लेख-समिक्षण

महिला क्रिकेटसंघाला लाभलेले ‘अमोल’ रत्न

भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या अमोल मजूमदार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवून जागतिक मंचावर भारतीय क्रिकेटचा डंका वाजवला आहे.
ऑटोबर २०२३ मध्ये बीसीसीआयने अमोल मजूमदार यांची भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीमुळे संघाने तांत्रिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर विलक्षण प्रगती साधली. अमोल यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण न करता देखील ‘दिग्गज’ या दर्जाची ओळख निर्माण केली. मुंबई आणि नंतर आसाम संघासाठी खेळताना त्यांनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये असंख्य विक्रम केले. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या खेळाडूंपैकी ते एक ठरले. त्यांना ‘भविष्याचा तेंडुलकर’ अशी बिरुदावली मिळाली.
त्यांचा क्रिकेट प्रवास अशा काळात सुरू झाला, जेव्हा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांचा सुवर्णकाळ सुरू होत होता. अमोल यांनी आपले शिक्षण बीपीएम हायस्कूलमध्ये घेतले आणि नंतर गुरु रमाकांत आचरेकर यांच्या सल्ल्याने शारदाश्रम विद्यालयात प्रवेश घेतला, जिथे त्यांची सचिन तेंडुलकर यांच्याशी ओळख झाली. त्या काळात मुंबईतील तरुण क्रिकेटपटूंमध्ये अमोल मजूमदार हा नाविन्यपूर्ण आणि स्थिर फलंदाज म्हणून चर्चेत होता.
१९९४ मध्ये इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या भारतीय अंडर-१९ संघाचे ते उपकर्णधार होते. त्यांनी राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्यासोबत ‘इंडिया ए’ संघातूनही खेळ केले. परंतु, सचिन-द्रविड-गांगुली या त्रिकुटाच्या उभारामुळे त्यांना वरिष्ठ राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही. तरीदेखील, त्यांनी कधीही हार मानली नाही.
२००६-०७ च्या हंगामात मुंबई संघाचे नेतृत्व करताना त्यांनी रणजी ट्रॉफी जिंकवून आणली. त्या हंगामात त्यांनी अशोक मांकड यांचा दीर्घकाळ टिकलेला विक्रम मोडला आणि संघासाठी सर्वाधिक धावा केल्या.
२०२३ मध्ये भारतीय महिला राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी संघात अनेक बदल केले. खेळाडूंमध्ये फिटनेसविषयी काटेकोरता आणली, मानसिक ताकद वाढवण्यासाठी मनोवृत्ती प्रशिक्षण सुरू केले, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधुनिक क्रिकेटच्या गतीला साजेशा आक्रमक खेळाची संस्कृती रुजवली. त्यांनी देशांतर्गत प्रतिभावान महिला खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष योजना तयार केल्या, ज्याचा थेट परिणाम आजच्या महिला क्रिकेटच्या यशात दिसतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघ केवळ सामने जिंकत नाही तर पुढील पिढीतील मुलींसाठी आत्मविश्वास आणि प्रेरणेचे प्रतीक बनला आहे.
आत्मविश्वास, तांत्रिक परिपक्वता आणि रणनीती च्या बळावर अमोल मजूमदार यांनी फलंदाज म्हणून विक्रम मोडले आणि प्रशिक्षक म्हणून मर्यादा मोडल्या हे खरे नाही काय?

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …