ग्रेस हॉपर या अमेरिकन संगणकतज्ज्ञ आणि नौदलातील अधिकारी होत्या. आज आपण कंप्यूटर प्रोग्रामिंग ही जी गोष्ट सहज मानतो, त्याचा पाया घालण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पण त्यांच्याशी निगडित एक आगळावेगळा प्रसंग संगणक क्षेत्रातील संज्ञाचक्र बदलून गेला.
१९४७ साली हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागात मार्क-२ नावाचा एक भला मोठा संगणक वापरात होता. हा संगणक खोलीभर जागा व्यापून बसलेला, हजारो व्हॅयूम ट्यूब्सनी चालणारा होता. अचानक एके दिवशी या मशीनने काम करणं बंद केलं. हॉपर आणि त्यांची टीम दोष शोधण्यासाठी यंत्राच्या प्रत्येक भागात शोधाशोध करू लागली.
बराच वेळ तपासल्यानंतर लक्षात आलं की एका रिलेमध्ये छोटासा पतंग अडकून बसला आहे. त्या काळच्या मशीनमध्ये उष्णता व दिव्यांच्या प्रकाशामुळे कीटक आत शिरणे शय होतं. पतंगामुळे सर्किट नीट काम करत नव्हतं. हॉपर यांनी तो पतंग काढून एका लॉगबुकमध्ये चिकटवला आणि खाली लिहून ठेवलं – फर्स्ट अॅक्च्युअल केस ऑफ बग बीईंग फाउंड.
हा प्रसंग मजेशीर असला तरी त्याचा संगणक क्षेत्रावर खोल परिणाम झाला. यंत्रातील दोष किंवा चूक याला पुढे कायमस्वरूपी ‘बग’ ही संज्ञा वापरली जाऊ लागली. आणि दोष दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेला ‘डिबगिंग’ असं नाव मिळालं. या एका विनोदी निरीक्षणामुळे आज संपूर्ण संगणक व सॉफ्टवेअर क्षेत्रातली भाषाच बदलून गेली. आज ‘बग’ हा शब्द अब्जावधी डॉलरच्या तंत्रज्ञान उद्योगाचा सामान्य भाग झाला आहे.
पण ग्रेस हॉपर यांचे योगदान इथेच थांबत नाही. त्या पहिल्या संगणकीय भाषा विकसित करणार्या वैज्ञानिकांपैकी होत्या. कोबोल ही भाषा या व्यवसायक्षेत्रात दशकानुदशके वापरली गेली, तिच्या विकासात त्यांनी निर्णायक भूमिका बजावली. हॉपर यांचे म्हणणे होते की, संगणक फक्त गुंतागुंतीच्या कोडमध्ये न बोलता सामान्य माणसालाही समजेल अशा भाषेत बोलायला हवा.
ग्रेस हॉपर या अमेरिकन नौदलात रिअर अॅडमिरल पदापर्यंत पोहोचल्या. निवृत्तीनंतरही शोध वृत्तीमुळे त्या टेक्नॉलॉजी क्षेत्रात महिलांसाठी प्रेरणा ठरल्या.
Check Also
जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी
तमिळनाडूतील एका सर्वसामान्य तरुणानं सुरुवातीला 25 हजार रुपयांची नोकरी नाकारून अवघ्या 10 हजार रुपयांची इंटर्नशिप …
पांचजन्य वृत्तपत्र