लेख-समिक्षण

भेदाभेद भ्रम

र्धेचा जमाना आहे. जोरात धावायचं आहे. पहिला येईल त्याला मोठी संधी आहे. मागे राहील त्याची बरबादी निश्चित आहे. शहरातला असो वा खेड्यातला, श्रीमंत असो वा गरीब, इंटरनॅशनल स्कूलमधला असो वा जिल्हा परिषदेच्या शाळेतला… स्पर्धा सर्वांसाठी एकच आहे. माध्यमिक शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण करायचं आणि उच्च शिक्षणासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा द्यायची. चांगल्या गुणांनी पदवी संपादन करायची आणि लगेच स्पर्धा परीक्षा द्यायच्या. त्यात टिकला तो टिकला. शक्ती कितीही असो, या शर्यतीत त्वेषाने धावावंच लागेल. आणि आता… ही स्पर्धा कमी पडली म्हणून की काय, यंत्रमानवही स्पर्धेत उतरलाय. साठ-सत्तर लोकांचं काम एकटा करू शकणारा हा शक्तिमान यंत्रमानव, चॅट जीटीपी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्याशी स्पर्धा करायची आहे. त्यात टिकला तर जिंकला. अन्य पर्याय नाही. भले-भले सांगून थकले, नवतंत्रज्ञानाशी मैत्री करा. त्याच्याशी जुळवून घ्या. पन्नास जणांचं काम जो एकटा करतो, त्याला ‘हँडल’ करायला शिका. जे एकोणपन्नास जण स्पर्धेतून बाहेर फेकले जातील, त्यांचा विचार करू नका. स्वतःच्या पायापुरती वहाण कापा आणि धावायला लागा. ऑनलाइन, ऑफलाइन कोर्सेस उपलब्ध आहेत. ते करा आणि तुमची जागा फिक्स करा. एकदा गाडी चुकली, की पश्चात्तापाला पर्याय नाही. इतकं कानीकपाळी ओरडून सांगितलं तरी लोक अजूनही जुन्याच रस्त्यावर शर्यत का खेळताहेत?
परिस्थितीचं गांभीर्य ज्यांना अजूनही कळलेलं नाही, त्यांच्या ते लक्षात यावं म्हणून की काय, आता मानव आणि यंत्रमानव यांच्यात मॅरेथॉन शर्यत होणार आहे. एकवीस किलोमीटरची. वीस कंपन्यांनी तगडे ह्युमनॉइड्स तयार केलेत. चीनमध्ये लवकरच होणार्‍या या मॅरेथॉनमध्ये 21 हजार माणसं यंत्रमानवाशी डायरेक्ट स्पर्धा करणार आहेत. पहिल्या तीन स्पर्धकांना रीतसर बक्षिसं मिळणार आहेत, मग तो मानव असो वा यंत्रमानव! शर्यतीत सहभागी होऊ इच्छिणार्‍या यंत्रमानवाचा ‘स्टँडर्ड आकार’ निश्चित करण्यात आलाय. अर्धा मीटर ते दोन मीटर या दरम्यान यंत्रमानवाची उंची असायला हवी. कमरेपासून पायाचा आकार जास्तीत जास्त 0.45 मीटर असायला हवा. हे ह्युमनॉइड दोन प्रकारचे असतील. स्वतःच्या मर्जीनुसार धावू शकणारे आणि ‘ऑपरेटर’च्या इशार्‍यावर म्हणजे रिमोट कंट्रोलवर धावणारे. धावताना जर एखाद्या ह्युमनॉइडची बॅटरी संपली, तर ती बदलण्याची मुभा ऑपरेटरला असेल. मॅरेथॉनमध्ये धावणार्‍या हाडामांसाच्या माणसांसाठी ज्याप्रमाणं जागोजागी पाण्याची सोय केली जाते, तसंच हे असेल. ज्यांना शर्यतीत भाग घेता येईल, त्यांनी घ्यायला हवा, किंवा किमान ही शर्यत गांभीर्यानं पाहायला तरी हवीच.
तसं पाहायला गेलं तर चीन हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश. तथापि, काही वर्षांपूर्वी राबवलेल्या संततीनियमनाच्या धोरणांमुळं आता ‘वर्कफोर्स’ कमी आणि म्हातारे-कोतारे जास्त, अशी तिथली स्थिती. त्यामुळं यंत्रमानवांकडून काम करवून घेण्यावाचून पर्याय नाही. म्हणूनच जगातले एकंदर 51 टक्के यंत्रमानव एकट्या चीनमध्ये काम करताहेत. या मॅरेथॉनचा आपल्यासाठी आणखी एक स्पष्ट संदेश आहे. मानव आणि यंत्र एवढाच भेद यापुढे राहील. त्यामुळं जाती, धर्म, वंश, भाषा, प्रांत, लिंग यावरून माणसा-माणसात आणखी किती काळ भेदाभेद करायचा, हे आपलं आपणच ठरवायचंय.-हिमांशू चौधरी

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …