लेख-समिक्षण

मातीतले खेळ

मैदानी खेळ म्हणजे कोणते, असा प्रश्न हल्ली एखाद्या शाळकरी मुलाला विचारला, तर कदाचित मैदानी म्हणजे काय असा प्रतिप्रश्न येण्याची भीती वाटते. मोकळी मैदानेच कमी झाल्याने अनेक शाळांनाही मोठी ग्राऊंड्स नसतात. जी काही मैदाने असतात, त्यावर संध्याकाळी पैसे भरून कॅम्प चालवले जातात. त्यामुळे रस्त्यावर क्रिकेट, फुटबॉल खेळणे किंवा इतर दंगामस्ती करण्याची आपल्या पिढीने घेतलेली मजा कदाचित यापुढे मुलांना घेता येईल, की नाही हीच शंका आहे. दुसरीकडे, पालकही आता अतिप्रोटेक्टिव्ह झाले आहेत. बाहेर खेळायला जाऊन मुलांनी धडपडण्यापेक्षा घरात बसून राहिलेलं हल्ली पालकांना जास्त सुरक्षित वाटतं.
अशा स्थितीमध्ये परवा एक सुखद धक्का बसला. आमच्या भागामध्ये एक मैदान आहे. आजुबाजूच्या परिसरामधील हे एकमेव मैदान असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी संपूर्ण मैदानभर क्रिकेटच्या मॅचेस सुरू असतातच; शिवाय जरा अंधार पडायला लागल्यावर फुटबॉलचे सामनेही रंगतात. संध्याकाळी तिथे फिरायला जाणे हा एक विरंगुळाच असतो. त्या मैदानाच्या जवळपास एका इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे असेल किंवा इतर कुणी काही कामासाठी आणलेली असेल, पण एक दिवस त्या मैदानाच्या एका कोपऱ्यामध्ये लाल मातीचा ढिग येऊन पडला.
पहिल्या दिवशी त्यात नवल किंवा खास लक्ष देण्याजोगं काही वाटलं नाही; पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या ढिगाकडे नजर गेल्यावर जरा बरं वाटलं. कारण, साधारण पाच-सहा वर्षांची तीन-चार मुलं/मुली त्या ढिगावर मनसोक्त बागडत होते. त्या छोट्या डोंगरावर चढणं, तिथे माती उकरून खड्डा तयार करणं, उगाच त्या मातीत लडबडणं असे त्यांचे उद्योग बराच वेळ चालले होते. दुसऱ्या दिवशी ही संख्या अजून वाढली. कदाचित मातीत खेळण्याची गंमत त्यांच्या सवंगड्यांनाही सांगितली असावी. पुढचे दीड-दोन आठवडे त्या ढिगाऱ्यावर मुलांचीच गर्दी जास्त होती. हळुहळू कामासाठी वापर झाल्याने तो ढिगारा कमी कमी होत गेला..
एक दिवस सगळी माती संपली होती.. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक लहान मुलगा हिरमुसला चेहरा करून तिथे उभा होता. कदाचित त्याला खेळायचं होतं मातीत. पण मातीच नव्हती. असे असले, तरीही त्याचं हिरमुसणं जरा बरं वाटलं.. या मुलांची नाळ अगदीच मातीपासून तुटलेली नाही.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …