लेख-समिक्षण

लघुग्रहांची धडक रोखता येणार?

6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीला एका मोठ्या आकाराच्या लघुग्रहाची धडक झाली. या धडकेमुळे निर्माण झालेले विवर आजही मेक्सिकोमध्ये ‌‘चिक्सुलुब क्रेटर‌’ या नावाने पाहायला मिळते. या लघुग्रहाच्या धडकेमुळेच पृथ्वीवरून डायनासोरचे साम्राज्य नष्ट झाले होते. काळाच्या ओघात पृथ्वीला अशा अनेक लघुग्रहांच्या, मोठ्या उल्कांच्या धडकेचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या मार्गात येणाऱ्या अशा लघुग्रहांची धडक कशी टाळावी याबाबतही आधुनिक काळात विचार करण्यात येत आहे. त्यामधूनच डार्ट मोहीमही राबवण्यात आली होती व ‌‘डार्ट‌’ यानाची डिमोर्फोसला धडक घडवून या लघुग्रहाची दिशा बदलण्याचा यशस्वी प्रयोगही करण्यात आला होता. आता ‌‘नासा‌’ने याबाबत आणखी विचार करून लघुग्रहांच्या संभाव्य धडक रोखण्यासाठी योजना तयार केलेली आहे.
‌‘टीओआय‌’च्या रिपोर्टनुसार, ‌‘नासा‌’च्या रणनीतीमध्ये ‌‘निअर अर्थ ऑब्जेक्ट‌’ (एनईओ) च्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी एक बहुआयामी द़ृष्टिकोन ठेवण्यात आलेला आहे. निकटच्या भविष्यात पृथ्वीला कोणत्याही लघुग्रहाचा धोका नाही. मात्र तरीही ‌‘नासा‌’ याद़ृष्टीने तयारी करीत आहे, जेणेकरून संभाव्य धोका टाळला जाऊ शकेल. रिपोर्टनुसार, ‌‘नासा‌’च्या योजनेत पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या लघुग्र हाला रोखण्यासाठी किंवा त्याची दिशा बदलण्यासाठी अंतराळयानांची ‌‘1000 आर्मी‌’ पाठवण्याची योजनाही समाविष्ट आहे. यापेक्षाही मोठा धोका असेल तर आण्विक उपकरणे वापरण्याचाही पर्याय आहे. 1998 च्या ‌‘आर्मगेडन‌’ या चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच हा उपाय असेल. त्यामध्ये पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहाला नष्ट करण्यासाठी एका आण्विक उपकरणाचा वापर करण्यात आल्याचे दाखवलेले आहे. ‌‘नासा‌’ने 2022 मध्ये ‌‘डबल ॲस्टेरॉईड रीडायरेक्शन टेस्ट‌’ म्हणजेच ‌‘डार्ट‌’ मोहीम यशस्वीरित्या राबवली होती. ही ‌‘डार्ट‌’ मोहीम आता ‌‘नासा‌’च्या संरक्षणात्मक संभाव्य मोहिमेत पहिल्या श्रेणीत असेल. जर ऐनवेळी एखाद्या धोकादायक लघुग्रहाचा छडा लागला तर त्याला निपटण्यासाठी आण्विक विस्फोटकांचा पर्याय निवडला जाऊ शकतो. असा अणुस्फोट लघुग्रहाला नष्ट करू शकतो किंवा त्याची दिशा बदलवू शकतो. लघुग्रह या अशा अवकाशीय शिळा आहेत ज्या इतस्तः भटकत असतात. मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांदरम्यान अशा अवकाशीय शिळांचा ‌‘ॲस्टेरॉईड बेल्ट‌’ नावाचा एक पट्टाच आहे. याशिवाय आपल्या सौरमालिकेच्या टोकापाशी नेपच्यूनच्या पुढेही असे अनेक लघुग्रह आहेत.

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …