अलीकडेच धाराशिव इथे पार पडलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रमास सहभागी झालो होतो. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या महिला प्रशिक्षणार्थींशी लाडकी बहीण योजनेबद्दल संवाद साधला. त्यांना मिळणाऱ्या या योजनेतल्या रकमेतूनत्या नेमके काय करतात आणि त्यांच्या आयुष्यात त्या दरमहा पंधराशे रुपयांनी किती दिलासा मिळतो याबाबत त्यांचे मनोगत जाणून घेतले. त्यातल्या बऱ्याच महिला या लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशाचा वापर आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी करत असल्याचे लक्षात आले. विशेषतः मुलांना खाजगी क्लासेस लावणे पूर्वी शक्य होत नव्हते. पण आता लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पैसे आणि बचत गटासारख्या उपक्रमातून मिळणारे काही पैसे असे एकत्रित करून मुलांना खाजगी क्लास लावला जातो असे सर्व महिलांच्या बोलण्यातून लक्षात आले.
त्यातल्या लोहारा तालुक्यातील रुद्रवाडी गावच्या सीआरपी कविता शिंदे – भोसले यांनी फारच विस्तृत माहिती दिली आणि महिला या पैशातून काय करतात याचा एक मोठा पट उलगडून दाखवला. त्यांच्याविषयी स्वतंत्रपणे लिहिले पाहिजे.
त्यांच्याच गावच्या अन्य महिलांनी मुलांच्या शिक्षणावर खर्च करताना पूर्वी फार ओढाताण होत होती ती ओढाताण लाडक्या बहिणीच्या पैशामुळे कमी झाली असे नमूद केले. यातल्या बऱ्याच महिला या स्वतःकडे फार उच्च शिक्षित नाहीत परंतु त्या त्यांच्या मुलांना अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, नर्सिंग, संगणक च उत्तम तांत्रिक शिक्षण देण्यावर भर देत आहेत. त्यांची मुले आणि मुली पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरात सुद्धा शिक्षण घेत आहेत.
धाराशिव तालुक्यातील वडगावच्या सविता अण्णासाहेब पाटील यांचे एकत्र कुटुंब होते. म्हणजे शेती एकात होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोठ्या दिराचे अचानक निधन झाले. त्या पाठोपाठ सासू आणि सासरे हे दोघेही देवाघरी गेले. केवळ सहा महिन्यात कुटुंबाचे तीन आधार गेले. त्यांचे अंत्यविधी आणि नंतरचे सर्व विधी यावर तर मोठा खर्च करावा लागलाच परंतु घर सावरण्यासाठीही अचानकपणे पैशाची गरज निर्माण झाली. ही सगळी ओढाताण आणि घर सावरणे यासाठी त्यांना लाडकी बहीण योजनेतील पैशाची मोठी मदत झाली.
धाराशिव तालुक्यातील करजखेडच्या शेख फिरदोस शफी यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलांना बाहेरगावी राहून शिकवल्याशिवाय पर्याय नाही. त्यांचे काही खर्च आपल्या उत्पन्नातून निघतात परंतु मुलाचा पुण्याचा घरभाड्याचा खर्च आणि मुलीचा धाराशिव येथे राहण्याचा खर्च याचा मोठा ताण कुटुंबावर पडत असे. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून मिळालेल्या पैशातून पैशाची सतत जाणवणारी चणचण बरीच कमी झाली आणि आपण या योजनेबद्दल पूर्ण समाधानी आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कळंब तालुक्यातील माळकरंजा या गावच्या पूनम तुपारे यांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशातून मुलाला एम एस सी आय टी चे प्रशिक्षण दिले. आणि त्याला काही संगणक खरेदी करण्यासाठी कर्ज काढून दिले. त्यातून आता तो आपल्या गावात अन्य मुलांना एम एस सी आय टी चे शिक्षण देत आहे. शिवाय सेतू केंद्र ही चालवत आहे. कर्जाचे हप्ते फेडणे हे लाडकी बहीण योजनेमुळे शक्य झाले. मुलगा चांगल्या कामाला लागला. त्याच्या उत्पन्नातून आता दुसऱ्या लहान मुलाचे भवितव्य घडवण्याची शाश्वती मिळाली.
