व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याविरोधात अमेरिकेने केलेली लष्करी कारवाई आणि त्यानंतर त्यांना अटक करून थेट अमेरिकेत नेण्याची घटना ही आधुनिक जागतिक राजकारणातील एका अत्यंत धोकादायक अध्यायाची नांदी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेने ज्या पद्धतीने एका सार्वभौम राष्ट्राच्या सीमा ओलांडून तिथल्या राष्ट्राध्यक्षाला ताब्यात घेतले, ते पाहता आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियम आता केवळ कागदावरच उरले आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. अमेरिकेची ही कृती म्हणजे जागतिक निरंकुशतेचे आणि एकाधिकारशाहीचे टोक असून, यातून जागतिक शांततेला मोठा सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे मादुरो यांच्यावर हुकूमशाहीचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असताना, दुसरीकडे लोकशाहीच्या रक्षणाचे सोंग घेऊन अमेरिकेने केलेले हे आक्रमण प्रत्यक्षात साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेचाच भाग असल्याचे स्पष्ट होते. व्हेनेझुएलातील राजकीय पेचप्रसंग नवा नाही. निकोलस मादुरो यांनी गेल्या अनेक वर्षांपासून देशावर आपली पकड घट्ट केली होती. त्यांच्या कार्यकाळात व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली, महागाईने आकाशाला गवसणी घातली आणि लाखो नागरिकांना अन्नान्न दशा झाल्यामुळे देश सोडून जावे लागले. या परिस्थितीसाठी मादुरो यांचे चुकीचे आर्थिक धोरण आणि त्यांची दडपशाही कारणीभूत असल्याचे बोलले जाते. मादुरो यांनी निवडणुकांमध्ये फेरफार केले आणि विरोधकांचा आवाज दडपला, हे आरोपही नाकारता येणार नाहीत. मात्र, एखाद्या देशातील अंतर्गत प्रश्नांची सोडवणूक ही तिथल्या जनतेने किंवा आंतरराष्ट्रीय राजनैतिक मार्गांनी होणे अपेक्षित असते. त्याऐवजी अमेरिकेने लष्करी बळाचा वापर करून थेट राष्ट्राध्यक्षांनाच अटक करणे, हे कोणत्याही लोकशाही मूल्यांमध्ये बसणारे नाही. अमेरिकेचा हा डोळा मादुरो यांच्या हुकूमशाहीपेक्षा तिथल्या अफाट तेल साठ्यांवर अधिक आहे. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वाधिक कच्चे तेल उपलब्ध आहे. अमेरिकेने आपल्या मोहिमेचा खर्च व्हेनेझुएलाच्या तेल महसुलातून वसूल केला जाईल, असे जे म्हटले आहे, त्यावरून त्यांचा खरा हेतू स्पष्ट होतो. ही लोकशाहीची स्थापना नसून नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करण्याची एक पद्धतशीर योजना आहे. इतिहासात डोकावून पाहिले तर इराक आणि अफगाणिस्तानची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. तिथेही सद्दाम हुसेन आणि तालिबानला हटवण्याच्या नावाखाली अमेरिकेने हस्तक्षेप केला, परंतु आज इतक्या वर्षांनंतरही त्या देशांमध्ये स्थिरता आलेली नाही. व्हेनेझुएलाच्या बाबतीतही याचीच पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. आज अमेरिकेने व्हेनेझुएलात हे केले, उद्या ते इतर कोणत्याही देशात आपल्या सोयीनुसार लष्करी हस्तक्षेप करू शकतात, ही भीती आता सर्वांनाच वाटू लागली आहे. यामुळे एक प्रकारे जागतिक अराजकतेची स्थिती निर्माण होऊ शकते.- प्रसाद पाटील
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र