जळगाव जिल्ह्यात परधाडे रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला, तर 40 जण जखमी झाले. लखनौवरून येणार्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरून येणार्या कर्नाटक एक्स्प्रेसने सुमारे 50 प्रवाशांना चिरडले. या अपघातानंतर एकच कल्लोळ माजला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले.
जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. आधी पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. त्यानंतर अनेकांनी एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या, आग लागल्याची अफवा पसरताच 50 ते 60 जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यातच समोरून कर्नाटक एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली. यात 40 जण जखमी झाले असून, काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे येत असताना हा अपघात घडला आहे. चालकाने अचानक ट्रेनचे ब्रेक दाबले त्यामुळे चाकामधून ठिणग्या उडाल्या. त्या ठिणग्या पाहून काही प्रवासी घाबरले. त्यातून आग लागल्याची अफवा पसरली. आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर हल्लकल्लोळ माजला. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी 50 ते 60 जणांनी रेल्वेमधून उड्या मारल्या. मात्र याचवेळी समोरून कर्नाटक एक्स्प्रेस येत होती. पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या लोकांना या कर्नाटक एक्स्प्रेसने चिरडले.
या घटनेत 40 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या रेल्वेमधून प्रवास करणार्या एका प्रवाशाने अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, ही घटना दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान घडली. आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर काही जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचदरम्यान समोरून कर्नाटक एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने 40 ते 50 जणांना चिरडल्याची घटना घडली. दरम्यान समोरून येणार्या कर्नाटक एक्स्प्रेसने हॉर्नदेखील दिला नाही, असा दावा देखील काही प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला. हॉर्न दिला असता तर कादाचित प्रवाशी सावध झाले असते, असेही म्हटले गेले.
जळगाव रेल्वे अपघाताची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथून जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या.मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतक प्रवाशांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. तसेच जखमींवर शासकीय खर्चातून उपचार करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या. त्यांनी ट्वीट करत सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून जिल्हाधिकारीही पोहचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहे. घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपत्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे, असे त्यांनी म्हटले.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र