हल्ली सोशल मीडियावर रंगणाऱ्या पॉडकास्टमध्ये आणि रिल्समध्ये मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ ॲट्रॅक्शन यांवर आधारीत व्हिडिओ, मुलाखती यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सकारात्मक विचारांमुळे माणसाच्या आयुष्याला योग्य दिशा मिळते, आनंदी आणि निरोगी जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन गरजेचा आहे, हे खरेच आहे; पण विचारांना कृतीची जोड न देता केवळ काल्पनिक क्रियांनी इच्छित गोष्टी साध्य होतात असे मानणे चुकीचे आहे. मानसशास्त्रज्ञ गॅब्रिएल ओटिंजेन यांनी मेंटल कॉन्ट्रास्टिंग या संकल्पनेवर संशोधन केले. त्यांच्या अभ्यासात असे दिसून आले की, केवळ यशाची स्वप्ने रंगवणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्ष प्रयत्न कमी करतात. कारण मेंदूला आधीच यश मिळाल्याची भावनिक अनुभूती मिळते.
लीकडच्या काही वर्षांत जगभरात मॅनिफेस्टेशन या संकल्पनेची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे. सोशल मीडियावरील प्रभावक, प्रेरणादायी वक्ते, व्यावसायिक प्रशिक्षक, तसेच अनेक चित्रपट आणि पुस्तकांनी या संकल्पनेला एक वेगळीच झळाळी दिली आहे. तुम्ही जे मनापासून विचार करता, ते विश्वातील कॉस्मिक एनर्जी तुम्हाला परत देते, सकारात्मक विचारांनी वास्तव बदलता येते, मनातल्या ऊर्जेने यश आकर्षित करता येते, पैशाच्या नोटेकडे पाहून ‘पैसा ये’ असे म्हटल्याने श्रीमंत होता येते, अशा कल्पनांभोवती मॅनिफेस्टेशनची संपूर्ण रचना उभी करण्यात आली आहे. अनेकांच्या मते, ही मानसिक प्रेरणेची पद्धत आहे, तर अनेकांनी ती अंधश्र्द्धा आणि भ्रम निर्माण करणारे साधन असल्याचे म्हटले आहे. मानसशास्त्र, मेंदूविज्ञान, समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान या सर्व क्षेत्रांत मॅनिफेस्टेशनबाबत गंभीर चर्चा सुरू आहे.
मॅनिफेस्टेशनची मुळे अत्यंत प्राचीन मानली जातात. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात यद्भावं तद्भवति ही कल्पना आढळते. म्हणजे मनात जसा भाव निर्माण होतो, तशा प्रकारचे अनुभव जीवनात घडू लागतात. बौद्ध चिंतनातही विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. पाश्चात्त्य जगात एकोणिसाव्या शतकात न्यू थॉट मूव्हमेंट नावाच्या चळवळीने विचारशक्ती, मानसिक ऊर्जा आणि सकारात्मक कल्पनांचे महत्त्व मांडले. पुढे विसाव्या शतकात नेपोलियन हिल यांच्या थिंक ॲण्ड ग्रो रिच या पुस्तकाने विचारांमुळे यश मिळते ही कल्पना लोकप्रिय केली. त्यानंतर रोंडा बर्न यांच्या द सीक्रेट या पुस्तकाने आणि चित्रपटाने मॅनिफेस्टेशनला जागतिक पातळीवर प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. या पुस्तकात आकर्षणाचा सिद्धांत मांडण्यात आला. त्यानुसार विश्वात एक अदृश्य ऊर्जा कार्यरत असते आणि माणसाचे विचार त्याच स्वरूपाच्या घटनांना आकर्षित करतात.
परंतु विज्ञान या दाव्यांकडे वेगळ्या नजरेने पाहते. मेंदूविज्ञानातील अनेक तज्ज्ञांच्या मते, मॅनिफेस्टेशनमध्ये सांगितले जाणारे काही अनुभव प्रत्यक्षात मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहेत. अमेरिकन न्यूरोसायंटिस्ट अँड्र्यू ह्युबरमन आणि मानसशास्त्रज्ञ कॅरल ड्वेक यांसारख्या अभ्यासकांनी असे स्पष्ट केले आहे की, सकारात्मक विचार केल्याने व्यक्तीची मानसिक तयारी, आत्मविश्वास आणि कृतीची क्षमता वाढू शकते. मेंदूमध्ये रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम नावाची एक यंत्रणा असते. ती आपल्या लक्षाचे केंद्र ठरवते. एखादी व्यक्ती सातत्याने एखाद्या ध्येयाचा विचार करत असेल, तर मेंदू त्या ध्येयाशी संबंधित संधी आणि माहिती अधिक वेगाने ओळखू लागतो. त्यामुळे व्यक्तीला असे वाटते की विश्व तिच्यासाठी काम करत आहे. प्रत्यक्षात मात्र तिचा मेंदूच त्या दिशेने अधिक सजगपणे कार्य करत असतो.मेंदूमध्ये डोपामिन नावाचे रसायन प्रेरणा आणि अपेक्षांशी संबंधित असते. जेव्हा एखादी व्यक्ती भविष्यातील यशाची स्पष्ट कल्पना मनात उभी करते, तेव्हा डोपामिन सक्रिय होते आणि कृती करण्याची ऊर्जा वाढते. यालाच अनेकजण मॅनिफेस्टेशनचा पुरावा मानतात. परंतु विज्ञान असे सांगते की, केवळ विचार करून वास्तव बदलत नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण कृती, कौशल्य, सामाजिक परिस्थिती आणि संधी या घटकांचीही आवश्यकता असते. सकारात्मक विचार मानसिक आधार देऊ शकतात; पण ते भौतिक जगाचे नियम बदलत नाहीत.
जगातील अनेक तज्ज्ञांनी मॅनिफेस्टेशनच्या अतिरेकी प्रचारावर टीका देखील केली आहे. मानसशास्त्रज्ञ गॅब्रिएल ओटिंजेन यांनी मेंटल कॉन्ट्रास्टिंग या संकल्पनेवर संशोधन केले. त्यांच्या अभ्यासात असे दिसून आले की, केवळ यशाची स्वप्ने रंगवणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्ष प्रयत्न कमी करतात. कारण मेंदूला आधीच यश मिळाल्याची भावनिक अनुभूती मिळते. त्यामुळे कृतीची तीव्रता घटते. म्हणूनच त्यांनी वास्तववादी आशावाद महत्त्वाचा असल्याचे सांगितले. म्हणजे ध्येयाची कल्पना करणे आवश्यक असले, तरी अडथळ्यांचे भान ठेवून प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे.
मॅनिफेस्टेशन लोकप्रिय होण्यामागे आधुनिक जीवनातील अस्थिरता हेही एक मोठे कारण मानले जाते. आर्थिक ताण, करिअरमधील स्पर्धा, एकटेपणा आणि मानसिक तणाव यामुळे अनेकांना भावनिक आधाराची गरज वाटू लागली. अशा काळात तुमच्या विचारांतच तुमचे भविष्य दडले आहे ही कल्पना लोकांना मानसिक दिलासा देते. सामाजिक माध्यमांनीही या प्रवाहाला वेग दिला. काही सेकंदांच्या प्रेरणादायी व्हिडिओंमध्ये यश, पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी सहज मिळू शकते असा संदेश दिला जाऊ लागला. त्यामुळे मॅनिफेस्टेशन हे एक सांस्कृतिक आकर्षण बनले.
जपानमध्येही या संकल्पनेचे वेगळे रूप दिसून येते. जपानी संस्कृतीत शिस्त, सातत्य आणि अंतर्मनाची शांतता यांना महत्त्व आहे. इकिगाई ही संकल्पना जीवनातील उद्देश शोधण्याशी संबंधित आहे. तसेच कायझेन पद्धतीत लहान-लहान सुधारणांद्वारे मोठे यश मिळवण्यावर भर दिला जातो. पाश्चात्त्य शैलीतील केवळ इच्छा व्यक्त करून यश मिळते, अशी धारणा जपानी समाजात फारशी स्वीकारली गेलेली नाही. तेथे मानसिक एकाग्रता आणि प्रत्यक्ष कृती यांचा समतोल महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच जपानी अभ्यासक मॅनिफेस्टेशनकडे स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करण्याची पद्धत म्हणून पाहतात; जादुई शक्ती म्हणून नव्हे.
मॅनिफेस्टेशनमुळे लोक फसवले जातात का, हा प्रश्नही आता गंभीरपणे विचारला जात आहे. काही स्वयंघोषित प्रशिक्षक आणि प्रभावक लोकांच्या असुरक्षिततेचा फायदा घेतात. विश्व तुमच्यासाठी काम करेल, फक्त इच्छा करा आणि करोडपती व्हा अशा दाव्यांमुळे वास्तवापासून दूर नेणारा आशावाद निर्माण होऊ शकतो. विशेषतः आर्थिक अडचणीत असलेले किंवा मानसिकदृष्ट्या खचलेले लोक अशा संदेशांवर सहज विश्वास ठेवतात. परिणामी अपयश आल्यास स्वतःलाच दोष देण्याची प्रवृत्ती वाढते. मी पुरेसा सकारात्मक विचार केला नाही अशी अपराधी भावना निर्माण होऊ शकते. मानसशास्त्रज्ञांच्या मते, ही प्रवृत्ती मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
तथापि, मॅनिफेस्टेशनचा प्रत्येक भाग चुकीचा आहे असेही म्हणता येणार नाही. ध्येय स्पष्टपणे मनात उभे करणे, स्वतःवर विश्वास ठेवणे, सकारात्मक दृष्टीकोन राखणे आणि भावनिक स्थैर्य निर्माण करणे या गोष्टी मानवी विकासासाठी उपयुक्त ठरतात. खेळाडू, उद्योजक आणि कलाकार यांच्यामध्ये दृश्यकल्पना तंत्र मोठ्या प्रमाणात वापरले जाते. अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की, एखाद्या कृतीची मानसिक तयारी केल्याने प्रत्यक्ष कामगिरी सुधारू शकते. परंतु हे यश केवळ विचारांमुळे नव्हे, तर विचारांमुळे निर्माण झालेल्या कृतीक्षमतेमुळे मिळते.
आजच्या काळात मॅनिफेस्टेशन ही केवळ आध्यात्मिक संकल्पना राहिलेली नाही. ती बाजारव्यवस्था, सामाजिक माध्यमे, प्रेरणादायी उद्योग आणि मानसिक आरोग्य या सर्व क्षेत्रांशी जोडली गेली आहे. म्हणूनच तिच्याकडे अंधविश्वासाने किंवा पूर्ण नकाराने पाहण्याऐवजी चिकित्सक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. विज्ञान असे सांगते की, विचारांचा मेंदूवर परिणाम होतो, पण विचारांनी विश्वाचे नियम बदलत नाहीत. यशाचे वास्तव हे मानसिकता, प्रयत्न, कौशल्य, परिस्थिती आणि संधी यांच्या गुंतागुंतीच्या संगमातून निर्माण होते. मॅनिफेस्टेशनचा उपयोग प्रेरणा म्हणून होऊ शकतो; परंतु त्याला चमत्कार समजणे धोक्याचे ठरू शकते.- अंजली महाजन, महिला व समाजशास्र अभ्यासक
Check Also
बोलबाला झुरळ पार्टीचा
होर्मुझची सामुद्रधुनी गेल्या 75 दिवसांपासून बंद असल्याने जगातील एकूण इंधन पुरवठ्यापैकी 20 टक्के पुरवठा ठप्प …
पांचजन्य वृत्तपत्र