मुलांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे असतात. त्यामधील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे खोटं बोलण्याची सुरुवात. पालक म्हणून आपल्याला मुलं खोटं बोलतात, तेव्हा आपल्याला चिंता वाटणे, राग येणे स्वाभाविक असते. काही वेळा किंवा आपण स्वतःवरच शंका घेऊ लागतो. परंतु मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून खोटं बोलणं हे मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासाचा एक स्वाभाविक भाग असल्याचं बालमानसशास्राच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. ‘थिअरी ऑफ माइंड’
काल्पनिकता
बहुतांश लहान वयातील मुलं कल्पनेच्या दुनियेत रमणारी असतात. सुपरहिरो, परीकथा, अद्भुत घटना यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव असतो. यामुळेही ती कधी नकळत खोटं बोलतात. पण यामध्ये त्यांचा हेतू फसवण्याचा नसतो. ती फक्त त्यांच्या कल्पनाशक्तीची अभिव्यक्ती असते.
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, लहान मुलांना सुरुवातीला खरे आणि खोटे यातील फरक कळत नाही. साधारणतः वयाच्या ४—५ व्या वर्षापासून मुलांमध्ये ‘थिअरी ऑफ माइंड’ म्हणजेच इतरांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची क्षमता विकसित होते. हाच क्षण असतो जेव्हा मुलं खोटं बोलण्यास सुरुवात करतात. याच टप्प्यावर आपण जे बोलतो ते समोरच्याला खरे वाटू शकते, हे मुलांना समजू लागते. पालकांची भीती
बरेचदा मुलांना शिस्त लावण्यासाठी पालक कठोर भूमिका घेतात. काही जण मारतात, मुलांच्या अंगावर ओरडतात, आया मुलांना चटके देण्याचे, मारण्याचे प्रकारही घडतात. पण यामुळेही बरेदचा घाबरून जाऊन मुलं खोटं बोलतात. कारण त्यांना चुकीसाठी शिक्षा होईल याची भीती वाटते. ही भीती मुलांना सत्य लपवण्यास भाग पाडते.
स्वतःच्या प्रतिमेचे संरक्षण काही वेळा मुलं चूक कबूल न करण्यासाठी खोटं बोलतात, कारण त्यांना आपल्याला कुणी वाईट म्हणेल यापासून संरक्षण करायचं असतं. याचे सर्रास दिसणारे उदाहरण म्हणजे शाळेत कमी गुण मिळाले तरी ते सांगताना मुले ‘सर्वांनीच कमी गुण मिळाले आहेत’ असे सांगतात. ही एक प्रकारची आत्मसुरक्षा असते.
पालकांची वर्तणूक
सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, प्रत्येक मूल हे भवताली घडणार्या घटना-घडामोडी पाहून, निरीक्षण करून शिकत असते, विकसित होत असते. साहजिकच, आई, बाबा, घरातील मोठा भाऊ, आजी-आजोबा सहजपणाने खोटं बोलत असतील तर मुलांकडून खरे बोलण्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल. उदाहरणार्थ, घरात असतानाही ‘मी थोडा बाहेर आहे’ असे सांगणे, मुलाने त्रास दिलेला नसतानाही आईने ‘याने खूप त्रास दिलाय आज मला’ असे बाबांना सांगणे अशा गोष्टी नकळतपणाने मुलांच्या मनावर परिणाम करतात. आपल्या अडचणीच्या वेळी खोटं बोलणं नैतिक दृष्ट्या चुकीचं नाही, असा चुकीचा संदेश मुलांच्या मनावर कोरला जातो. पालकांनी काय करावं?
मुलांना खोटं बोलण्याबद्दल शिक्षा न करता, शांतपणे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
खरे बोलल्यास त्यांचं कौतुक करावं, जेणेकरून ते प्रामाणिकपणा शिकतील.
वडिलधार्यांनी स्वतःच प्रामाणिक राहून मुलांसमोर आदर्श घालून द्यावा. मुलांच्या मनातील भीती दूर करावी, जेणेकरून त्यांना सत्य सांगायला अडथळा वाटणार नाही.
सत्य बोलण्याचे फायदे काय असतात, खोटे का बोलू नये यासंदर्भातील अनेक सत्यकथा, काल्पनिक कथा आपल्याकडे आहेत. त्या नियमितपणाने मुलांना सांगाव्यात. थोडक्यात, खोटं बोलणं ही मुलांच्या मानसिक वाढीतील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती समजून घेऊन, योग्य मार्गदर्शन केल्यास, मुलं प्रामाणिक आणि आत्म विश्वासू व्यक्ती म्हणून घडू शकतात.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र