आपल्याला जीवनात रोज नव्या अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यावर मार्ग शोधतच आपण पुढेही जातो. कधी समस्या सुटतात, कधी सुटत नाहीत. पण त्या सोडवायला काही ॲप्स अली, तर काय मज्जा येईल ना?… हो, असं होतंय. काही ॲप्स आपल्याला खरंच मदत करताहेत. ज्यामुळे त्या-त्या वेळी तरी आपल्याला लाइफ जरा एन्जॉय करता येतं.
गुगल मॅप्स आणि गुगल अर्थ : हे ॲप माहित नसलेली आणि त्याचा वापर किमान एकदाही न केलेली स्मार्टफोन असलेली व्यक्ती सापडणारच नाही. हे ॲप आपल्याला आपण कुठेही असाल, तिथून बरोबर तुमच्या अपेक्षित स्थळी पोहोचवतं. हा चालताबोलता नकाशा तुम्हाला जगातल्या कोणत्याहीं पत्त्यावर आणून अचूक सोडू शकतो.
फोरस्क्वेअर : हे ॲप भन्नाट आहे. तुम्हाला मित्रमैत्रिणींमध्ये राहण्याची सवय असेल, किंवा माणसाशी संपर्क ठेवायची आवड असेल, तर तुम्हाला हे उपयुक्त आहे. हे काय करतं? तर तुम्ही कोणत्याही कॉफीशॉप किंवा रेस्टॉरन्टमध्ये गेलात, आणि हे ॲप चालू केलंत तर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधली जी व्यक्ती तिथं असेल, अथवा आसपास असेल, त्याची हे ॲप तम्हाला सूचना देतं. ज्यामुळे तुम्ही गरज असेल, तर त्याच्याशी संपर्क साधू शकता.
आयटूक धीस ऑन माय फोन : या ॲपचं नाव मोठं असलं तरी काम भन्नाट आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांना काही फोटो किंवा व्हिडीओ शेअर करायचे असतील, तर हे उपयुक्त आहे. वेळ न लावता ते तुम्हाला हवी ती गेोष्ट तत्काळ तुमच्या मित्राला शेअर करते. तसंच त्याने पाठवलेली माहिती घेतेही.
पॅन्डोरा : हे ॲप संगीतप्रेमींसाठी खास आहे. तुम्हाला हवं ते गाणं, शास्त्रीय संगीत तुम्ही त्यावर सर्च करा, काही सेकंदातच हे ॲप तुम्हाला तुमची आवड पेश करील. त्यातही तुमच्या आवडीशी मिळत्याजुळत्या आणखीही काही ट्यून्स ते तुम्हाला दाखवील. ऐकायच्या असतील तर ऐका, नाहीतर तुमची मर्जी.
अँग्री बर्ड्स : हे ॲप खूप लोकप्रिय झाले. विशेषत: लहान मुलांमध्ये त्याने अधिक स्थान मिळवलं. खरं तर हे कोणत्याही उपयोगाचं नाही, पण ते उत्कृष्ट तणावहारक, म्हणजेच स्ट्रेसबस्टर आहे. यातली गेम खेळताना माणूस तहानभूक हरपतो. म्हणूनच नाव अँग्री बर्ड्स असलं, तरी त्याचा उपयेोग राग शांत करण्यासाठीच होतो.
टेलीनॅव्ह : या ॲपचा उपयोग ज्यांना अधिकाधिक फिरण्याची हौस आहे, ज्यांना सतत बाहेर जावं लागतं, फिरावं लागतं, अशांना होऊ शकतो. कारण हे ॲप कोणत्याही शहरातली रेस्टॉरन्ट्स, राहण्याची ठिकाणं, मुख्य रस्ते, पर्यटनस्थळं यांची माहिती देतं. त्यामुळे आपल्याला कोणतीही नवीन गोष्ट शोधणं सोपं झालं आहे.
सीएनएन मनी : तुम्ही वित्तीय, आर्थिक क्षेत्राशी संबंधित असाल, किंवा शेअर मार्केट किंवा तत्सम यंत्रणेत काही गुंतवणूक करत असाल, तर हे ॲप तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. कारण प्रत्येक क्षणाला आर्थिक क्षेत्रात काय चाललंय, याची इत्थंभूत खबर हे ॲप तुम्हाला देतं. ज्यामुळे तुम्हाला तुमची गंतवणूक कुठेही असाल, तर अपग्रेड करणं किंवा त्याबाबतचा निर्णय घेणं सोयीचं जातं.
यापेक्षाही अनेक ॲप्स तुमच्या स्मार्टफोनवर तुमच्या सेवेसाठी हजर आहेत. बस्स, डाऊनलोड करण्याचा अवकाश…
पांचजन्य वृत्तपत्र