अलीकडेच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यायामाच्या अतिरेकामुळे 24 वर्षांच्या एका तरुणीचे स्नायू तुटण्याचा प्रकार घडला आहे. या युवतीला आधीपासूनच रॅबडोमायोलिसिस नावाचा एक गंभीर विकार होता. या व्याधीमध्ये स्नायू सहजगत्या तुटण्याची शक्यता असते. ती स्पिनिंग नावाचा इनडोअर सायकलिंग एक्सरसाईज करत होती. यामध्ये मुख्यत्वे करुन पायांच्या आणि नितंबांमधील मोठ्या स्नायूंवर मोठा ताण येतो. हा व्यायाम सुरु केल्यानंतर तिने याचे प्रमाण वाढवले होते. परिणामी, तिला काही दिवसांनंतर तीव्र वेदना जाणवू लागल्या होत्या. त्या इतक्या तीव्र होत्या की तिला जिने चढणेही कठीण झाले.
डॉक्टरांच्या तपासणीनंतर निष्पन्न झाले की तिच्या स्नायूंमध्ये तीव्र ताण आल्यामुळे ते बाधित झाले होते. या अवस्थेमध्ये स्नायूंमधून मायोग्लोबिनसारखे विषारी घटक थेट रक्तप्रवाहात मिसळतात. यामुळे मूत्रपिंड व इतर अवयवांवर ताण येतो. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास हे प्राणघातक ठरू शकते.
या प्रकरणाचा सारांश असा की, इनडोअर व्यायाम करतानाही वॉर्मअप व कूलडाऊन हे दोन्ही टप्पे पार केलेच पाहिजे. त्यांविना केलेल्या जोरदार हालचाली शरीराला घातक ठरू शकतात.
वॉर्मअप केल्याने शरीर व्यायामासाठी तयार होते. यामुळे स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढतो, ऑक्सिजन आणि पोषणद्रव्ये सुव्यवस्थितरित्या प्रत्येक भागांमध्ये पोचतात. सौम्य स्ट्रेचिंग आणि हळूवार हालचाली केल्याने स्नायूंमध्ये लवचिकता येते. परिणामी, सांध्यांची हालचाल क्षमता वाढून दुखापतीचा धोका कमी होतो.स्ट्रेचिंग व सौम्य कार्डिओ प्रकार वॉर्मअपसाठी योग्य ठरतात. त्यामुळे स्नायूंना उष्णता मिळते व ते अधिक सक्रिय होतात.
शरीरात वेदना जाणवत असतील, तर ती दुर्लक्ष करू नका. वेदना हा काहीतरी चुकीचे घडतेय शरीराचा सिग्नल असतो. त्यामुळे कोणतीही हालचाल करताना अस्वस्थ वाटल्यास ती त्वरित थांबवा. तरुणांनी सोशल मीडियावर पाहिलेल्या ट्रेंड्सवर अंधानुकरण न करता, स्वतःच्या शरीराच्या क्षमता समजून घेऊनच फिटनेसचा मार्ग निवडावा.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र