लेख-समिक्षण

संयम बेपत्ता

आपल्या आईसमोरच नवर्‍याला बदडणार्‍या बायकोचा व्हिडिओ पाहिलात? ‘मी अजमल कसाबचा भाऊ बोलतोय,’ असं सांगून पोलीस मुख्यालय उडवून देणार्‍या मद्यपी सुरक्षा रक्षकाची बातमी वाचलीत? हैदराबादजवळच्या अमीनपूरमध्ये स्वतःच्या तीन मुलांचा गळा दाबून खून करणार्‍या आईबद्दल तुम्हाला कळलंय? पत्नी मुलांना भेटू देत नाही, फोनवर बोलूही देत नाही म्हणून पाळण्याच्या दोरीनेच फास लावून घेणारा यवतमाळचा संदीप आडे तुम्हाला ठाऊक आहे? कोणत्याही दिवशीचं वर्तमानपत्र उघडा. कुठलंही न्यूज चॅनेल कधीही लावून पाहा. क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या गुन्हेगारीच्या बातम्या खच्चून भरलेल्या तुम्हाला दिसतील. गुन्हे पूर्वीही घडत होते. मानवी सभ्यतेइतकाच मानवी असभ्यतचाही इतिहास प्रदीर्घ आहे. परंतु आजकाल ‘क्राइम स्टोरीज्’ पाहताना-वाचताना विशेष असं काही वाटतसुद्धा नाही, इतकी या घटनांची संख्या वाढत चाललीये. कुणी म्हणतं, कायद्याचा धाक उरला नाही. कुणी म्हणतं, पोलिसांची भीती संपलीये. परंतु धाक आणि भीती ही स्वतःचीसुद्धा असतेच की! भीतीच्या पलीकडे नैतिकता, नीतिमूल्यं, सभ्यता वगैरे शब्द आहेतच की! ते कुठं गेले? शब्दकोशात हे शब्द अजूनही असतील तर त्यांचा अर्थ कुठे गेला. दहा रुपयांची सिगारेट अकरा रुपयांना विकणार्‍या पानटपरीवाल्याशी ग्राहक भांडण काढतो. विक्रेता त्यालाच मारहाण करतो आणि त्यात ग्राहकाचा मृत्यू होतो, इतकं अधःपतन कधी आणि कसं झालं आपलं? एका रुपयासाठी खून? मग ‘संयम’ गेला कुठे?
संयमाचा अंत कधी समोरच्याचा घात करतो, कधी आत्मघाताला आमंत्रण देतो. वर उल्लेख केलेल्या अमीनपुरा येथील घटनेत तीन मुलांच्या आईचं तिच्या नवर्‍याबरोबर सतत भांडण व्हायचं. दहावीच्या बॅचमेटच्या गेटटुगेदरमध्ये तिला तिचा एक वर्गमित्र भेटला. दोघांना संसार करावासा वाटला आणि त्यात तीन मुलं अडथळा ठरतील म्हणून टॉवेलने गळा आवळून तिघांचा खून केला. एखाद्याची मानसिकता इतक्या टोकाला कशी पोहोचते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे तर मानवी जीवनात सुरुवातीपासूनच आहेत. असूया, भीती, संशय याही भावना आधीपासून आहेत. पण टोकाचे निर्णय घेण्याचं प्रमाण मात्र कितीतरी पटींनी वाढल्याचं दिसतंय. बीड जिल्ह्यातलं सरपंच खून प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे. मराठवाड्यातल्याच दुसर्‍या एका प्रकरणात एकाला लोखंडी सळया तापवून चटके दिल्याचं उघड झालंय. लैंगिक गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झालीये. गृहखातं, पोलीस यांना दोष द्यायला विरोधी पक्ष आहेतच; पण एक समाज म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही? माणसं इतक्या टोकाला का जातायत? मानसशास्त्रानुसार, गरजा पूर्ण करण्यास असमर्थ व्यक्ती क्रोध आणि निराशेच्या फेर्‍यात अडकते.
वाढत्या विषमतेमुळं, इतरांचे हक्क मारून श्रीमंत होण्याच्या वृत्तीमुळं, रोडावत चाललेल्या संधींमुळं गुन्हेगारीकडे ओढा वाढतो. जेव्हा व्यक्तीच्या मनात असुरक्षिततेची भावना येते, तेव्हा ती घाबरते किंवा चिडते. त्यातच भावना उद्दीपित करणार्‍या माध्यमांचा सुळसुळाट असताना, भावनांचं शमन करणारी यंत्रणा कुचकामी ठरत चाललीये. पूर्वग्रह, भेदभाव, मोठेपणाची लालसा या गोष्टी गैरकृत्यांकडे नेतातच; शिवाय वाढती व्यसनंही गुन्ह्यांना आमंत्रण देताहेत. गडगंज पैसाही गैरकृत्यं घडवून आणतो आणि पैसा नसल्याची खंतही त्याच दिशेला नेते. या गंभीर मानसिक बदलांकडे झालेलं दुर्लक्षच आपल्या गळ्याशी आलंय. -हिमांशु चौधरी

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …