लेख-समिक्षण

यशाचा राजमार्ग

प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेल ही गळे… हे सुवचन आपण अनेक वर्षे ऐकत आहोत. ध्येयवेड्या तरुणांना आदर्श आणि प्रेरणा देणारी आयएएस विजय वर्धन यांची ही यशोगाथा आहे. 35 वेळा विविध शासकीय सेवांच्या परीक्षांमध्ये अपयश आले. पण त्यांनी हार मानली नाही. अतोनात प्रयत्न करून ते ’आयपीएस’ आणि मग ’आयएएस’ झाले.
विजय वर्धन हे मूळचे हरियाणाचे. त्यांचे शालेय शिक्षण हरियाणातील सिरसा येथे झाले. पुढे त्यांनी हिस्सार येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग केले. इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवल्यानंतर यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी ते दिल्लीला गेले. या परीक्षेची तयारी करीत असताना त्यांनी हरियाणा पीसीएस, यूपीपीएससी, एसएससी आणि सीजीएल या आणि अशा अनेक शासकीय सेवेतील जवळपास 35 परीक्षा दिल्या. पण प्रत्येक परीक्षेत त्यांना अपयशच मिळत गेले. इतके अपयश पाहूनही विजय खचले नाहीत, त्यांनी प्रयत्न करणे कधीही सोडले नाही. उलट अधिक जोमाने तयारीला लागले. विजय वर्धन यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली होती, ज्यात ते अपयशी ठरले होते. मात्र सातत्य आणि चिकाटी यामुळे त्यांनी 2018 मध्ये ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि 104 रँक मिळवत ते ‘आयपीएस’ झाले. पण ‘आयपीएस’ सारखी पोस्ट मिळूनही ते खुश नव्हते, कारण त्यांचे ध्येय काही वेगळे होते. म्हणून त्यांनी 2021 मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि ते ‘आयएएस’ झाले. इतके अपयश मिळूनही त्यांनी आपले ध्येय गाठले. म्हणूनच सध्या ते तरुणांचे आदर्श झाले आहेत.
तरुणांना यशाचा मंत्र देताना विजय वर्धन म्हणतात की, ‘तुम्हीच तुमचे सर्वोत्तम मागर्दर्शक आहात. त्यामुळे जेव्हा एखादा निर्णय घेता तेव्हा त्यावर ठाम राहा आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आपल्या चुकांचे आपणच मूल्यमापन करायचे आणि त्यातून आपणच शिकत राहायचे. म्हणजे एक दिवस यश हे मिळतेच.’

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …