पहलगाममध्ये झालेल्या दशहतवादी हल्ल्याला भारत प्रत्युत्तर कधी देणार, या प्रश्नाचे उत्तर मॉकड्रीलसाठी निवडलेल्या ७ मे रोजी पहाटे सबंध देशाला मिळाले. भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून सुमारे १०० हून अधिक दहशतवादी यामध्ये मारले गेले आहेत. ‘ऑपरेशन सिंदुर’ असे अत्यंत मार्मिक नाव देऊन आखण्यात आलेले हे मिशन अत्यंत नियोजनबद्धरित्या यशस्वी करण्यात आले. हा भारताने केलेला हल्ला नसून तो ‘प्रिएम्प्टिव्ह अॅटॅक’ आहे आणि याला आंतरराष्ट्रीय कायद्यांची संमती आहे. आता पाकिस्तानने सुरू केलेल्या हल्ल्यांना युद्धाचे पाऊल समजले जाणार आहे आणि भारत त्याला कठोर प्रत्युत्तर देत आहे.
भारताविरुद्धचा संघर्ष तीव्र करताना ज्या चीनी लष्करी साहित्यांच्या जोरावर पाकिस्तान भारताशी दोन हात करण्याच्या वल्गना करत होता ते साहित्य चीनी माला प्रमाणेच तकलादू निघाले. चीनने पाकला पुरविलेली जेएफ १७ लढावू विमाने, एचक्यू९ रडार प्रणाली भारतीय मार्यापुढे पूर्णतः कोलमडली. त्यामुळे आता पाकिस्तानलाच नाही तर चीनलाही भारताबरोबर पंगा घेताना विचार करावा लागेल. गेल्या दहा वर्षात आपल्या संरक्षण क्षेत्राचे ज्या पद्धतीने सक्षमीकरण करण्यात आले त्याचा प्रत्यय काल पाकिस्तानचे हल्ले परतवताना आला ! विशेष कौतुक भारताने खरेदी केलेल्या एस ४०० या हवाई संरक्षण प्रणालीचे ! ही प्रणाली खरेदीचा हा निर्णय गेम चेंगर ठरला ! याच प्रणालीने पाकिस्तानचे भारताच्या दिशेने येणारे ४५ ड्रोन,६० क्षेपणास्त्रे पाडले !
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून भारत कधी, केव्हा आणि कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार असा प्रश्न विचारला जात होता. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असल्यामुळे भारताने गेल्या १५ दिवसांमध्ये राजनयाच्या आणि कूटनीतीच्या पातळीवर अनेक पावले उचलली. सिंधू नदीपाणीवाटप कराराला स्थगिती देणे, किशनगंगा नदीचे पाणी अडवणे, पाकिस्तानची व्यापारी कोंडी यांसारखे काही महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतले. त्याचबरोबर भारतीय लष्कराला या दहशतवादी हल्ल्यानंतरची कारवाई करण्यासाठी पूर्णतः फ्री हँड म्हणजेच मोकळीक देण्यात आल्याचे खुद्द पंतप्रधानांनी जाहीररित्या सांगितले होते. दुसरीकडे, १९७१ च्या युद्धानंतर प्रथमच देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रील करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली होती. तथापि, ७ मे २०२५ च्या सकाळी ‘मॉकड्रील’बाबत उत्सुक असणार्या तमाम भारतीयांना पाकिस्तानवर जबरदस्त एअरस्ट्राईक करत भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची सुवार्ता दिली.
उरीवर झालेला दहशतवादी हल्ला आणि आताचा हल्ला यामध्ये गुणात्मक फरक आहे. उरीचा हल्ला हा पाकव्याप्त काश्मीरपर्यंत मर्यादित होता. पीओकेमध्ये जैश ए मोहम्मद, लष्करे तैय्यबा यांसारख्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचे अड्डे आहेत. या संघटना गेल्या दोन दशकांपासून भारतामध्ये विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार घडवून आणत आल्या आहेत. त्यांना उद्ध्वस्त करण्याचे कार्य सर्जिकल आणि एअरस्ट्राईकच्या माध्यमातून मागील काळात झाले. मात्र यावेळी भारताने पीओकेपर्यंत मर्यादित न राहता पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळही टार्गेट केले आहेत. पंजाब प्रांतातील बहावलपूर हा लष्करे तैय्यबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्याठिकाणची सर्वांत मोठी मास्क आणि मदरसे भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. कारण त्यांच्याकडूनच दहशतवाद्यांची भरती मोठ्या प्रमाणावर केली जाते. केवळ काश्मीरसाठीच नव्हे तर आयसिस, अल् कायदा, तालिबान यांसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांसाठीही भरती केली जाते. बहावलपूरमध्ये मौलाना मसूद अझहरने तयार केलेल्या दहशतवादी कॅम्पवर भारताने अचूकरित्या एअरस्ट्राईक करून तो उद्ध्वस्त केला आहे. त्याचप्रमाणे एलओसीपासून ३० किलोमीटर आतमध्ये असणार्या मुरीदकामध्ये लष्करे तैय्यबाचा दहशतवादी अड्डा होता. तोही आपण उद्ध्वस्त केला आहे. त्यामुळे यावेळी पाकिस्तानला घरात घुसून तडाखा देण्यात आपण यशस्वी झालो आहोत.
ताज्या कारवाईचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे उरीवरील हल्ला असेल किंवा बालाकोटचा एअरस्ट्राईक असेल, त्यावेळी पाकिस्तानकडून या कारवाईची पुष्टी करण्यात आली नव्हती. यावेळी पाकिस्तानने अधिकृतरित्या या कारवाईमुळे झालेले नुकसान आणि अन्य माहिती सादर केली आहे.
तिसरे वैशिष्ट्य म्हणजे मागील कारवायांमध्ये भारताची लढाऊ विमाने एलओसी पार करून पाकिस्तानात घुसली होती. यावेळी आपण एलओसी पार न करताच शत्रूवर मारा केला आहे. यावरुन भारताची लष्करीक्षमता, वायूदलाची सज्जता, आपली क्षेपणास्रक्षमता आणि आपल्या तोफगोळ्यांच्या मार्यातील अचूकता किती भेदक व आधुनिक आहे हे पाकिस्तानच्या लक्षात आले असेल.
चौथे वैशिष्ट्य म्हणजे, ७ मे रोजी केलेला हा एअरस्ट्राईक ‘इंटिग्रेटेड ऑपरेशन’ होते. वायूदल आणि भूदल यांच्या समन्वयाने आणि सीडीएसच्या नेतृत्वाखाली हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदुर’ हे अत्यंत सुनियोजित आणि संघटितरित्या यशस्वी पार पाडण्यात आले.
पाचवे वैशिष्ट्य म्हणजे, या ऑपरेशनमध्ये भारताने कुठेही सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य केलेले नाही. तसेच पाकिस्तानी लष्कराच्या तळांवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या चौकटीत राहून भारताने पाकिस्तानला धडा शिकवला आहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारत हा अत्यंत संयमी आणि जबाबदार देश आहे. इतिहासकाळापासून आजपर्यंत भारताने आपणहून कधीही कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाहीये. ७ मे रोजी भारताने केलेली कारवाई हीदेखील ‘प्रिएम्पटिव्ह अॅटॅक’ या श्रेणीतील आहे. याचा अर्थ, जर तुम्हाला एखाद्या शत्रूकडून धोका असेल, तर त्याच्याकडून कारवाई करण्यापूर्वीच त्याला उद्ध्वस्त करणे. संयुक्त राष्ट्रसंघही अशा प्रकारच्या हल्ल्यांना मान्यता देतो. याच आधारावर इस्राईलने हमासविरुद्ध, लेबननविरुद्ध तसेच इराणविरुद्ध हल्ले केलेले होते. अमेरिकेने इराकमध्ये आपले सैन्य घुसवले होते त्यामागेही हीच सैद्धांतिक भूमिका होती. तशाच प्रकारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील काही भागांमधून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे आणि हे दहशतवादी भारतात येऊन हिंसाचार करताहेत, याची खात्रीशीर माहिती भारताला होती. त्यामुळे हा धोका लक्षात घेऊन ‘ऑपरेशन सिंदुर’ला मूर्त रुप देण्यात आलेले असल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार ‘प्रिएम्प्टिव्ह अॅटॅक’ असेच म्हणावे लागेल. सबब भारताकडून कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग झालेला नाहीय. कारण भारताने कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाहीये. हा नॉन स्टेट अॅक्टर्सवर केलेला हल्ला आहे. तथापि, या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताविरुद्ध काही आगळिक केली तर तो आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग ठरेल. कारण आपण पाकिस्तानच्या लष्करावर किंवा नागरिकांवर हल्ला केलेला नाहीये. तेथील दहशतवादी आपण टिपून त्यांना कंठस्नान घातले आहे.
‘ऑपरेशन सिंदुर’च्या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना एक ठोस संदेश दिला आहे. तो म्हणजे तुम्ही पीओकेमध्ये लपून बसा अथवा पाकिस्तानात; भारत तुम्हाला शोधून मारणारच! आपण जर या कारवाईचा कालावधी पाहिला तर अवघ्या २५ मिनिटांमध्ये भारताने ७ शहरांमधील ९ तळांवर हल्ले करून १०० हून अधिक दहशतवादी मारले आहेत. यासाठीचे लष्कराचे नियोजन, समन्वय आणि अचूकता समस्त भारतीयांची मान उंचावणारी आहे. – डॉ. शैलेंद्र देवळाणकर
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र