लेख-समिक्षण

व्यवसायाची जागा बदलताना

आपण एखाद्या कारणावरून व्यवसाय अन्य ठिकाणी शिफ्ट करत असाल तर त्याअगोदर स्वत:ला काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे. एक व्यवसायिक म्हणून यशस्वी होण्यासाठी कोणताही व्यक्ती शंभर टक्के प्रयत्न करत असतो. यासाठी जर व्यवसाय अन्य ठिकाणी शिफ्ट करायचा असेल तरीही तो मागेपुढे पाहत नाही. तसे पाहिले तर व्यवसाय बदलण्याचा निर्णय हा कठिण आणि अवघड मानला जातो. तो काही एखाद्या क्षणात किंवा मिनिटात घेतला जात नाही. व्यवसायाच्या संपूर्ण बाजूंवर आणि परिस्थितीचा अभ्यास करून यासंबंधी निर्णय घेतला जातो. त्यामुळे जर आपणही व्यवसायाची जागा बदलण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी स्वत:ला काही प्रश्न विचारा.
नव्या ठिकाणचे स्वरुप : जेव्हा आपण आपला व्यवसाय दुसर्‍या ठिकाणी शिफ्ट करण्याचा निर्णय घेतो तेव्हा व्यवसायाचे स्वरुप आणि बदल काय करायचा आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्याला कोणत्या जुन्या डिलरला बिझनेसमध्ये सामावून घ्यायचे आहे का?, कोणकोणते कर्मचारी ठेवायचे आहेत, कोणत्या कर्मचार्‍याला कामावरून कमी करायचे आहे, या गोष्टी अगोदरच स्पष्ट करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून नवीन ठिकाणी व्यवसाय करताना अधिक अडचणी येणार नाहीत. नव्या ठिकाणी कामाचे स्वरुप अधिक असेल तर नवीन कर्मचार्‍यांची भरती करावी लागते किंवा व्यवसायाचे स्वरुप लहान करायचे असेल तर आवश्यकतेनुसार कर्मचारीवर्ग ठेवावा लागतो. यासंदर्भात सहकारी, भागिदार, कुटुंब, व्यवसायिक सल्लागारांशी सल्लामसलत करावी.
खर्चाचा अंदाज : आपला व्यवसाय अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय पक्का झाल्यानंतर शिफ्टींगसाठी किती आणि कसा खर्च येईल, याचा अंदाज बांधायला हवा. या प्रश्नाचे उत्तर घाईगडबडीत शोधू नये. संपूर्ण संशोधन आणि माहिती घेतल्यानंतरच शिफ्टीच्या अंदाजित खर्च निश्चित करायला हवा. तसेच शिफ्टीसाठी प्रस्तावित खर्च करण्यासाठी आपण तयार आहात का? याचीही पडताळणी करून घ्यायला हवी. जर आपली पुरेशी तयारी झाली असेल तरच व्यवसायला अन्य ठिकाणी नेेण्यास हरकत नाही. नवीन ठिकाणी व्यवसाय सुरू करताना सुरवातीला जादा खर्च येतो. त्यासाठी वेगळा पैसा उभा करावा लागतो. याचाही अंदाज घेणे क्रमप्राप्त ठरते.
प्रतिस्पर्धी कोण : नवीन ठिकाणी मग ते शहर असो किंवा नवीन बाजारपेठ किंवा नवीन देश असो त्याठिकाणी आपल्या व्यवसायाचा प्रतिस्पर्धी कोण असेल याची माहिती घेणे गरजेचे आहे. नव्या ठिकाणी व्यवसाय प्रस्थापित करण्याची योजना आखताना त्याठिकाणी प्रतिस्पर्ध्याचा आवाका, विस्तार, बाजारपेठेतील स्थान लक्षात घ्यायला हवा. प्रतिस्पर्ध्याला काऊंटर करण्यासाठी रणनिती तयार करताना त्याची शक्ती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीनुसार रणनिती तयार करावी लागते आणि टप्प्याटप्प्प्याने त्याची अंमलबजावणी करता येते. नवीन ठिकाणी व्यवसाय स्थिर करण्यासाठी ग्राहकांना, डिलरला नवनवीन योजना, ऑफर्स सादर कराव्या लागतात. अशा प्रकारे रणनिती आखून नव्या ठिकाणी स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …