किशोरवय ही मुलांच्या आयुष्यातील एक अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक अवस्था असते. वयाच्या १२ ते १८ वर्षांदरम्यान शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर झपाट्याने बदल घडत असतात. या बदलांचा प्रभाव त्यांच्या वागणुकीवर, विचारसरणीवर आणि नातेसंबंधांवरही दिसून येतो. या टप्प्यावर मुलं अधिक स्वतंत्रतेकडे झुकणारी, मतप्रदर्शन करणारी, आणि सामाजिकदृष्ट्या जाणीवपूर्वक वागणारी होतात. पण याच वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन, समजून घेणे आणि सुसंवाद साधणे गरजेचे असते. या टप्प्यावर पालकांचा कस लागतो. याच वयात शिक्षणही पुढील संपूर्ण आयुष्याची दिशा ठरणार्या टप्प्यावर येते. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, तर पुढे जाऊन अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या वयातील मुला-मुलींच्या संगोपनात काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
किशोर वयातील मुलं बहुतेक वेळा त्यांच्या मित्रपरिवाराने प्रभावित होतात. त्यामुळे त्यांच्या खर्चाच्या सवयी अचानक बदलू शकतात. अशा वेळी पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. पैशाचे महत्त्व मुलाला समजावून सांगायला हवं. ’गरज’ आणि अनावश्यक खर्च यातला फरक त्याला समजायला हवा. जर मुलं लहान वयात खर्चाचं व्यवस्थापन शिकली, तर हे आयुष्यात खूप फायदेशीर ठरू शकतं. अर्थात प्रत्येक गोष्टीत पैशांचा उल्लेख करणं योग्य नाही, पण कोणत्या वेळी त्याला पैशांचे महत्त्व समजावं, हे समजून घेणं पालकांसाठी आवश्यक आहे.
नैतिक मूल्यांची जाण असणारा मुलगा किंवा मुलगी हे स्वतःसाठी आणि समाजासाठी एक अमूल्य संपत्ती ठरतात. किशोर वय हे नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. यासाठी पालकांनो मुलाला नियमित वेळ द्या, वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून त्याला मूल्यशिक्षण द्या. मुलगा आणि मुलगी दोघांनीही चांगल्या-वाईट गोष्टी ओळखायला शिकलं पाहिजे.
किशोरवयीन मुलं बहुतेक वेळा संभ्रमात असतात. चित्रपट, वेब सिरीज यांसारख्या माध्यमांतून त्यांच्यासमोर अनेक प्रकारची पात्रे येतात. त्यातून त्यांना निर्णय घेणं त्यांच्यासाठी कठीण ठरतं. अशा वेळी पालकांनी त्यांचे मार्गदर्शक व्हायला हवं. काय बरोबर आहे आणि काय चूक, यामधील फरक स्पष्टपणे समजावून द्या. त्याला चांगलं असण्याचं महत्त्व पटवून द्यायला हवं. हे करत असताना मुलाच्या मनात यत्किंचितही शंका राहणार नाही याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.
सुदृढ शरीरातच निरोगी मन वास करते असे म्हणतात. ही गोष्ट किशोर वयात अधिक महत्त्वाची ठरते. मुलाला सुरुवातीपासूनच आरोग्याबद्दल जागरूक बनवा. त्याच्या दिनक्रमामध्ये आरोग्यदायी शिस्त असायला हवी. कोणते अन्न त्याच्या आरोग्यासाठी योग्य आहे आणि कोणते घातक आहे, याबाबत त्याला सजग बनवा. फास्ट फूड आणि कोल्ड ड्रिंकच्या युगात आरोग्याच्या दृष्टीने जागरूकता वाढवणं हे अधिक आवश्यक झालं आहे. त्यासाठी पालकांनीही स्वतःच्या आहारात आरोग्यवर्धक सवयी आत्मसात करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मुलाला ओरडून काही शिकवू नका. त्याच्या मनाचा विचार करून, तर्कसंगत पद्धतीने गोष्टी समजावून द्या आणि त्याला स्वतः निर्णय घेण्यास प्रवृत्त करा. ही शिकवण्याची पद्धत अत्यंत परिणामकारक ठरते.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र