लेख-समिक्षण

मल्याळम सिनेमातील अमिताभ

अलीकडेच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मल्याळम अभिनेते मोहनलाल यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत अनेक भाषांतील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. भारतीय सिनेमावर मोहनलाल यांचा प्रभाव अनुपम मानला जातो. पडद्यावर प्रभावी उपस्थितीमुळेच ते नेहमीच इतरांहून वेगळे भासतात. ते देशातील सर्वाधिक सन्मानित अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांना मल्याळम चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चन अशी उपाधी दिली गेली आहे. संवादफेक आणि भावनांचे चित्रण यांत त्यांची खासियत दिसून येते. ते गायक आणि चित्रपट निर्मातेही आहेत. मलयालम सिनेमाला जागतिक प्रसिद्धी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा हातभार आहे.
केरळ हे देशातील लहान राज्यांपैकी एक आहे आणि येथे बोलली जाणारी मल्याळम भाषा मर्यादित कक्षेतली आहे. या भाषेत चित्रपटही बनतात, परंतु जेव्हा मल्याळम चित्रपटांचा उल्लेख होतो तेव्हा चर्चा एका अभिनेत्यापासून सुरू होऊन त्यांच्याच नावावर संपते. हे म्हणजे सार्वकालीक लोकप्रिय अभिनेते मोहनलाल. मोहनलाल यांनी मलयालम सिनेमाला जागतिक पातळीवर ओळख दिली. अभिनयाच्या दृष्टीने या चित्रपटसृष्टीला त्यांनी समृद्ध केले, तर व्यावसायिक दृष्टिकोनातून मलयालम चित्रपट उद्योगाला बळकटी दिली. त्यांना मल्याळम चित्रपटसृष्टीचा अमिताभ बच्चन म्हटले जाते. या कलाकाराने चार दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत जवळपास ४०० चित्रपटांत काम केले आहे. मल्याळम व्यतिरिक्त तेलुगु व तमिळ चित्रपटांतही त्यांनी आपली छाप उमटवली. त्यांचा सहज अभिनय हा देशातील श्रेष्ठ अभिनेत्यांच्या यादीत त्यांना स्थान मिळवून देतो.
भारतीय चित्रपटसृष्टीतही मोहनलाल यांचे योगदान मोलाचे आहे. ते केवळ अभिनेते नाहीत तर चित्रपट निर्माते आणि पार्श्वगायक देखील आहेत. त्यांच्या अभिनयातील असामान्य नैसर्गिकता आणि गहिरेपणा प्रेक्षकांना भारावून टाकतात. कथकली व भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्यांचे सादरीकरण त्यांनी सहजतेने केले आहे. पडद्यावर कलारी या मार्शल आर्टमधील प्रावीण्य त्यांनी दाखवले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मोहनलाल हे मलयालम सिनेमातील बहुविध कलाकारांपैकी एक आहेत. अभिनयासोबत सांस्कृतिक विविधतेचा आणि व्यावसायिक क्षमतेचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. त्यांचे हे वैशिष्ट्य त्यांना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही खास बनवते.
सर्वोत्तम मल्याळम चित्रपट दिल्याबद्दल मोहनलाल यांना पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. १९९० मध्ये ‘किरीदम’साठी विशेष ज्युरी पुरस्कार, १९९२ मध्ये ‘भारतम’साठी सर्वोत्तम अभिनेता, २००० मध्ये ‘वनप्रस्थानम’ या फीचर फिल्मसाठी, त्याच वर्षी पुन्हा ‘वनप्रस्थानम’साठी सर्वोत्तम अभिनेता आणि २०१७ मध्ये ‘जनता गैराज, मुन्थिरिवल्लिकल थलिर्ककुंभोल, पुलिमुरुगन’साठी विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आले. या मलयालम सुपरस्टारला २००१ मध्ये पद्मश्री आणि २०१९ मध्ये पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले.
दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित होणारे मोहनलाल हे दुसरे मल्याळी स्टार ठरले आहेत. याआधी २००४ मध्ये मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांना हा सन्मान मिळाला होता. अदूर यांनी एलिप्पथायम, मुखामुखम, मतिलुकल आणि निजालकुथु यांसारख्या चित्रपटांनी मल्याळम सिनेमाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली. योगायोग असा की मोहनलाल आणि अदूर गोपालकृष्णन हे दोघेही केरळमधील पथानामथिट्टा जिल्ह्यातले आहेत. एका कलाकाराने अविस्मरणीय अभिनयातून आणि दुसर्‍याने वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शनातून प्रेक्षकांची मने जिंकली.
सर्वोच्च सन्मान मिळाल्यानंतर मोहनलाल म्हणाले की, मला हा प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मान मिळाल्याने अपार अभिमान वाटतो आहे. मल्याळम सिनेमाचे प्रतिनिधित्व करताना सर्वात कमी वयाच्या पुरस्कार विजेत्या म्हणून मला सन्मानित करण्यात आल्याने मी अत्यंत गौरव अनुभवतो आहे. हा संपूर्ण मल्याळम सिनेमा समुदायाचा सन्मान आहे. हा पुरस्कार त्यांनी मलयालम चित्रपटसृष्टीची परंपरा, सर्जनशीलता आणि सहनशीलतेला अर्पण केला. त्यांनी तो केरळच्या प्रेक्षकांनाही समर्पित केला, ज्यांनी त्यांच्या कलेला वर्षानुवर्षेप्रेम व समजूतदारपणाने सांभाळले. तसेच हा पुरस्कार त्या सर्व कलाकारांना श्रद्धांजली आहे, ज्यांनी आपल्या प्रतिभा आणि परिश्रमाने सिनेमात अमिट ठसा उमटवला, असेही ते म्हणाले.
अभिनयाच्या बाबतीत मोहनलाल यांची तुलना अनेकदा अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाते, आणि ती योग्यही आहे. अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असे नाव आहे, ज्यांची अभिव्यक्ती, गांभीर्य आणि अभिनय शैली विलक्षण आहे. ते संवादफेक आणि भावनांचे प्रकटीकरण प्रभावीपणे करतात. त्याचप्रमाणे मोहनलाल यांच्यात मेथड अ‍ॅटिंगसोबतच स्टारडमचे विलक्षण मिश्रण आहे. ते शोकांतिका, विनोद, मेलोड्रामा किंवा प्रणय कोणतेही कथानक सहजतेने साकारतात. त्यांच्या भावनिक अभिव्यक्तीला नैसर्गिक व प्रेरणादायी असे वर्णन केले जाते. स्वतः अमिताभ बच्चन यांनी मोहनलाल यांच्या सहजतेची आणि गहन अभिनय क्षमतेची प्रशंसा केली आहे. जसे अमिताभ बच्चन यांनी हिंदी सिनेमाला नवे शिखर गाठून दिले, तसेच मोहनलाल यांनाही मलयालम चित्रपटसृष्टीत महानायकासारखी पूजा केली जाते. देशातील अनेक भाषांतील कलाकारांनी मोहनलाल यांच्या अभिनयाला व त्यांच्या प्रयत्नांना सलाम केला आहे. दृश्यम आणि एम्पुराण यांसारख्या चित्रपटांनी मलयालम सिनेमाला जागतिक पातळीवर स्वतंत्र ओळख दिली आहे. वर्ष २०१० मधील कंधार या चित्रपटात हे दोन्ही महानायक एकत्र झळकले होते.
इतर भाषांतील लोकप्रियता
मोहनलाल यांनी हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. कंपनी (२००२) हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता, ज्यासाठी त्यांना ‘आयफा’ आणि ‘स्टार स्क्रीन अवॉर्ड’ मिळाले. राम गोपाल वर्मा की आग हा १९७५ च्या ‘शोले’ चित्रपटाचा रिमेक होता, ज्यात मोहनलाल यांनी इंस्पेटरची भूमिका केली. त्यांच्या अनेक लोकप्रिय मलयालम चित्रपटांचे हिंदीत डबिंग झाले आणि तेही आवडले गेले, जसे क्रिमिनल लॉयर शिवराम आणि गीतांजली. तसेच काही मल्याळम चित्रपटांचे हिंदी रिमेकही झाले. किलुक्कमचा रिमेक मुस्कुराहट, तर पूचक्कारु मूक्कुथीचा रिमेक हंगामा या नावाने झाला. तमिळ आणि मलयालम चित्रपटांचे हिंदी डब्सही प्रेक्षकप्रिय झाले.
चार दशकांची अभिनय यात्रा पूर्ण केल्यानंतरही मोहनलाल दमलेले नाहीत. उलट पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनीच म्हटले की, आता आणखी जबाबदारीने आणि जोमाने ते आपले काम करतील. – सोनम परब

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …