अयोध्येतील राम मंदिरात मंगळवारी ध्वजारोहण समारंभ पार पडला. अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर अखेर भगवा फडकला आणि समस्त हिंदूंचे स्वप्न साकार झाले आहे. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 500 वर्षांपूर्वीपासूनचा संकल्प पूर्ण झाला असून आज संपूर्ण जग हे राममय झाले असल्याचे उद्गार काढले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची स्थापना करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे वक्तव्यदेखील त्यांनी केले.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असल्याचे या ध्वजारोहण सोहळ्यातून अधोरेखित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामजन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण समारंभात सहभागी होण्यासाठी अयोध्येत पोहोचले. त्यांनी रामजन्मभूमीपर्यंत 1.5 किमीचा रोड शो केला. त्यानंतर त्यांनी मोहन भागवत यांच्यासोबत रामजन्मभूमीला भेट दिली. पंतप्रधान मोदी आणि संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केले. अभिजित मुहूर्ताच्या वेळी सकाळी 11.50 वाजता बटण दाबल्याने 161 फूट उंच शिखरावर भगवा ध्वज फडकला.
पंतप्रधान मोदी राम मंदिरावरील ध्वाजारोहणानंतर बोलताना म्हणाले की, हा धर्मध्वज हा फक्त ध्वज नाही तर हा भारतीय सभ्यतेचा संस्कृतीचा कायाकल्प आहे. भगवा रंग, सूर्यवंशाचे प्रतीक, ओम आणि कोविदार वृक्ष ही राम राज्याची प्रतीके आहेत. हा ध्वज निश्चय, यश आणि संघर्षाचे प्रतीक आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षाचे प्रतीक आहे. हा ध्वज येणारी हजोरो वर्षे प्रभू रामांच्या मूल्यांची उद्घोषणा करेल. सत्य हाच धर्म आहे. आता कोणताही भेदभाव किंवा वेदना नाही तर शांतता आणि आनंद आहे. आता कोणीही गरीब राहणार नाही, मदतीशिवाय राहणार नाही. आपल्या धर्मग्रंथात जेवढे महत्त्व मंदिराला आहे, तेवढेच ते त्यावरील ध्वजाला आहे. जे मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकत नाहीत, ते ध्वजासमोर नतमस्तक होतात. त्यालादेखील तेवढीत किंमत आहे. हा ध्वज दूरूनच रामलल्लाच्या जन्मस्थानाची झलक देईल आणि भगवान श्रीरामाचे आदेश व प्रेरणा सर्व मानवतेला युगोयुगोपर्यंत पोहोचवत राहील. या अविस्मरणीय क्षणी मी जगभरातील कोट्यवधी रामभक्तांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. मी आज सर्व भक्तांना वंदन करतो. राम मंदिराच्या उभारणीत ज्यांनी-ज्यांनी योगदान दिले त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. राम मंदिराच्या बांधकामात सहभागी असलेल्या प्रत्येक मजूर, कारागीर, नियोजक, वास्तुविशारद आणि कामगारांचे मी अभिनंदन करतो.
याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्थापना करण्याचा प्रयत्न केला. आपण गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येणे गरजेचे आहे. प्रभू रामचंद्र हे एक व्हॅल्यू सिस्टम आहेत. आपण मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा संकल्प करायला हवा. 2047 पर्यंत भारताला विकसित देश होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणालाही रोखू शकत नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.
स्थानिक संतांनुसार, रघुवंशात ध्वजाची मोठी परंपरा राहिलेली आहे. भगवान राम यांच्या वंशासाठी कोविदार वृक्ष याला काही जण कांचन, रक्त कांचन, देवकांचन, वनराज, रक्तपुष्प असेही म्हणतात, हा वृक्ष प्रतिक म्हणून या ध्वजावर दिसेल. या वृक्षाला जांभळी फुलं येतात. या ध्वजावर तीन प्रतिकं आहेत. त्यात सूर्यनारायण, ओम आणि कोविदार वृक्ष यांना विशेष स्थान देण्यात आले आहे. राम मंदिराच्या नवीन ध्वजाची एकूण उंची ही 191 फूट आहे. यामध्ये 161 फूट मंदिराच्या मुख्य शिखराची उंची समाविष्ट आहे. हा ध्वज 22 फूट लांब आणि 11 फूट रूंद असून या ध्वजाचे वजन हे 2 ते 3 किलोग्रॅम आहे. 42 फूट उंच ध्वजदंडानुसार हा ध्वज तयार करण्यात आला आहे. यासाठी 360 कोनातून फिरणारा बॉल-बिअरिंगचा वापर होत आहे.
पांचजन्य वृत्तपत्र