लेख-समिक्षण

लोखंडी कढईच्या स्वच्छतेसाठी

अनेक वर्षांपासून लोखंडी कढई ही स्वयंपाक घराचा अविभाज्य भाग राहिली आहे. मध्यंतरीच्या काळात नॉनस्टिकची लाट आली होती. या लाटेने लोखंडी कढयांना बाहेर घालवण्याचा प्रयत्न झाला होता; पण आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व कालातीत असल्याचे लक्षात आल्यामुळे पुन्हा या कढयांना सन्मानाने किचनमध्ये स्थान दिले जात आहे. अलीकडील काळात भाजी बनवण्यापासून ते पुऱ्या तळण्यापर्यंत या कढयांचा वापर केला जातो. यामध्ये बनवलेल्या पदार्थांना वेगळी चव असते हे निश्चित. आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाणारी कढई नीट स्वच्छ न केल्यास ही कढई काळी पडते, चिकट होते आणि तिच्यावर डाग बसतात. अनेकदा पुऱ्या तळताना तेल जळल्यामुळे कढईची स्थिती खराब होते. अशा वेळी ती स्वच्छ करणं फार अवघड वाटतं. यूट्यूबर कल्पना चौबे यांनी 2 मिनिटांत कढई चमकवण्याचा एक जबरदस्त उपाय शेअर केला आहे. तो असा-
साहित्य : 1. अर्धा लिंबाचा तुकडा,2. एक चमचा मीठ, 3. तांबे-पितळेच्या भांड्यांसाठी वापरले जाणारी पावडर.
कशी करायची कढई स्वच्छ?
कल्पना चौबे यांच्या मते, सर्वप्रथम घाण झालेल्या लोखंडी कढईवर अर्धा लिंबाचा रस पसरून लावावा. त्यानंतर त्यावर मीठ आणि पितळ्यांसाठीची पावडर टाकावी. या तीनही गोष्टी एकत्र मिसळा आणि स्क्रबरच्या मदतीने चांगलं घासून घ्या. केवळ 2 मिनिटांत तुमची कढई चमकू लागेल. शेवटी साध्या पाण्याने धुऊन घ्या. पहा कढई लखलखीत दिसू लागेल. हे कशामुळे घडतं? याचे कारण, लिंबामध्ये सिट्रिक ॲसिड असते, जे एक प्रभावी नैसर्गिक क्लिन्झर आहे. ते तेलकटपणा, जळलेले डाग आणि गंज काढण्यास मदत करते. मीठाचे स्फटिक डागांवर घासले असता डाग निघून जातात. मीठ तांब्याच्या पावडरसोबत मिसळले जाते, तेव्हा त्याचा परिणाम आणखीनच उत्कृष्ट होतो. कल्पना चौबे सांगतात की, कढई स्वच्छ केल्यानंतर तिला गंज लागू नये म्हणून कोरड्या कपड्याने किंवा टिश्यूने पूर्णपणे पुसून घ्या. त्यानंतर कढईवर थोडं तेल घालून सर्व बाजूंनी पसरवा. असं केल्यामुळे कढईला गंज लागत नाही. कधीही लोखंडी कढई ओलसर अवस्थेत ठेवू नका. मोठ्या आचेवर कढई गरम करू नका. कारण उच्च तापमानामुळे तेल जळते आणि त्यामुळे कढईवर डाग पडतात.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …