भाद्रपद शुल चतुर्थीच्या दिवशी मातीची गणेशमूर्ती तयार करून तिचे यथासांग पूजन करावे आणि वाहत्या पाण्यात ती मूर्ती विसर्जित करावी, असे शास्र सांगते. या व्रताला सिद्धिविनायक व्रत म्हटले जाते. हे व्रत जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, अपकीर्ती निवारणासाठी, कीर्ती पुनःप्राप्तीसाठी केले जाते. कृष्णाला स्यमन्तक मणि चोरीच्या खोट्या आरोपातून मुक्त होण्यासाठी नारदांनी हे व्रत सांगितले होते. महाभारतातील युद्धकाळी कृष्णाने युधिष्ठिरालाही याच व्रताची शिकवण दिली. या व्रताचे पालन श्रद्धेने करणार्या साधकास इच्छित फलप्राप्ती व अखेरीस परमपद प्राप्त होते. समृद्धी, प्रज्ञा, धन, ज्ञान आणि विज्ञान वृद्धिंगत व्हावे, म्हणूनच गणेश चतुर्थी भक्तीभावाने साजरी केली जाते. भारतातच नव्हे तर चीन, थायलंड, जपान, कंबोडिया आणि अफगाणिस्तान येथेही गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेशोत्सवाची खरी ताकद ही त्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीत आहे. त्यामुळे हा लोकोत्सव केवळ धार्मिक न राहता समाजउन्नतीचे साधन व्हावा, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी हा बुद्धीदाता, विघ्नहर्ता, लंबोदर, विनायक, वक्रतुंड, मंगलमूर्ती अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणार्या गणरायाच्या आगमनाचा दिवस. श्रीगणेश हा पराक्रम व प्रज्ञेचा अधिपती आहे. भगवान शंकरांचा ज्येष्ठपुत्र आणि स्कंद अथवा कार्तिकेयाचा अग्रज भाऊ असणारा गणपती हा शंकरशक्तीचे मूर्तिमंत रूप असल्यामुळे त्याला ‘शंकर-पार्वतीपुत्र’ असेही म्हणतात. प्रत्येक शुभकार्यासमयी, मंगल कार्याची सुरुवात करताना सर्वांत आधी गणेशपूजन करावे, असे शास्रांमध्ये सांगितले आहे. गणेश पूजनाने माता आपल्या पुत्रांसाठी सद्गुण व संस्कार लाभावेत अशी प्रार्थना करतात.
गणेशोत्सवाच्या तयारीसाठी चार-सहा महिन्यांपासून मूर्ती कारागीर विविध आकारांच्या मातीच्या गणेशमूर्ती घडवू लागतात. घरोघरी तसेच आकर्षक सजावट केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जातात. ‘मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात मूर्तींची वाजतगाजत मिरवणूक काढत गणरायाचे आगमन होते आणि पुढचे काही दिवस संपूर्ण वातावरण मांगल्याने, चैतन्याने, उत्साहाने भारावून जाते. प्राणप्रतिष्ठा विधी करून गणेशमूर्तीमध्ये दैवी सत्त्वाचे आवाहन केले जाते. मंत्रोच्चार, षोडशोपचार पूजाविधी, प्रसादरूपाने गोड पदार्थ, फुले, नारळ, गूळ, अक्षता अर्पण केल्या जातात. दररोज सकाळ—-संध्याकाळ आरत्या व पूजाविधी केले जातात. रितीपरंपरेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस यथासांग पूजा करुन गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात भाविकभक्त जड अंतःकरणाने गणरायाला निरोप देतात. पाण्यात विलयन हे जीवनचक्राचे, नश्वरतेचे आणि पुनर्निर्मितीचे प्रतीक मानले जाते.
श्रीगणेश हा ज्ञानस्वरुप आणि आनंदस्वरूप आहे. छोटा मूषक त्याचे वाहन आहे. गणपती हा मूलाधार चक्राचे अधिष्ठाता मानला जातो. अथर्वशीर्षामध्ये ‘त्वं मूलाधार स्थितोऽसी नित्यम्’ असे म्हटले आहे. ऐहिक व आध्यात्मिक मार्गातील सर्व अडथळे दूर करून लौकिक यशही प्रदान करणारी देवता म्हणून गणेशाला विघ्नविनायक म्हटले जाते. गणपतीचे बीजाक्षर गं हे असून ओम् गं गणपतये नमः हा गणेश उपासनेचा बीजमंत्र आहे.
गणपती हा ॐकार किंवा प्रणव यांचा प्रतीक आहे. प्रणव हा हिंदुधर्मातील प्रधान मंत्र आहे. कोणतेही कार्य त्याविना संपन्न होत नाही. म्हणून प्रत्येक कार्यापूर्वी गणेशस्मरण करण्याची प्रथा आहे. गणेशाचा गजमुख हा प्रणवरूप असल्याने तोच श्रेष्ठ प्रतीक ठरतो. गणेशाचे दोन चरण हे ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती मानले जातात. उंदरावर आरूढ होणे म्हणजे अहंकाराचा पराभव. त्याच्या हातातील अंकुश हे जगावर प्रभुत्व व दैवी सार्वभौमत्वाचे चिन्ह आहे.
गणेश हा आदीदेव आहे. उंदीर हा लहान जीव, तर हत्ती हा सर्वांत मोठा प्राणी. हत्तीचे मस्तक धारण करणे व उंदरावर स्वार होणे याचा अर्थ असा की सृष्टीतील सूक्ष्म ते स्थूल अशा सर्व प्राण्यांचा अधिपती तोच आहे. तत्वसमूह, इंद्रियसमूह, भूतसमूह इत्यादींचे नेतृत्व करणारा असल्याने गणपतीला ‘गणाध्यक्ष’ म्हटले जाते. वैष्णव संप्रदायातही गणपतीची पूजा केली जाते. त्याला थुंबिक्कै आळवार हे नाव दिले आहे.
गणपती उपनिषद गणेशाला परब्रह्म मानते. ब्रह्मवैवर्तपुराणातील गणेशखंडांत त्यांच्या अनेक आख्यायिका वर्णिल्या आहेत. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लम्बोदर, विघ्नराज, विनायक, धूम्रकेतु, गणाध्यक्ष, बालचंद्र, गजानन, वक्रतुंड, सुरपर्ण, हेरंब, स्कन्दपूर्वज, सिद्धिविनायक, विघ्नेश्वर अशी गणपतीची अनेक रुपे आहेत.
भाद्रपद शुल चतुर्थीच्या दिवशी मातीची गणेशमूर्ती तयार करून तिचे यथासांग पूजन करावे आणि वाहत्या पाण्यात ती मूर्ती विसर्जित करावी, असे शास्र सांगते. या व्रताला सिद्धिविनायक व्रत म्हटले जाते. हे व्रत जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, अपकीर्ती निवारणासाठी, कीर्ती पुनःप्राप्तीसाठी केले जाते. कृष्णाला स्यमन्तक मणि चोरीच्या खोट्या आरोपातून मुक्त होण्यासाठी नारदांनी हे व्रत सांगितले होते. महाभारतातील युद्धकाळी कृष्णाने युधिष्ठिरालाही याच व्रताची शिकवण दिली. देवांनी अमृतप्राप्तीसाठी, दमयंतीने पती नळप्राप्तीसाठी, रामाने सीता परत मिळविण्यासाठी, इंद्राने वृत्रासुरवधासाठी, भगीरथाने गंगावतरणासाठी, द्रौपदीने व साम्बाने अनारोग्य निवारणासाठी हे व्रत केल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. या व्रताचे पालन श्रद्धेने करणार्या साधकास इच्छित फलप्राप्ती व अखेरीस परमपद प्राप्त होते. समृद्धी, प्रज्ञा, धन, ज्ञान आणि विज्ञान वृद्धिंगत व्हावे, म्हणूनच गणेश चतुर्थी भक्तीभावाने साजरी केली जाते. गणेश चतुर्थी केवळ भारतातच नव्हे तर चीन, थायलंड, जपान, कंबोडिया आणि अफगाणिस्तान येथेही साजरी केली जाते. चीनमध्ये ‘कांगी टेन’ नावाच्या देवतेची पूजा केली जाते. इंडोनेशियाच्या चलन नोटेवर गणेशाची प्रतिमा आहे. तसेच कंबोडियात त्याला ‘प्राह केनेस’ या रूपात पूजले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, श्रीगणेश हे महाभारताचे लेखक आहेत. महान ऋषी व्यास महाभारताचे पठण गणेशाला केले आणि गणेशाने ते अविरतपणे लिहिले.
इतिहासावर दृष्टिक्षेप टाकला तर मराठा साम्राज्याच्या काळात गणेशोत्सव महाराष्ट्रातल्या परंपरेचा भाग झाला. स्वातंत्र्य चळवळीत जनआंदोलनाचे व सांस्कृतिक—धार्मिक ऐयाचे प्रतीक बनविण्याचे कार्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस केले. १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी घरगुती उत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. ब्रिटिश राजवटीत राजकीय विरोधावर बंधने होती, पण धार्मिक सणांवर हस्तक्षेप नव्हता. त्यामुळे गणेशोत्सव हा लोकजागृतीचा आणि राष्ट्रीय एकतेचा मंच बनला.आज गणेशोत्सव हा भारतातील सर्वांत लोकप्रिय व सर्वधर्मसमभावाने साजरा होणारा सण म्हणून ख्यातकिर्त पावला आहे.
गणेशोत्सवाचा प्रवास दीडशे वर्षांहून अधिक झाला आहे. या काळात समाज, राजकारण, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान यात अनेक बदल झाले. या सर्व बदलांशी गणेशोत्सवानेही स्वतःला जुळवून घेतले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा यांच्याबरोबरच परदेशात राहणारे भारतीय समुदायही मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, दुबई, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित केले जातात. यामुळे हा उत्सव भारतीय ओळखीचा एक जागतिक सांस्कृतिक ब्रँड बनला आहे. गणेशोत्सवाची खरी ताकद ही त्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीत आहे. त्यामुळे हा लोकोत्सव केवळ धार्मिक न राहता समाजउन्नतीचे साधन व्हावा, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.-पं. विजयशास्री जोशी, अध्यात्म अभ्यासक
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र