लेख-समिक्षण

रुपेरी पडद्यावरचा दीपोत्सव

भारतीय संस्कृतीत दिवाळी हा तेजाचा, चैतन्याचा, प्रकाशाचा उत्सव असून या सणाला सणसम्राज्ञी किंवा सणांची महाराणी म्हटले जाते. या सणाचे सामाजिक, धार्मिक आणि भावनिक पैलू जितके खोल, तितकाच त्याचा प्रभाव भारतीय चित्रपटसृष्टीवरही दिसून येतो. बॉलिवूडने गेल्या काही दशकांत दिवाळीच्या उत्सवाला केवळ पार्श्वभूमी म्हणून नव्हे तर एक कथानकाचे केंद्रस्थान म्हणूनही वापरले आहे. प्रत्येक काळात दिवाळीच्या प्रकाशात नातेसंबंधांची गुंतागुंत, कुटुंबातील बंध, प्रेम, पुनर्मिलन, तसेच भारतीय समाजातील भावनिक मूल्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न सिनेमांनी केला आहे.
१९९० च्या दशकानंतर विशेषतः ‘फॅमिली ड्रामा’ या प्रकारात दिवाळीचा उत्सव अपरिहार्य बनला. कुटुंबातील एकत्रितपणा, जुन्या मतभेदांचा विसर, घरातील आनंद, सजावट, दिवे, फटाके आणि दिव्यांच्या प्रकाशात साकारलेले हे प्रसंग प्रेक्षकांच्या मनात कायमचे कोरले गेले. या भावविश्वाचे चित्रण बॉलिवूडने इतया नाट्यमय आणि भावनाप्रधान पद्धतीने केले आहे की अनेक प्रेक्षक आजही दिवाळी आली की काही विशिष्ट चित्रपट पाहण्याची सवय कायम ठेवतात.
‘हम आपके हैं कौन’ (१९९४): सूरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट म्हणजे ९० च्या दशकातील भारतीय कुटुंबव्यवस्थेचे आणि सणासुदीतील परंपरेचे एक जिवंत चित्र आहे. या चित्रपटात दिवाळीचा प्रसंग फक्त उत्सव म्हणून नसून, कौटुंबिक एकात्मतेचा क्षण म्हणून दाखविला आहे. रेणुका शहाणेने साकारलेल्या भाभीला मुलगा होतो आणि त्या प्रसंगी घरात दिवाळी साजरी केली जाते. ‘धिकताना धिकताना…’ हे गाणे म्हणजे आनंद, नात्यांचे सौंदर्य आणि घरातील परंपरेचे प्रतीक. प्रकाशाच्या झगमगाटात नात्यांची ऊब कशी असते, हे या गाण्यातून दिग्दर्शकाने अत्यंत संवेदनशीलतेने दाखवले आहे.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (१९९५): आदित्य चोप्रा यांच्या या कालजयी चित्रपटात दिवाळीचा थेट सीन नसला तरी, त्यातील भावनिक मुळं पूर्णपणे भारतीय संस्कृतीशी जोडलेली आहेत. लंडनमध्ये वाढलेल्या दोन तरुणांच्या प्रेमकथेत ‘घरचे संस्कार, सणांचे महत्त्व आणि आपल्या मातृभूमीची ओढ’ हे विषय प्रमुख आहेत. युरोपीय पार्श्वभूमीवरही नायक-नायिकेच्या संवादांतून, त्यांच्या कुटुंबातील संस्कृतीतून आणि परत भारतात येण्याच्या भावनेतून दिवाळीसारख्या उत्सवाची प्रतीकात्मक छटा जाणवते. बॉलिवूडने या चित्रपटातून दाखवले की, सण म्हणजे केवळ विधी नाहीत, तर आपलेपण जपण्याचे साधन आहे.
