हिंदी सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर तो भारतीय समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीचाही एक महत्त्वाचा घटक आहे. गेल्या सव्वाशे वर्षांच्या या प्रवासात अनेक विषय, कथानके, व्यक्तिरेखा पडद्यावर आल्या; पण त्यांत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले विषय म्हणजे रामायण व महाभारतासारख्या पौराणिक कथा. यातही रामकथा ही प्रेक्षकांच्या भावविश्वात खोलवर रुजलेली कथा आहे. कारण प्रभू श्रीराम हे केवळ देवता म्हणून नव्हे तर मर्यादा, धर्मपालन, आदर्श कर्तव्यनिष्ठा यांचे प्रतीक मानले जातात आणि त्यांना भारतीय समाजात विशेष स्थान आहे. त्यामुळेच सिनेमाच्या आरंभीच्या काळापासून आजपर्यंत जवळजवळ प्रत्येक दशकात रामायणावर आधारित चित्रपट किंवा दूरदर्शन मालिका प्रेक्षकांसमोर आली आणि लोकांनी त्याचे भरभरून स्वागत केले.
भारतीय सिनेमाचा जनक मानले गेलेले दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी निवडलेला विषय होता लंका दहन (१९१७). हीच रामकथेला पडद्यावर आणणारी पहिली मोठी कलाकृती ठरली. आवाज नसलेल्या त्या मूकपटांच्या काळातही या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. मुंबईतील चित्रपटगृहांबाहेर गर्दी उसळली होती. एवढेच नव्हे तर या चित्रपटाच्या कमाईमुळे दादासाहेबांना आपल्या निर्मात्यांच्या घरापर्यंत पैशांचे पोते बैलगाडीतून पोहोचवावे लागले, असे उल्लेख आढळतात. लंका दहनमध्ये अण्णा साळुंके यांनी राम व सीता ही दोन्ही पात्रे साकारली. म्हणजेच भारतीय सिनेमाच्या इतिहासातील पहिले डबल रोल या चित्रपटात झाले. त्या काळात स्त्रियांची भूमिका पुरुषच साकारत असत, याचे हे उदाहरण ठरते.
रामायणासारख्या पौराणिक कथा पडद्यावर आणणे हे दिग्दर्शकांसाठी एक प्रकारची जबाबदारी होती. कारण त्या कथा लोकांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी होत्या. दादासाहेब फाळके यांना ‘द लाईफ ऑफ क्राइस्ट’ हा परदेशी चित्रपट पाहून जेव्हा प्रेरणा मिळाली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर भारतीय देवतांची रूपे उभी राहिली. जर येशू ख्रिस्ताचे चमत्कार पडद्यावर दाखवता येतात, तर रामकृष्णासारख्या भारतीय देवतांच्या कथा का नाही? असा विचार करून त्यांनी आपला प्रवास सुरू केला.
१९२० मध्ये जी. व्ही. साने यांनी राम जन्म या चित्रपटातून या परंपरेला पुढे नेले. १९३२ मध्ये व्ही. शांताराम यांनी अयोध्या का राजा आणला. नंतर १९४२ मध्ये विजय भट्ट यांच्या भरत मिलाप व १९४३ मध्ये आलेल्या ‘रामराज्य’ने प्रेक्षकांच्या मनात रामकथेची गोडी आणखी घट्ट केली. राम राज्यमध्ये प्रभू रामाची भूमिका प्रेम अदीब यांनी केली होती. त्यांच्या छायाचित्रांवर लोक माळा चढवून पूजेसाठी ठेवत असत. म्हणजेच पडद्यावरील कलाकार थेट देवतेच्या रूपात पूजले जाऊ लागले.
१९६१ मध्ये बाबुभाई मिस्त्री यांनी बनवलेला ‘संपूर्ण रामायण’ हा चित्रपट रामकथेच्या चित्रपट प्रवासातील पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटात रावण व हनुमानाला आकाशात उडताना दाखवण्यात आले, तर राम—रावण युद्धाचे दृश्य विशेष परिणामांसह उभे केले गेले. त्या काळातली तांत्रिक साधने मर्यादित असूनही प्रेक्षकांना या नव्या दृश्यभाषेने मोहित केले. या चित्रपटात बी. एम. व्यास यांनी रावणाची भूमिका साकारली होती. नंतरच्या दशकातही रामकथा वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी पडद्यावर आणली.
१९८० आणि १९९० च्या दशकात दूरदर्शनवर रामानंद सागर यांनी साकारलेली रामायण मालिका ही सांस्कृतिक चळवळ ठरली. रविवार सकाळी मालिका सुरू झाली की रस्ते ओस पडत असत, असे वर्णन आजही अनेक लोक करतात. त्या मालिकेत अरुण गोविल यांनी रामाची भूमिका इतया प्रभावीपणे साकारली की देशभरात त्यांना प्रत्यक्षात राम मानले जाऊ लागले. त्याच मालिकेत दीपिका चिखलिया सीता, सुनील लहरी लक्ष्मण आणि अरविंद त्रिवेदी रावण या भूमिकांत लोकप्रिय झाले. मालिकेच्या प्रसारणानंतर त्यांच्या छायाचित्रांनाही लोक देवघरात स्थान देऊ लागले होते. इतया मोठ्या प्रमाणावर एखाद्या मालिकेने समाजावर परिणाम घडवणे हे अनोखेच होते.
याच काळात दक्षिणेकडील सिनेमातही रामायणाच्या विविध आवृत्त्या आल्या. तेलुगू भाषेत तर सर्वाधिक चित्रपट रामकथेशी संबंधित आहेत. एकूणात, भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर पन्नासपेक्षा अधिक चित्रपट आणि अठरा दूरदर्शन मालिका रामायणावर आधारित बनल्या आहेत. म्हणजेच प्रत्येक पिढीने आपल्या काळात रामकथेची नवी आवृत्ती पडद्यावर पाहिली आहे.
आज पुन्हा एकदा ही कथा आधुनिक रुपड्यात प्रेक्षकांसमोर येत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण हा ४००० कोटी रुपयांचा प्रकल्प याच परंपरेला नव्या भव्यतेने पुढे नेतो आहे. रणबीर कपूर राम, यश रावण आणि सनी देओल हनुमान या भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून त्यानंतर दुसरा भाग येईल. या दोन्ही भागांना मिळून ८००० कोटींची कमाई करावी लागणार आहे, तेव्हाच ते हिट मानले जाईल. भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक म्हणून त्याची चर्चा सुरू आहे.
यात गंमत अशी की कथानक कुणालाही नवीन नाही. देशातील प्रत्येक मूलही राम—रावण युद्धाची गोष्ट ऐकूनच मोठे होते. मग इतया मोठ्या बजेटमध्ये ती कथा पुन्हा का बनवली जाते? याचे उत्तर म्हणजे श्रद्धा आणि सांस्कृतिक आकर्षण. राम हे भारतीय समाजाच्या चेतनेचे प्रतीक आहेत. धर्म, नैतिकता, कर्तव्यपालन यांचे ते अवतार मानले जातात. त्यामुळे काल बदलला, तंत्रज्ञान बदलले, दिग्दर्शक बदलले तरीही प्रेक्षकांचा उत्साह मात्र तसाच टिकून आहे.
१९१७ मध्ये लंका दहन पाहायला लोक रांगेत उभे राहिले होते, १९८७ मध्ये रामायण मालिकेसाठी रस्ते ओस पडले होते आणि आता २०२६ मध्ये लोक आधुनिक तंत्रज्ञानात रंगवलेली तीच कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणजेच शतक उलटलं तरी रामाची कथा अजूनही तितकीच जिवंत आहे.- सोनम परब
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र