पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याने बदला घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री १ वाजून पाच मिनिटांनी ते दीड वाजेपर्यंत २५ मिनिटांमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे ९ तळ उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भारतीय सैन्याने लक्ष्य केले. पहलगामच नव्हे तर भाविकांच्या बसवरील गोळीबार, २६/११ मुंबई हल्ला, जम्मू- काश्मीर पोलिस दलातील जवानांची हत्या अशा पाच ते सहा हल्ल्यांचा बदलाच भारतीय सैन्याने घेतला. या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याच्या कुटुंबातील १० जण ठार करण्यात आले आहेत.
बुधवारी सकाळी साडे दहा वाजता परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी एअर स्ट्राईकची सविस्तर माहिती दिली. पहलगाम हल्ला हा जम्मू- काश्मीरमधील पर्यटन आणि विकासकामात अडथळे आणण्यासाठी करण्यात आला होता. या हल्ल्याच्या तपासादरम्यान भारताच्या गुप्तचर यंत्रणांना अशी माहिती मिळाली होती की, दहशतवादी संघटना आणखी हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. या दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणार्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताने ’ऑपरेशन सिंदूर’ राबवले, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयानंतर भारतीय संरक्षण विभागाच्यावतीने कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी कारवाईची माहिती आणि व्हिडिओ माध्यमांना दाखवले. या कारवाई नऊ तळांना उद्धवस्त करण्यात आले. पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दशकांपासून दहशतवादी संघटनांचे केंद्र उभे राहत आहेत. हे तळ पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहेत. या कारवाईदरम्यान निर्दोष नागरिक आणि नागरी वस्तींचे नुकसान होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात आले, असे सैन्याने सांगितले.
नियंत्रण रेषेपासून ३० किमी अंतरावरील पाक व्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथील सवाई नाला कॅम्प हे लष्कर- ए- तोयबाचे प्रशिक्षण केंद्र होते. २० ऑटोबर २०२४ सोनमर्ग, २४ ऑटोबर २०२५ गुलमर्ग आणि २२ एप्रिल २०२५ पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी याच केंद्रांमधून प्रशिक्षण घेतले होते. मुझफ्फराबादमधीलच सय्यदना बिलाल कॅम्पमध्ये जैश- ए- मोहम्मदचे तळ असून स्फोट घडवणे, जंगलातील कारवाया याचं प्रशिक्षण या केंद्रामध्ये दिले जात होते. कोटलीमधील गुलपूर कॅम्पमध्ये लष्कर- ए- तोयबाचं हे तळ होते. पूँछ आणि राजौरी भागात हे दहशतवादी सक्रीय होते. २० एप्रिल २०२३ मधील पूँछ येथे आणि ९ जून २०२४ मधील यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करणार्या दहशतवाद्यांनी याच तळावर प्रशिक्षण घेतले होते.
नियंत्रण रेषेपासून १३ किमी अंतरावरील कोटलीतील अब्बास कॅम्प लष्कर- ए- तोयबाचे प्रशिक्षण केंद्र होते. तेथे आत्मघाती हल्ल्यांचे प्रशिक्षण दिले जायचे. एकाच वेळी किमान १५ दहशतवाद्यांना येथे प्रशिक्षण दिले जात होते. आंतरराष्ट्रीय सीमा रेषेपासून ६ किमीवरील सियालकोट येथे सर्जल कॅम्प होता. त्यातील दहशतवाद्यांनी मार्च २०२५ मध्ये जम्मू- काश्मीर पोलिसांच्या जवानांची हत्या केली होती. त्या दहशतवाद्यांना येथेच प्रशिक्षण देण्यात आले होते. सियालकोटमधील आंतरराष्ट्रीय सीमेपासून १२ ते १८ किलोमीटर लांब मेहमून जाया कॅम्प होता. ते हिज्बुल मुजाहिद्दीनचं केंद्र होते. जम्मूमध्ये दहशतवाद पसरवण्यामागे याच केंद्रातील दहशतवाद्यांचा हात होता. पठाणकोट एअर बेसवरील हल्ल्याची सूत्रे याच केंद्रावरून हलली होती.
आंतरराष्ट्रीय सीमेपासून १८ ते २५ किमी लांब मरकझ तैबा, मुरिदके होते. २६ नोव्हेंबर २०११ रोजीच्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांनीही येथेच प्रशिक्षण घेतले होते. अजमल कसाब, डेव्हिड हेडली हे दोघंही इथेच प्रशिक्षणासाठी गेले होते. तसेच आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावरील बहवलपूर येथे मरकझ सुभानअल्लाह होते. हे जैश- ए- मोहम्मदचे मुख्यालय होते. संघटनेचा म्होरयाही या केंद्रात यायचा.
भारतीय जवानांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील ज्या ९ ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्यापैकी एक ठिकाण बहावलपूर आहे, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरया मसूद अझहरचे कुटुंबाच उद्ध्वस्त झाले आहे. त्याच्या कुटुंबातील १० सदस्यांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, मसूद अझहरचे एक स्टेटमेंट समोर आल्याचे म्हटले जात आहे. ऑपरेशन सिंदूर मोहिमेंतर्गत झालेल्या हवाई हल्ल्यात अझहरच्या परिवारातील १० आणि जवळचे ४ लोक ठार झाले आहेत. हे पाहून मसूद अजहरने ’मी ही मेलो असतो बरे झाले असते,’ असे स्टेटमेंट दिल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात ८० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. जिथे प्रत्येक ठिकाणी २५-३० दहशतवादी ठार झाले. पैकी बहावलपूर आणि मुरीदके येथे सर्वात तीव्र कारवाया करण्यात आल्या.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र