लेख-समिक्षण

यशोगाथा वाडीलाल आइसक्रीमची

उन्हाळा सुरू झाला की आइसक्रीमचा आनंद लुटणार्‍यांची संख्या वाढते. आज बाजारात अनेक मोठे आइसक्रीम ब्रँड्स आहेत, त्यापैकी एक लोकप्रिय नाव म्हणजे वाडीलाल आइसक्रीम. पण हा ब्रँड एका मोठ्या कंपनीसारखा सहज स्थापित झालेला नाही, तर यामागे आहे संघर्ष, मेहनत आणि सातत्याने प्रयत्नांची कहाणी.
वाडीलाल गांधी हे या आइसक्रीमचे जनक. त्यांचा प्रवास मात्र एका अत्यंत लहान व्यवसायापासून सुरू झाला. गुजरातमध्ये 1907 मध्ये त्यांनी फक्त फाउंटन सोडा विकण्यास सुरुवात केली. त्या काळात भारत अजूनही ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, आणि व्यावसायिक वाढीसाठी फारसे मार्ग उपलब्ध नव्हते. आइसक्रीम व्यवसाय सुरू करण्याचा विचार त्यांना आला, पण त्याकाळी आधुनिक उपकरणे नव्हती. त्यांना पारंपरिक कोठी पद्धत वापरून हाताने आइसक्रीम बनवावे लागत असे. त्यासाठी दूध, बर्फ आणि मीठ एकत्र करून एक विशिष्ट हातगाडीवरील मशीनमध्ये मिश्रण फिरवले जाई.
सुरुवातीला व्यवसाय वाढवताना अनेक अडचणी आल्या. कारण लोक आइसक्रीमच्या गुणवत्तेबाबत साशंक होते. तसेचआर्थिक पाठबळ नव्हते. पण त्यांनी हळूहळू व्यवसाय विस्तारत नेला. त्या काळात शीतगृह (कोल्ड स्टोरेज) नव्हते, त्यामुळे आइसक्रीम लवकर वितळत असे आणि साठवणूक करणे कठीण होते. पण वाडीलाल हार मानणार्‍यांपैकी नव्हते. त्यांनी गुणवत्तेवर भर देत ग्राहकांचा विश्वास जिंकला. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणजे 1926 मध्ये त्यांनी पहिल्या आइसक्रीम पार्लरची स्थापना केली. यासाठी त्यांनी जर्मनीहून पहिली आइसक्रीम बनवण्याची मशीन आणली. त्या वेळी भारतात अजूनही अशा तंत्रज्ञानाचा वापर केला जात नव्हता. 1970 मध्ये वाडीलाल गांधींच्या पुढील पिढीने, म्हणजे रामचंद्र आणि लक्ष्मण गांधींनी, व्यवसाय अधिक मोठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. 1990 मध्ये वाडीलालने भारतीय आइसक्रीम बाजाराबाहेर जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली.
बाजारात मांसाहारी घटक असलेल्या आइसक्रीमचा प्रभाव वाढत असताना, त्यांनी शुद्ध शाकाहारी पर्याय दिला. आज भारतासह 45 हून अधिक देशांत वाडीलाल आइसक्रीम पोहोचले आहे. सुरुवातीला आइसक्रीममध्ये मर्यादित असलेला हा ब्रँड आता फ्रोझन भाज्या आणि प्रोसेस्ड फूडमध्येही अग्रस्थानी आहे.1995 मध्ये, वाडीलाल हा अमेरिकेच्या बाजारात फ्रोझन भाज्या आणणारा पहिला भारतीय ब्रँड ठरला.

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …