लेख-समिक्षण

येतोय ‌‘शूटआऊटचा‌’ तिसरा भाग

बॉलिवूडमधील सर्वात चर्चिल्या गेलेल्या ‌’शूटआऊट‌’ या गुन्हेगारी विश्वावर आधारित फ्रँचायझीचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‌’शूटआऊट ॲट लोखंडवाला‌’ (2007) आणि ‌’शूटआऊट ॲट वडाळा‌’ (2013) या दोन यशस्वी चित्रपटांनंतर, निर्माती एकता कपूर आता या मालिकेचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. ताज्या अहवालानुसार, अभिनेता हर्षवर्धन राणे या ‌’शूटआऊट इन दुबई‌’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असेल. या चित्रपटाचे आधीचे दोन्ही भाग मुंबईतील खऱ्या एन्काउंटरवर आधारित होते. मात्र, ‌’शूटआऊट इन दुबई‌’मध्ये प्रथमच एक पूर्णपणे काल्पनिक गुन्हेगारी कथा मांडली जाणार आहे. दुबईच्या आलिशान इमारती आणि जागतिक स्तरावरील गुन्हेगारीचे जाळे या पार्श्वभूमीवर हा चित्रपट अधिक भव्य आणि अत्याधुनिक पद्धतीने चित्रित केला जाणार आहे.
6 वेळा बदलली पटकथा
निर्माती एकता कपूर आणि दिग्दर्शक संजय गुप्ता 2021 पासून या चित्रपटावर काम करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाची पटकथा तब्बल 6 वेळा लिहून पूर्ण करण्यात आली आहे. जोपर्यंत ‌’लोखंडवाला‌’ आणि ‌’वडाळा‌’सारखी तीव्रता पटकथेत येत नाही, तोपर्यंत चित्रपटाला हिरवा कंदिल न देण्याचे निर्मात्यांनी ठरवले होते. आता अखेर पटकथा निश्चित झाली असून, मार्च 2026 पर्यंत प्री-प्रॉडक्शचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
‌’सनम तेरी कसम‌’ची री-रिलीज आणि ‌’एक दिवाने की दिवानियत‌’ या चित्रपटांच्या यशानंतर हर्षवर्धन राणेच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. या चित्रपटाद्वारे हर्षवर्धन पहिल्यांदाच एका हाय-ऑक्टेन ॲक्शन आणि गँगस्टर ड्रामामध्ये आपली ताकद दाखवणार आहे. विशेष म्हणजे, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच याचे डिजिटल हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.
‌’शूटआऊट‌’ फ्रँचायझीने यापूर्वी विवेक ओबेरॉय (माया डोळस) आणि जॉन अब्राहम (मान्या सुर्वे) यांसारखी अजरामर पात्रे दिली आहेत. आता हर्षवर्धन राणे कोणत्या भूमिकेत दिसणार आणि तो पोलीस अधिकारी असेल की गँगस्टर, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.- अपर्णा देवकर

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …