लेख-समिक्षण

मुलांना आज्ञाधारक कसे बनवावे?

पालक होणे म्हणजे केवळ मूल वाढवणे नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची नीट जडणघडण करणेही असते. प्रत्येक आई-वडिलांना असे वाटते की आपले मूल शिस्तीत, समजूतदार आणि आपले ऐकणारे म्हणजेच आज्ञाधारक असावे. पण मुलांवर जबरदस्तीने शिस्त लादणे किंवा फक्त शिक्षा देणे, हा यासाठीचा मार्ग नाही आणि असूही नये. मुलांना खरोखरच आज्ञाधारक बनवण्यासाठी प्रेम, संयम, समजूतदारपणा आणि सातत्य यांची आवश्यकता असते.
स्वतःचा आदर्श निर्माण करा ः कोणतंही लहान मूल हे अनुकरणशील असतं. यामध्ये पालकांचं अनुकरण करणं हे निसर्गतः मुलांचं प्राधान्य असतं. त्यामुळं तुम्ही जर इतरांशी आदराने बोलत असाल, नियम पाळत असाल आणि वडीलधार्यांचे ऐकत असाल, तर तुमचे मूलही तसंच वागायला शिकेल. याचाच अर्थ मुलांनी आज्ञाधारक बनावं असं वाटत असेल तर पालक आज्ञाधारक, नियमांचं पालन करणारे असणं ही पूर्वअट आहे.
स्पष्ट आणि सुसंगत नियम ठरवा ः काय करावं आणि काय करु नये हे मुलांना स्पष्टपणे आणि वारंवार समजावून सांगावं. उदाहरणार्थ, जेवताना टीव्ही चालू ठेवायचा नाही, हा नियम एकदा सांगून थांबू नये. सातत्यानं सांगणं गरजेचं असतं. पण त्यांच्या वयानुरुप त्याचं लॉजिकल रिझनिंग किंवा तार्किक कारणही देण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, दिवसभराची सगळी ऊर्जा जेवणातून मिळतं. शक्तीही जेवणामुळंच येते. त्यामुळं एरवी तू काहीही कर, पण जेवताना फक्त जेवणावरच लक्ष असलं पाहिजे आणि शांत व व्यवस्थितपणेच जेवलं पाहिजे. अशा काही सौम्य सूचना द्या.
फक्त आदेश नकोत, संवाद ठेवा ः बऱ्याच वेळा आपण फक्त ते कर, ते नको असे म्हणतो. पण बाळाशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे. तू हे का केलंस? किंवा आपण असं का करू नये असं तुला वाटलंं? असे प्रश्न विचारल्यास मूल विचार करू लागते आणि योग्य-अयोग्य यातील फरक समजू लागतो.
प्रेम आणि शिस्त यांचा समतोल राखा ः फक्त शिस्तीवर भर दिल्यास मूल बंडखोर होऊ शकते, आणि फक्त लाडाने वाढवले तर स्वैराचार होतो. त्यामुळं या दोन्हींमध्ये संतुलन साधता आलं पाहिजे. मस्ती करण्याच्या वेळी शिस्त बाजूला ठेवायची आणि अभ्यासादी गोष्टींच्या वेळी प्रेमाचा अतिउमाळा येऊ द्यायचा नाही.
चांगल्या वागणुकीचं कौतुक करा ः मुलांनी एखादी गोष्ट नीट केली, शिस्तीचं पालन केलं किंवा तुमचे ऐकले, तर त्याची भरभरून प्रशंसा करायला विसरु नका. तू खूप छान ऐकलंस, माझं खूप ऐकलंस, मला आनंद झाला, अशा शब्दांनी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
जबाबदारी शिकवा ः लहानपणापासूनच बाळाला छोट्या जबाबदार्या द्या. उदाहरणार्थ, स्वतःची खेळणी आवरणे, शाळेचा गणवेश वेळेवर घालणे, पाणी पिणे, शाळेतून घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन आपला डबा काढून सिंकमध्ये ठेवणे, सॉक्स धुवायचे असतील तर लाँड्रीबॅगेत टाकणे इत्यादी. लहानपणी लागलेली ही शिस्त आयुष्यभर राहते. यासाठी वडिलांनीही या शिस्तीचं पालन करणं गरजेचं ठरतं.
परिणाम शिकवा
© एखादी चूक केल्यावर शिक्षा देण्याऐवजी, त्या चुकीचे परिणाम काय होतील हे समजावून सांगा. उदाहरणार्थ जर तू वेळेवर झोपला नाहीस तर सकाळी तुला शाळेत जायला त्रास होईल, शाळेत झोप येईल, डोळ्यांवर ताण येईल याची त्यांना कल्पना द्या. लक्षात ठेवा, मूल एक -दोन दिवसांत आज्ञाधारक बनत नाही. हे एक सातत्यपूर्ण आणि संयमपूर्वक केले जाणारे काम आहे. चुकूनही लगेच रागावू नका किंवा अपेक्षा सोडू नका. सातत्य ठेवा.चांगली जडणघडण ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे.

 

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …