चित्रपट हे मनोरंजनाचे अत्यंत प्रभावी माध्यम मानले जाते. परंतु मनोरंजनाचा अर्थ फक्त मन रमविणे, वेळ घालविणे इतकाच नसतो. प्रेमकथा, नाचगाणी आणि मारामारी यानंतर एखाद्या चित्रपटाचा सुखांत झाला की तेवढेच मनोरंजन असे होत नाही. जीवनाचे यथार्थ दर्शन, लोकांच्या वेदना, समाजातील सत्य आणि मानवी संघर्षाशी प्रेक्षकाला सामोरे नेणे हेही मनोरंजनाचे एक महत्वाचे अंग असते. सत्य दाखविणार्या चित्रपटांची कथानके म्हणूनच विशेष ठरतात, कारण ती कथा आपली किंवा आपल्याच आसपासची वाटते. अशा चित्रपटांत शोषण, अंधश्रद्धा, पाखंड, स्त्रियांवरील अत्याचार, अन्याय, भेदभाव असे सामाजिक विषय ठळकपणे दिसतात. पण हळूहळू असे सत्य दाखविणारे, वास्तववादी चित्रपट रुपेरी पडद्यावरून नाहीसे होत गेले.
समांतर सिनेमा म्हणजेच जीवनाचा यथार्थ अत्यंत खोलपणे दाखविणारा सिनेमा. हा हिंदी चित्रपटसृष्टीचा असा प्रवाह होता ज्यात सामान्य माणसाच्या संघर्षाचे, विषमतेचे आणि बदलाचे दर्शन खर्या अर्थाने घडत असे. या प्रवाहाला ‘आर्ट सिनेमा’ किंवा ‘नवा सिनेमा’ असेही संबोधले गेले. १९५० च्या दशकात पश्चिम बंगालमध्ये या कलाप्रवाहाची सुरुवात झाली आणि नंतर हिंदीसह इतर भारतीय भाषांतील सिनेमांनीही हा प्रवाह आत्मसात केला. याचा उद्देश जीवनातील कठोर वास्तव, समाजाच्या काठावर उभ्या असलेल्या वर्गांचे प्रश्न, स्त्रियांची स्थिती आणि गरीबांच्या व्यथा लोकांसमोर आणणे हा होता, ज्यायोगे प्रेक्षक स्वतःला त्या वास्तवाशी जोडू शकेल.
या चित्रपटांच्या कथा सामान्य लोकांच्या जीवनाशी घट्ट जोडलेल्या असतात. दारिद्य्र, बेरोजगारी, जातिभेद, स्त्री-पुरुष संबंध इत्यादी विषय यामध्ये हाताळले जात. या चित्रपटांचे चित्रीकरणही वास्तविक स्थळांवर केले जात असे. त्यातील संवाद नैसर्गिक असत आणि पात्रे अतिशय वास्तवदर्शी असत. श्याम बेनेगल यांच्या अंकुर, मंथन, भूमिका या चित्रपटांसह मणि कौल यांची उसकी रोटी, दुविधा, सत्यजित रे यांचे पाथेर पांचाली, तसेच मृणाल सेन आणि ऋत्विक घटक यांसारख्या दिग्दर्शकांनी या चळवळीचे नेतृत्व केले. या सर्वांच्या चित्रपटांत व्यावसायिकता नव्हती, पण कलात्मकता, गहनता आणि सामाजिक प्रतिकार जाणवत असे. आज मात्र असे सिनेमा फारसे उरले नाहीत. अनेक वर्षांपासून वास्तवाला सामोरे नेणारे चित्रपटच दिसेनासे झाले आहेत.
‘अंकुर’ सारखा चित्रपट शेतकर्यांचे आणि गरिबांच्या जीवनाचे सत्य उलगडतो. उसकी रोटी आणि माया दर्पण ग्रामीण भारतातील समस्यांना संवेदनशीलतेने स्पर्श करतात. समांतर सिनेमानेच गंभीर प्रेक्षकांना सामान्य माणसाच्या वेदनांवर विचार करायला भाग पाडले. स्त्रियांची भूमिका, वंचित वर्गांचे संघर्ष आणि त्यांची स्वतंत्र ओळख यांचे चित्रण या सिनेमाने केले. समांंतर सिनेमाचा मुख्य हेतू होता प्रेक्षकाला वास्तवाच्या जवळ नेणे आणि सामाजिक-सांस्कृतिक बदलांची जाणीव जागवणे.
या चित्रपटांतील पात्रे आणि कथानके अतिशय वास्तविक आणि सहज असतात. यात प्रामुख्याने बिगर व्यावसायिक कलाकार काम करीत. समाजातील सत्य गोष्टींवर आधारित प्रश्न विचारले जात. नारी सशक्तीकरण, जातिवाद, अशिक्षितपणा, ग्रामीण-शहरी विषमता, आर्थिक असमानता हेच समांतर सिनेमाचे मुख्य विषय होते. या चित्रपटांत सहज कला-दिग्दर्शन, नैसर्गिक प्रकाश, लांब शॉट्स आणि संथ गतीची कथानक मांडणी दिसते. सत्यजित रे, मृणाल सेन, ऋत्विक घटक आणि श्याम बेनेगल यांनी या प्रवाहाची ओळख निर्माण केली.
समांतर सिनेमाने चित्रपटाला सामाजिक बदलाचे आणि जागृतीचे माध्यम बनवले. वास्तव दाखविण्याच्या या शैलीने भारतीय प्रेक्षकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप सोडली. मात्र, समांतर सिनेमाला जीवनाचे यथार्थ दर्शन मानले गेले तरी समाजात त्याची खरी ओळख टिकली नाही. कारण या सिनेमाचा कॅमेरा प्रामुख्याने पीडित, शोषित वर्गावर केंद्रित राहिला. परंतु समाजाच्या वास्तवात फक्त दु:खच नसते आनंदही असतो. जर अंकुर समांतर सिनेमाचा भाग मानला जातो, तर हम साथ साथ हैं सारख्या चित्रपटालाही त्या वास्तवाचा एक भाग मानायला हरकत नाही. असेही म्हटले जाते की आपला समांतर सिनेमा इटालियन ‘निओ रियलिझम’, फ्रेंच ‘न्यू वेव्ह’ आणि जपानी ‘न्यू वेव्ह’ सिनेमांपासून प्रेरित झाला होता.
भारतीय चित्रपटसृष्टीत वास्तववादी सिनेमाची पायाभरणी १९२०-३० च्या दशकातच झाली होती. १९२५ मध्ये बाबूराव पेंटर यांनी सावकारी पाश ही मूकफिल्म बनवली, ज्यात व्ही. शांताराम यांनी गरीब शेतकर्याची भूमिका साकारली होती. ती भारतातील पहिली समांतर फिल्म मानली जाते. महिलांच्या स्थितीवर आधारित ‘दुनिया ना माने’ हाही त्या प्रवाहातील चित्रपट होता. ४० ते ६० च्या दशकात सत्यजित रे, ऋत्विक घटक, बिमल रॉय, मृणाल सेन, ख्वाजा अहमद अब्बास, चेतन आनंद आणि व्ही. शांताराम यांनी या परंपरेला पुढे नेले. चेतन आनंद यांनी १९४६ मध्ये ‘नीचा नगर’ तयार केला. नंतर ही परंपरा श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, अदूर गोपालकृष्णन आणि गिरीश कासरवल्ली यांनी पुढे चालवली.
या प्रवाहातील आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे गुरुदत्त, ज्यांनी कलात्मक आणि व्यावसायिक सिनेमामध्ये सेतू तयार केला. त्यांचा ‘प्यासा’ हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील कालजयी ठरतो. तर ऋषिकेश मुखर्जी यांनी कला आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम साधला. अशा चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग मर्यादित असल्याने त्यांचे व्यावसायिक यश अनिश्चित मानले जात होते, तरीही काही कला चित्रपटांना बॉस ऑफिसवर चांगले यश लाभले. स्वातंत्र्यानंतरच्या दशकात सिनेमा दोन प्रवाहांत विभागला गेला. एक सामाजिक आणि विचारांना स्थान देणारा, तर दुसरा पूर्णतः मनोरंजनप्रधान.
१९६९ मध्ये मृणाल सेन यांच्या ‘भुवन सोम’ या चित्रपटाने हिंदी समांतर चित्रपटाला नवी दिशा दिली. १९७६ मध्ये त्यांनी मृगया बनवला, तो मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला चित्रपट होता आणि यात त्यांनी आदिवासी क्रांतिकारकाची भूमिका साकारली. नंतर सत्यजित रे यांनी हिंदीत शतरंज के खिलाड़ी आणि सद्गती बनवला. १९५३ मधील बिमल रॉय यांचा ‘दो बीघा जमीन’ हा चित्रपट समीक्षकांनीच नव्हे तर प्रेक्षकांनीही डोयावर घेतला. १९५४ च्या कान फेस्टिव्हलमध्ये त्याला आंतरराष्ट्रीय सन्मानही मिळाला. त्यानंतर बिराज बहू, देवदास, सुजाता, बंदिनी हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट ठरले.
१९७०-८० च्या दशकात समांतर सिनेमाने जोरदार उभारी घेतली. शबाना आझमी, स्मिता पाटील, अमोल पालेकर, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, अनुपम खेर, कुलभूषण खरबंदा, पंकज कपूर, गिरीश कर्नाड यांसारख्या कलाकारांनी या प्रवाहाला बळ दिले. या काळात रेखा आणि हेमा मालिनी यांनीही काही गंभीर कलात्मक भूमिकांमध्ये काम केले.
श्याम बेनेगल हे या नवचळवळीचे प्रमुख हस्ताक्षर ठरले. १९७३ मध्ये त्यांनी अंकुर बनवला. ग्रामीण भारतात शहरी हस्तक्षेपाचे परिणाम दाखवणारा हा चित्रपट यशस्वी ठरला. १९७५ मध्ये निशांत आणि १९७६ मध्ये मंथन आले; मंथनला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांची मंडी, कलयुग, जुनून या चित्रपटांनीही समाजावर ठसा उमटवला.
गोविंद निहलानी यांनीही हाच मार्ग धरला. १९८१ मधील ‘आक्रोश’ या त्यांच्या चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांनीही दाद दिली. त्यानंतर अर्धसत्य, विजेता, आघात, पार्टी, द्रोहकाल हे उल्लेखनीय चित्रपट आले. मणि कौल यांनी मुक्तिबोधांच्या रचनांवर आधारित सतह से उठता आदमी तयार केली. १९८३ मध्ये कुंदन शाह यांनी ‘जाने भी दो यारो’ हा कालजयी व्यंगचित्रपट बनवला. १९८४ मध्ये सईद अख्तर मिर्झा यांनी मोहन जोशी ‘हाजिर हो’ आणि ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा यों आता है’ या चित्रपटांतून नवे सामाजिक मार्ग उघडले. १९८६ मध्ये केतन मेहता यांनी स्मिता पाटीलला घेऊन मिर्च मसाला तयार केली.
२००० नंतर यथार्थवादी सिनेमा वेगळ्या रूपात पडद्यावर परत आला. मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ आणि ‘युवा’, नागेश कुकुनूर यांच्या तीन दीवारें आणि डोर, सुधीर मिश्रा यांची हजारों ख्वाहिशें ऐसी, जानू बरुआ यांची मैंने गांधी को नहीं मारा, नंदिता दासची फिराक, आणि ओनिर यांची माय ब्रदर निखिल, बस एक पल यांनी नव्या प्रयोगशील वास्तववादी चित्रपटाची दारे पुन्हा उघडली. आज मात्र सत्य दाखवणारा सिनेमा पुन्हा दुर्मिळ झाला आहे. पडद्यावर झगमगाट आहे, पण आयुष्याचे सत्य त्यात हरवले आहे.- सोनम परब
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र