शोभा औदुंबर लोमटे राहणार सलगरा तालुका तुळजापूर यांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला तेव्हा त्यांच्या गावातील एका महिलेच्या पतीचे अचानक निधन झाले. त्यांच्या मुलीचे लग्न ठरलेले होते. आणि ते पतीच्या माघारी कसे पार पाडावे या विवंचनेत ती महिला होती. गावातल्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या पैशातून दहा महिलांनी त्या मुलीच्या लग्नात लागणारे सगळे भांडे घेऊन दिले. त्यांच्या गावातील काही महिलांनी पिठाच्या गिरणीचा व्यवसाय, कांडप यंत्र असे व्यवसायात सुरू केले परंतु आधीच व्यवसाय करणाऱ्या काही महिलांनी आपले व्यवसाय वाढवले आहेत .
लोहारा तालुक्यातील आष्टा कासार या गावच्या अवंति कागे यांचे शिक्षण सुरू आहे. परंतु पैशा अभावी शिक्षणात अडथळे येत होते ते लाडक्या बहिणीच्या पैशांमुळे कमी झाले. त्यांच्या नावावर चार चाकी वाहन असल्यामुळे त्याचे पैसे बंद झाले परंतु जेवढे पैसे मिळाले तेवढ्यात त्यांच्या शिक्षणाला मदत झाली.
करजखेडा तालुका धाराशिव येथील सीमा राहुल बनकर या महिलेच्या सासूने तीन एकर जमीन खरेदी केली होती. जमीन मिळाली पण त्यासाठी उभारलेल्या कर्जामुळे घरात सतत अडचणी येत होत्या. त्या कर्जाचे बरेच हप्ते लाडकी बहीण योजनेच्या पैशातून चुकते केले. आता काही पैसे शिल्लक पडले आहेत आणि त्यातून रसवंती गृह सुरू करण्याची योजना आहे. त्यावर अठरा हजार रुपये खर्च होणार आहे. त्यासाठी लागणारा ऊस स्वतःचाच आहे.
रेणुका राहुल कोरे राहणार जेवळी तालुका लोहारा या महिलेने लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्यानंतर कुटुंबावरच्या 20 हजार रुपयांच्या कर्जाच्या बोजा बरासा कमी केला. आणि आता घरच्या तीन महिला बचत गटांच्या सदस्या आहेत
उमरग्याजवळील गुंजोटी येथील पूजा बालाजी भिसे या महिलेने मुलीच्या खाजगी क्लासची तीस हजार रुपयांची फी एक रकमी भरून टाकली. मुलीला दहावीत 85 टक्के मार्क मिळाले आहेत. कळंब तालुक्यातील इटकूर येथील रेखा बाबुराव गंभीरे यांच्या कुटुंबावर खाजगी कर्जाचा मोठा भार होता तो लाडकी बहीण योजनेतील पैशामुळे बराचसा कमी झाला. रुद्रवाडी येथील सुनिता भोसले आणि वंदना भोसले या दोघींनीही मुलांच्या शिक्षणाच्या खर्चामध्ये होणारी नेहमीची ओढाताण बरीच कमी झाल्याचे सांगितले. लाडकी बहीण योजनेबद्दल निरनिराळ्या टीका टिपण्या केल्या जातात परंतु प्रत्यक्षात या योजनेतल्या पैशामुळे ग्रामीण भागातल्या विशेष करून महिलांच्या संसारातील आर्थिक अडचणी बऱ्याच कमी झाल्या आहेत हे लक्षात येते.-अरविंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र