‘मोहोब्बते’ (२०००): आदित्य चोप्रा यांचा हा दुसरा महत्त्वाचा चित्रपट प्रेम आणि परंपरेतील संघर्षावर आधारित आहे. ‘पैरों में बंधन है’ हे दिवाळीवर केंद्रित गाणे आजही लोकांच्या आठवणीत आहे. शाहरुख खान, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांनी सजवलेले हे गीत केवळ संगीतसौंदर्यासाठी नव्हे, तर त्यातील दृश्यात्मकतेसाठीही प्रसिद्ध आहे. दिवे, रंग, नृत्य, आनंद आणि प्रेमाचा संगम या सणाच्या रूपकातून या गाण्यात सुंदररीत्या दिसतो. दिवाळीचा अर्थ येथे अंतर्मनात उजेड पसरवणारा परंपरेच्या अंधारातून प्रेमाच्या प्रकाशाकडे नेणारा असा दिला आहे.
‘कभी खुशी कभी गम’ (२००१): पुनर्मिलनाचा क्षण
करण जोहर यांच्या या चित्रपटाने बॉलिवूडमधील दिवाळी सीनला एक अमरत्व दिलं. जया बच्चन आरती घेऊन उभी आहे आणि तिला नकळत आपल्या मुलाच्या (शाहरुख खानच्या) आगमनाची जाणीव होते, हा सीन म्हणजे भारतीय मातृत्वाच्या भावना आणि दिवाळीच्या प्रतीकांचा उत्कृष्ट संगम आहे. दिव्यांच्या प्रकाशात, पारंपरिक पोशाखांत आणि ‘कुटुंब पुन्हा एकत्र येत आहे’ या कथाभावनेतून दिवाळीचा आत्मा या दृश्यात प्रकट होतो. ‘कभी खुशी कभी गम’ ने दाखवले की दिवाळी म्हणजे फक्त प्रकाशाचा नव्हे, तर क्षमाशीलतेचा आणि पुन्हा एकत्र येण्याचा सण आहे.
‘वास्तव’ (१९९९): ः महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वास्तव’ मध्ये दिवाळीचा प्रसंग वेगळ्या छटेत साकारला आहे. संजय दत्तचा नायक गुन्हेगारी जगतात अडकलेला असतो, पण दिवाळीच्या दिवशी तो आपल्या आईला भेटायला येतो. गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांबद्दल सांगताना तो ज्या प्रकारे ‘पच्चास तोला’ चा डायलॉग बोलतो त्या सोन्यामागे हरवलेली माणुसकी आणि रिमा लागूंनी साकारलेल्या आईच्या डोळ्यातील करुणभाव प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. इथे दिवाळीचा प्रकाश बाहेर नसून, अंतर्मनात हरवलेल्या उजेडाचा शोध घेणारा आहे.
‘चाची ४२०’ (१९९७): कमल हसन यांच्या या विनोदी चित्रपटात दिवाळीच्या सीनमध्ये ‘चाची’ लहान मुलीला फटायांच्या अपघातापासून वाचवते. हा प्रसंग हलकाफुलका असला तरी त्यामागे जबाबदारी, प्रेम आणि मानवीतेचा संदेश दडलेला आहे. दिवाळीचा प्रकाश येथे प्रतीकात्मक आहे.
बॉलिवूडने दिवाळीचे चित्रण नेहमीच समाजाच्या भावनांशी जोडलेले ठेवले आहे. ७० च्या दशकात ‘अमर अकबर अँथनी’सारख्या चित्रपटांमध्ये हा सण सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून दिसला, तर ९० च्या दशकानंतर तो कौटुंबिक आणि भावनिक संदर्भात परतला. आधुनिक काळात, ‘कभी खुशी कभी गम’नंतर ‘दिल धडकने दो’ किंवा ‘ये जवानी है दीवानी’सारख्या चित्रपटांत सण अधिक शहरी, ग्लॅमरस रूपात दिसू लागला आहे. तरीही त्याचे सार ‘एकत्र येणे, साजरे करणे आणि नव्याने सुरुवात करणे’ हे आजही कायम आहे.
याखेरीज काही चित्रपटांमध्ये दिवाळीवर आधारीत गाण्यांनी कथानकाला भावनिक जोड दिली.
२००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘होम डिलिव्हरी’ या चित्रपटातील *‘हॅपी दिवाळी’* हे गाणे आजच्या तरुण पिढीसाठी एक फेस्टिव्ह मूड निर्माण करणारे गीत ठरले. विशाल ददलानी यांनी लिहिलेल्या या गाण्याला वैशाली, श्रुती, दिव्या, सूरज आणि सुनिधी चौहान यांनी आवाज दिला आहे. गाण्याची चाल झपाट्याने पुढे जाणारी, शब्द आधुनिक, आणि दृश्यरचना रंगीबेरंगी आहे. शहरातील झगमगाट, दिव्यांची रोषणाई, आणि मित्रमंडळींमधील हसरा माहोल ‡ या सगळ्याचा एकत्रित उत्सव म्हणजे हे गाणं. दिवाळी आता फक्त पारंपरिक मर्यादेत न राहता एक शहरी, सामूहिक जल्लोष बनली आहे, हे या गीतातून सुंदररीत्या दिसते.
‘शिर्डी के साई बाबा’या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले ‘दीपावली मनाई सुहानी’ हे गीत आजही कानावर पडते आणि आपल्याला एका वेगळ्या काळात घेऊन जाते. या गाण्यात साईबाबांनी पाण्यातून दिवे प्रज्वलित केल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. यातून श्रद्धा, करुणा आणि चमत्कार यांचा अद्भुत संगम दिसतो. हे गीत भक्तीभाव, आत्मिक उजेड आणि दिवाळीच्या प्रतीकात्मकतेला जोडणारे आहे.
२००१ मधील ‘आमदनी अठनी खर्चा रुपया’ या विनोदी चित्रपटातील ‘आई है दिवाली सुनो जी घरवाली’ हे गाणे कौटुंबिकआनंदाचे प्रतीक आहे. उदित नारायण, अलका याज्ञनिक, कुमार सानू, शान, केतकी दवे आणि स्नेहा पंत यांसारख्या दिग्गज गायकांनी हे गीत एकत्रित गायलं आहे. हास्यरस, कौटुंबिक गप्पा, आणि दिवाळीतील हशा या सगळ्याचं चित्रण या गाण्यातून होते. १९४४ साली प्रदर्शित झालेल्या ‘रतन’ या कृष्णधवल चित्रपटातील ‘आई दिवाळी आई दिवाळी’ हे गाणं भारतीय संगीत इतिहासातील एक रत्न आहे. जोहराबाई अंबालेवाली यांच्या सशक्त आवाजाने हे गीत त्या काळातील पारंपरिक आनंदाचे वातावरण उभे करते. डी.एन. मधोक यांनी लिहिलेल्या या गीतात केवळ दिव्यांची नव्हे, तर नव्या आशेची आणि उजेडाच्या नव्या युगाची भावना व्यक्त होते. आजही हे गाणं ऐकताना त्या काळातील निरागसता आणि घराघरातल्या दिव्यांचा मंद प्रकाश डोळ्यांसमोर येतो.
बॉलिवूडच्या इतिहासात दिवाळीवरील गाण्यांचा प्रवास हा भारतीय समाजातील बदलाचं प्रतिबिंब आहे. सुरुवातीला ४० आणि ५० च्या दशकात भक्तीभाव आणि साधेपणा होता, ८०—९० च्या दशकात कौटुंबिक उत्सवाचं महत्त्व वाढलं आणि २००० नंतर शहरी, ग्लोबल रंग भरू लागले. तरीही या सर्व गीतांचा गाभा एकच आहे ‡अंधारातून प्रकाशाकडे नेणारी भावना. ‘हॅपी दिवाळी’सारख्या आधुनिक गाण्यांमध्ये जरी इलेट्रॉनिक बीट्स आणि डान्स पार्टीचा माहोल असला, तरी ‘आयी दिवाळी आयी’सारख्या जुन्या गीतांमध्ये एक गहिवर आहे. एकीकडे ग्लॅमर, तर दुसरीकडे संस्कृती या दोन्ही टोकांवर दिवाळीच्या गाण्यांनी आपले स्थान मिळवले आहे.- सोनम परब

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …