आठ वर्षांपूर्वी भाजपा-शिवसेना युतीच्या काळात राज्यात शिवशाही बससेवेची सुरुवात झाली. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरामध्ये वातानुकूलित गाडीतून लांबचा प्रवास करता यावा या उद्देशाने शयन आणि आसनी अशा दोन्ही स्वरुपात या बससेवेचा प्रारंभ झाला खरा; परंतु सुरुवातीपासूनच या बसेसविषयी नागरिकांच्या तक्रारी पाहायला मिळाल्या. विशेषतः शिवशाहीला होणार्या अपघातांनी नागरिकांमध्ये भीती पसरलेली दिसून आली आणि आजही ती कायम आहे. नादुरुस्त बस, अधूनमधून बंद होणारी वातानुकूलित यंत्रणा, वारंवार होणारे अपघात, कर्तव्यावर असताना चालकाचे गैरवर्तन आदी विविध कारणांमुळे एकेकाळी राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देणारी शिवशाही काळाच्या पडद्याआड जाण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरू केलेली शिवशाही बससेवा ही प्रवाशांसाठी अत्यंत आरामदायी, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा असेल असे प्रवाशांना वाटले होते. ही लक्झरी बससेवा खासकरून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सुरू करण्यात आली आणि ती राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडते. खासगी लक्झरी बसेसप्रमाणे पुशबॅक सीट्स आणि विस्तृत लेग स्पेसमुळे लांब प्रवासातही आरामशीर बसण्याची सोय यामध्ये आहे. प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पोर्टची सोय, प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये जीपीएस ट्रॅकिंग सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवासादरम्यान वाचनासाठी लाईटची सोय आणि मुख्य म्हणजे खाजगी लक्झरी बसेसच्या तुलनेत स्वस्त दरात प्रवास यामुळे राज्यातील गरीब, निम्नमध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय प्रवाशांमध्ये ही बससेवा भलतीच चर्चेची ठरली. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, अमरावती यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये आजही शिवशाहीतून प्रवास करण्यासाठी लोकांच्या रांगा दिसतात; पण एकदा प्रवास करुन आलेला प्रवासी पुन्हा शिवशाहीतून जाण्यास नकार देतो.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचाही आपला स्वतःचा एक वेगळा ठसा उमटावा म्हणून 2016 साली तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोठा गाजावाजा करून शिवशाही बससेवा सुरु केली होती. पण पहिल्या दिवसांपासून ही लक्झरी बससेवा वादात सापडली. सुरुवातीच्या अवघ्या 3 वर्षांमध्ये म्हणजे 2016 ते 2019 या काळात शिवशाही बसेसचे तब्बल 550 अपघात झाले होते आणि त्यात 50 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. गेल्या सहा वर्षांमध्ये अनेकदा शिवशाहीच्या अपघातांबाबत ओरड व चिंता व्यक्त होऊनही या बससेवेच्या कारभारात कसलाही फरक पडलेला नाहीये. मुळात भाडेतत्त्वावरील शिवशाहींचा महामंडळात समावेश करताना खासगी चालकांना महामंडळाकडून प्रशिक्षण देण्याची अट घालण्यात आली होती. मात्र खासगी कंपन्यांकडून या अटींची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे अतिवेगाने गाडी चालवून नियंत्रण सुटणे, पुरेशी झोप नसणे, घाटमाथ्यावर बसच्या लांबीचा अंदाज न येणे या आणि अन्य कारणांमुळे अपघात होतात.
नोव्हेंबर 2024 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील खाजरी गावाजवळ शिवशाही बस पलटी होऊन 15 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाले. बस चालकाने मोटारसायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण गमावले, ज्यामुळे हा अपघात झाला. चालू वर्षाच्या सुरुवातीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तळेगाव टोल नाक्याजवळ शिवशाही बसला आग लागली. सुदैवाने, सर्व प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मार्च महिन्यात पुणे-सातारा मार्गावर शिवशाही बसला आग लागली. या घटनेत 30 प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील संगमवाडी पुलावर ब्रेक फेल झाल्यामुळे शिवशाही बस झाडावर धडकली. बसमध्ये 25 प्रवासी होते, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही. फेब्रुवारी महिन्यात अमरावतीवरून नागपूरला जाणार्या भरधाव शिवशाही एसटी बसचं पुढचं टायर आपोआप निघून आलं. भरधाव बसचं टायर निखळल्यानंतर ते लांब अंतरावर गेलं. मात्र सुदैवाने 50 पेक्षा अधिक प्रवाशांचा थोडक्यात जीव वाचला. अमरावती नागपूर महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली. काही दिवसांपूर्वी परतवाडा आगाराच्या बसचा ही अशाच प्रकारे टायर निघून आल्याचा प्रकार पाहायला मिळाला होता.
गेल्या वर्षी नागपूरवरून अकोल्याला जाणारी बस पलटी झाल्याने 25 पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाल्याची घटना गडली होती. गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे त्यावेळी सांगितले गेले. केवळ अपघातच नव्हे तर एकंदरीतच या बसची कासवगती, त्यातील एसीविषयीच्या तक्रारी आणि चालकांचा बेदरकारपणा अशा अनेक कारणांमुळे अनेकांनी सोशल मीडियावर या बससेवेला ‘शवशाही’ असे म्हटले आहे. राज्यात एसटी महांडळाच्या ताफ्यात साध्या, निमआराम, स्लिपर कोच, शिवशाही, ईलेक्ट्रिकसह सर्वप्रकारच्या सुमारे 15 हजार 600 च्या जवळपास बसेस आहेत. त्यात 892 शिवशाही बसेसचा समावेश आहे.
या बसमधील सीट कव्हर आणि पडदे अस्वच्छ असल्याचे दिसून येत आहेत. ‘शिवशाही’ वातानुकूलित असल्याने ती बंदिस्त असते. भरप्रवासात ‘एसी’ बंद पडल्यास प्रवासी घामाघूम होतात; तसेच काहींना गुदमरल्यासारखे होते. त्यामुळे प्रवाशांना उलट्या होण्याचे प्रकार वाढले आहेत. ‘एसटी’कडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने तक्रार करायची कुठे, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.
बरेचदा ही वातानुकूलित बस नादुरुस्त झाल्यानंतर ऐनवेळी हिरकणी (सेमी लक्झरी) प्रकारातील एसटी स्थानकातून चालवण्याचे आदेश विभागप्रमुखांकडून देण्यात येतात. या बदलाची पूर्वकल्पना प्रवाशांना देण्यात येत नाही. यामुळे वातानुकूलित बसचे आगाऊ आरक्षण करुनही प्रवाशांना उष्णतेचे चटके सोसत प्रवास करावा लागतो. अनेक वेळा या गाड्या विलंबाने देखील मार्गस्थ करण्यात येतात. याखेरीज शिवशाही बसमध्ये प्रचंड अस्वच्छता असल्याची टीका प्रवाशांकडून केली जाते. अलीकडेच मराठी विश्वातील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून शिवशाही बसप्रवासाचे भयावह वाटावेत असे अनुभव मांडले आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सर्वाधिक अपघातांचे प्रमाण हे शिवशाही बसेसचे आहे. या बसेस वाईट अवस्थेत असतानाही महामंडळाकडून वातानुकुलितच्या नावाने सर्वाधिक प्रवासी भाडे आकारले जाते, याबाबत नागरिकांत रोष आहे. एसटी महामंडळाच्या बसेसच्या अपघातांचे प्रमाण 0.17 टक्के आहे. म्हणजे, सहा लाख किलोमीटरमागे एक अपघाताची नोंद आहे. यात शिवशाही बसच्या अपघातांचे प्रमाण 0.29 टक्के आहे. म्हणजे प्रत्येक 3 लाख 50 हजार किलोमीटरमागे 1 अपघात नोंदवला जात आहे. त्यामुळे शिवशाही बसने प्रवास करणार्यांचा जीव धोक्यात असल्याचा आरोप एसटीतील कामगार संघटनेकडून केला जात आहे.करोना काळात प्रवासी सेवा बंद पडल्यानंतर एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती वाईट झाली. तेव्हापासून सातत्याने महामंडळात बसच्या सुट्या भागांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे महामंडळात गरजेच्या तुलनेत तांत्रिक कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे इतर कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढला आहे. याचा शिवशाही बसेसच्या देखभाल-दुरुस्तीवरही परिणाम होत आहे.एसटी महामंडळाकडून बसेसचे सुटे भाग वेळेवर मिळत नाहीत. तांत्रिक विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवेवरील कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढत असून बसेसच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. त्यामुळेच भंगारस्थितीतील शिवशाही बसेस चालवण्याची वेळ चालकांवर आली असून या बसेसचे अपघात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने एक तर शिवशाही बससेवेच्या सर्व पातळ्यांवरील सुधारणांकडे लक्ष द्यावे किंवा ही बससेवा बंद करावी, असा सूर उमटत आहे. -श्रीकांत देवळे
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र