लेख-समिक्षण

मागे वळून पाहताना…

कोणतीही नवी सुरुवात करताना मागे वळून पाहणे आवश्यक असते. विशेषतः नव्या वर्षाचे संकल्प आखून पुढे मार्गक्रमण करत असतान मागील काळात आपल्याला एखाद्या गोष्टीत अपयश आले असेल, ठरवलेले एखादे उद्दिष्ट साध्य झालेे नसेल तर त्यामागच्या कारणांचा विचार करणे आवश्यक असते. त्याचबरोबर मागील काळात आपण कोणत्या नव्या गोष्टी शिकलो, कोणत्या गोष्टी शिकायच्या राहिल्या याचाही धांडोळा घेतला पाहिजे. त्याचबरोबर यापूर्वी केलेल्या संकल्पांची पूर्तता झाली की नाही याची कारणमिमांसाही करत राहिले पाहिजे. केलेले संकल्प पूर्ण करण्यात कोणत्या अडचणी आल्या आणि या अडचणींवर आपण मात करण्यात का कमी पडलो याचाही आढावा आपण अंतर्मुख होऊन घेतला पाहिजे. त्यातून आपल्याला आपल्या चुका कळू शकतात आणि भविष्यकाळात आपल्या हातून तशा चुकांची पुनरावृत्ती होणे टाळता येऊ शकते.
दिवस येतात आणि जातात; मग मागे वळून कशाला पाहायचे असा विचार अनेक जण करत असतात. मात्र आयुष्यात यशस्वी होण्यासाठी असा विचार करून चालत नाही. यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम स्वतःकडे तटस्थपणे पाहता येण्याची क्षमता विकसित करावी लागते. त्याचबरोबर आपल्या हातून झालेल्या चुका कबूल करण्याची तयारी असायला हवी. अशी तयारी नसलेल्या मंडळींना आयुष्यात यश मिळवणे कठीण जाते. याउलट आपल्या हातून चुका होतच नाहीत, अशा भूमिकेवर अडून राहिलो तर आपली आयुष्यात प्रगती होणे अत्यंत कठीण असते.
आयुष्याच्या ज्या वळणावर उभे आहोत, त्या वळणावर उभे असताना आपले शाळेतले आणि कॉलेजमधील दिवस आठवून पहा. त्या दिवसात आपले वर्तन कसे होते हेही आठवून पाहा. असे केल्याने त्याकाळातील आपल्यातील दोष आज आहेत का, काही चुकीच्या सवयी आज आहेत का यांचा आढावा घ्या.
तसेच नव्या वर्षातील संकल्पपूर्तीसाठी नेहमी स्वतःला ‌‘फोकस्ड‌’ ठेवा. एखादे काम हाती घेतल्यावर ते तडीला न्यायचेच असा आपला दृष्टीकोन असला पाहिजे. हाती घेतलेले काम कसे तडीला नेता येईल याचा बारकाईने विचार केला तर त्यातील अनेक गुंते आपल्याला चटकन सोडविता येतील. नशिबाला दोष देऊ नका, तसेच अपयश आले म्हणून परिस्थितीला दोष देऊ नका. संकटापुढे हार न मानता त्यातून बाहेर पडण्याचा विचार वेळीच केला तर संकटे आपल्यापासून दूर राहतात. प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण प्रसंग अनेकदा येऊन जातात. कुणाला पैशांची अडचण येते, कुणाला कौटुंबिक समस्या भेडसावतात, कुणाची नोकरी अचानक जाते अशा समस्यांमध्ये आपले मन खंबीर ठेवणे अत्यंत आवश्यक असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा. आपल्यावर आलेली परिस्थिती कायम राहणार नाही हे ध्यानात घ्या. आनंद, दुःख हे आपल्या जीवनात क्रमाक्रमाने येत राहतात. आपल्याला जगण्याकरिता अथक संघर्ष करावाच लागतो. या संघर्षात आपल्याला सतत यश येईल असे नसते. काही वेळेला यश मिळते, पण ते मनासारखे नसते. अशा वेळी मनासारखे यश मिळवण्याकरिता आणखी मेहनत घेण्याची गरज असते.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …