राज्यात बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सवाचा पहिला दिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला असून ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात लाडया बाप्पांचे आगमन ठिकठिकाणी झाले. त्यानिमित्ताने घराघरांत तसेच विविध गणेश मंडळांत उत्साह ओसंडून वाहतो आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, असा गजर करीत मानाच्या गणपतींच्या मिरवणुका काढण्यात आल्या. वाजत-गाजत गणरायांच्या आगमनाने भाविक भक्तिभावात न्हाऊन निघाले आहेत.
राज्याची उपराजधानी नागपूरमधील संती गणपतीची सकाळी विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली. संती गणेशोत्सव मंडळ नागपुरातील दारोडकर चौक परिसरात गेले ६८ व्या वर्षी गणेशोत्सव साजरा करत असून भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे हुबेहूब देखावे (प्रतिकृती) तयार करण्यासाठी हे मंडळ ओळखले जाते. शिवाय १० दिवस गणरायाचे परंपरेनुसार पूजन ही केले जाते. त्यामुळे लाखो गणेशभक्त १० दिवसांच्या गणेशोत्सवाच्या काळात संती गणेशाचे दर्शन घेतात. संती गणेशोत्सव मंडळाने यंदा जगन्नाथ पुरीमधील जगन्नाथ मंदिराचा हुबेहूब देखावा तयार केला आहे. याशिवाय जगन्नाथ पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या पूजनासाठी जी परंपरा पाळली जाते, तीच परंपरा नागपुरातही पाळण्यासाठी खास पुजारी जगन्नाथ पुरी मधून बोलवण्यात आले आहे. भाजी मार्केटमध्ये ‘कॉटन मार्केटचा राजा’, दसरा रोडवर ‘नागपूरचा राजा’ची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय घरोघरी गणरायांचे आगमन झाले आहे.
अमरावती जिल्ह्यातही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली. रस्त्यापासून गल्लीबोळापर्यंत सर्वत्र मंगलध्वनी, ढोल-ताशे, फटाके आणि शंखनादाच्या गजराने वातावरण भारावून गेले. अमरावती येथील नेहरू मैदान, सायन्सकॉर मैदान आणि राजापेठ परिसरात गणेश मूर्ती विक्रीसाठी उभारण्यात आलेले स्टॉल कालपासून गजबजले होते. सकाळपासूनच भाविकांनी आपल्या आवडत्या गणरायाला घरी आणण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली. विशेषतः मातीच्या मूर्तींच्या खरेदीकडे लोकांचा ओढा अधिक दिसून आला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची जनजागृती झाल्यामुळे मातीच्या गणपतींना यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या सजावटीत आणि दिव्यांच्या उजेडात प्रत्येक ठिकाणी बाप्पाचे आगमन पाहायला मिळाले. शहरातील प्रमुख चौकात वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मंडप तपासणी, ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र समित्या कार्यरत आहेत. तसेच महापालिकेकडून स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी झाली आहे. लालबाग-परळ परिसर गर्दीने फुलून गेला असून दर्शनासाठी भलीमोठी रांग लागली आहे. गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा रामेश्वरममधील रामनाथ स्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली असून आध्यात्मिक व सांस्कृतिक थाटामुळे या उत्सवाला विशेष भव्यता प्राप्त झाली आहे. मुंबईत चिंचपोकळीच्या चिंतामणीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली असून बाप्पाच्या दर्शनाला सुरुवात झाली आहे.
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींच्या आगमन मिरवणुकीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दगडूशेठ मंडळाने सजवलेल्या रथावर विष्णूची मूर्ती आकर्षण ठरत आहे. पुण्यात तब्बल ३९५९ सार्वजनिक मंडळे आणि ७४ हजारांहून अधिक घरगुती गणपतींची स्थापना होत असून पोलिसांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. मध्यवर्ती भागात अकरा दिवस मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. कोकणात लाडया बाप्पाचे घरोघरी आज आगमन झाले आहे. कुणी डोयावर बाप्पाला घेऊन घरी आले आहेत, तर कुणी पालखीतून लाडया बाप्पाला घरी घेऊन जातानाचे दृश्य पाहायला मिळत आहे.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र