स्थगित झाले, तेव्हा विरोधकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. विरोधी पक्षाचे खासदार पंतप्रधान जिथे बसतात, तिथपर्यंत चढून आले होते. विशेषत: महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या खुर्चीचा घेराव केला होता. त्यांचा हावभाव पाहता, त्यांची पंतप्रधानांवर हल्ला करण्याची इच्छा असावी, असे वाटत होते. ज्येष्ठ मंत्र्यांनी विनंती करूनही महिला खासदार मागे हटण्यास तयार नव्हत्या, असेही त्यांनी नमूद केले.
भाजपच्या या आरोपांना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान तेव्हा सभागृहात नव्हतेच. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली होती. आम्ही (ज्योतिमणी, गनीबेन ठाकूर आणि मी) केवळ त्यांना विचारण्यासाठी त्यांच्या बाकांकडे गेलो होतो. आम्हाला येताना पाहून निशिकांत दुबे तिथून पळू लागले, म्हणून आम्ही ‌‘पळतोय, पळतोय‌’ असे म्हणालो. तिथे कोणतीही मारहाण किंवा हल्ल्‌‍याचा प्रयत्न झाला नाही, असे खा. गायकवाड म्हणाल्या.
दुसरीकडे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधानांवर टीका केली. पंतप्रधान मोदी संसदेत येणार नाहीत कारण ते घाबरले आहेत आणि त्यांना सत्याचा सामना करायचा नाही, असे त्यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द वर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते म्हणाले की, आधी म्हटल्याप्रमाणे, पंतप्रधान सभागृहात येणार नाहीत कारण त्यांना सत्याचा सामना करायचा नव्हता. जर पंतप्रधान दुपारी आले असते तर त्यांनी त्यांना एक पुस्तक दिले असते आणि त्यावर चर्चा करण्याची मागणी केली असती.

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …