लेख-समिक्षण

महती नवरात्रोत्सवाची

भारताच्या सर्वच प्रांतात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रोत्सव आणि त्यानंतर येणारा विजयादशमीचा उत्सव उत्साहात साजरे होतात. भारतीय संस्कृतीने पुरुष देवता असतानाही शक्ती देवता म्हणून स्त्री देवतेला उभे करुन महिषासुरासारखा बलदंड राक्षस तिच्या हातून वध करवून घेतला. तिचा हा मोठा पराक्रम सांगण्यासाठी मोठी परंपरा निर्माण झाली. असुरी शक्ती जेव्हा दैवी शक्तीविरुद्ध युद्ध करते तेव्हा त्याचे प्रतिक म्हणून नवरात्र साजरी केली जाते.
नवरात्र उत्सवाचे मूळ स्वरूप पाहता देवीच्या अध्यात्मरुपाची जाणीव करून घेणे महत्त्वाचे ठरते. देवीची उग्र आणि सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य रूपे आहेत; तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. याशिवाय भद्रकाली, महामारी, रक्तदंतिका ही तिची अतिउग्र किंवा महारौद्र रूपे मानली जातात. दुर्गेच्या रूपात ती महिषमर्दिनी आणि सिंहारुढ आहे. कालीच्या रुपात ती सर्पवेष्टित आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैकुंठात महालक्ष्मी, भूलोकांत राधिका, शिवलोकांत पार्वती आणि ब्रह्मलोकांत सरस्वती या स्वरूपांत ती नांदत आहे. प्रकृतीपुरुषात्मक आणि शून्यशून्यात्मक जगत हे या आदिशक्तीपासून उत्पन्न झाले आहे. तिच्या सामर्थ्याची पूजा करण्याची परंपरा अनंत कालापासून चालत आलेली आहे.
मार्कंडेय पुराणातील ‘देवी महात्म्य’ या ग्रंथात देवीची महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा त्रिविध रुपांचे वर्णन आलेले आहे. ही तिन्ही रूपे अनुक्रमे शरीरबल, संपत्तीबल आणि ज्ञानबलाची प्रतिके आहेत. देवी ही आदिदैविक स्वरूपात असुरांचा आणि अध्यात्मिक रुपात अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करते. ज्या-ज्यावे़ळी धर्माला ग्लानी येते व अधर्म वाढतो, त्या त्यावेळी सज्जनांना त्रास होतो. अशा वेळी मी अवतार घेऊन अधर्माचा नाश करतो आणि सज्जनांकरवी सुखाची गुढी उभारतो असे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे. अशाच प्रकारचे वर्णन देवीभागवतातील सप्तम स्कंदात आले आहे. आपल्याकडे शारदीय नवरात्रामध्ये घराघरांमध्ये घट बसवले जातात, घराघरातील मुली नवरात्रीचा भोंडा करतात, हातात पोत घेऊन संबळ वाजवत देवीची भुत्ये दारोदारी येऊन देवीची गाणी गाऊ लागतात. ज्ञानाचा पोत पाजळत बोध-परडी हाती घेऊन देवीचा उदो उदो म्हणजेच जयजयकार करीत भुत्ये नाचू लागतात आणि गावागावांत, घराघरात देवीचे चैतन्य अवतरते. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रोत्सव आणि त्यानंतर येणारा विजयादशमीचा उत्सव हा भारताच्या सर्वच प्रांतात उत्साहात साजरा केला जातो. लौकिक आणि पारलौकिक, व्यावहारिक आणि अध्यात्मिक, व्यक्तिगत आणि सामुहिक, धार्मिक आणि सामाजिक, भावनिक आणि सांस्कृतिक अशा विविध अंगांनी या उत्सवाचे स्वरूप जनमानसासमोर उभे राहते. भक्ती, शक्ती, नीती आणि कृती या सार्‍याचा आदर्श मानणार्‍या, लोकोत्सवाचे एकीकडे लौकिक रूप मानत असताना त्या उत्सवामागील कल्पना, मूळ रूप, उत्सवाचे स्वरूप आणि त्यामागे दडलेले रूपक समजावून घेणे आवश्यक आहे.
असुरी शक्ती जेव्हा दैवी शक्तीविरुद्ध युद्ध करते तेव्हा त्याचे प्रतिक म्हणून नवरात्र साजरी केली जाते. देवीचे सांप्रत रूप हे दैत्य संहाराचे आहे व ते सर्वार्थाने रुढ झाले आहे. शारदीय नवरात्रात देवी नऊ दिवस दैत्यांबरोबर युद्ध करते. यासंबंधी अनेक पौराणिक आणि भावदर्शी रसाळ लोककथा रुढ झाल्या आहेत. देवीच्या या लोककथांमधून तिच्या अध्यात्मिक रुपाबरोबरच सुंदर असे लोकरूपही उभे राहते आणि देवी या संकल्पनेशी भावनिक नाते जोडले जाते.
नवरात्रोत्सवाशी अनेक धार्मिक, पौराणिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संदर्भ जोडले गेले असले तरी प्राचीन काळापासून भारतातील कृषीप्रधान संस्कृतीचा हा एक कृषीलोकोत्सव आहे. घटस्थापनेच्या दिवशी आपण घट बसवतो. या घटामध्ये वेगवेगळी धान्ये टाकली जातात. ही धान्ये नऊ दिवसांमध्ये उगवून ती देवीला वाहिली जातात. यामागचा नेमका दृष्टिकोन समजून घेणे गरजेचे आहे. घटस्थापनेच्या दिवशी आपल्या शिवारातील वावरी, म्हणजे आपल्या शेतातील माती त्या घटस्थापनेच्या परडीत टाकून त्यात विविध प्रकारचे धान्य टाकले जाते. या मातीला तेव्हा नऊ रेघा ओढल्या जातात आणि आपल्या शिवारातील पिकातील एक-एक बी टाकले जाते. मध्यभागी घट बसवलेला असतो आणि त्या घटात पाणी असते. या घटातून मग ठिबक पद्धतीने त्या घटातील मातीला आणि पर्यायाने बियांना पाणी मिळते. पलीकडच्या बाजूस एक एरंडेल तेलाचा दिवा असतो. एरंडेलाच्या दिव्यामुळे उष्णता निर्माण होऊन जंतू मरतात आणि घटाच्या आसपासचे वातावरण शुद्ध होते. नऊ दिवस अशा ठिबक पद्धतीने त्या परडीतील धान्याला पाणी मिळाल्यानंतर नऊ दिवसांनंतर त्या परडीतील कुठल्या रांगेतील कुठले धान्य टवकारून उगवले आहे, ते धान्य यावर्षीच्या वातावरणात आपल्या शेतात चांगल्या प्रकारे उगवेल अशी अटकळ बांधली जात असे. त्या नऊ दिवसांत चांगले उगवलेले पीकच शेतकरी आपल्या शेतात त्यावर्षीचे पीक म्हणून लावले जाते. शेवटच्या दिवशी म्हणजे दसर्‍याच्या दिवशी तो तुरा म्हणून मानाने मिरवला जातो. त्यामुळे घटस्थापना ही घराघरातील कृषीप्रयोगशाळाच आहे त्यामुळे या उत्सवाला अध्यात्मिक संदर्भ असले, तरी त्याचा महत्त्वाचा संदर्भ हा कृषीसंस्कृतीचा आहे. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये लोकप्रिय असणारा हा सण प्रारंभी एक कृषीलोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेल्या शेतातील पीक घरी आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करत असे. नवरात्रातील घटस्थापना, उगवून आलेले अकुंर ह्या सार्‍या गोष्टी या उत्सवाचे मूळ कृषीस्वरूप व्यत करणार्‍या आहेत, हे लक्षात येते. सीमोलंघन, शमी पूजन, अपराजिता पूजा आणि शस्त्रपूजा या चार महत्त्वांच्या घटकांमध्ये या उत्सवाचे लौकिक रुप विभागलेले आहे. — चिं. वि. खाडीलकर

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …