लेख-समिक्षण

ब्राह्मोसचा थरार

पाकिस्तानचा प्रत्येक इंच आता ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे दहशतवादी त्या देशात कोठेही लपले तरी त्यांना टिपण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात चालवलेले ‘ऑपरेशन सिंदूर अभियान’ केवळ एक ट्रेलर आहे. हे अभियान संपविण्यात आलेले नाही. ते केवळ तात्पुरते स्थगित केले आहे. कारण या अभियानाचा आतापर्यंतचा उद्देश सफल झालेला आहे असे संरक्षणमंत्र्यांनी लखनौ येथे एका कार्यक्रमात सांगितले. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे आयोजित ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा प्रथम संच त्यांच्या हस्ते सेनादलांना सुपुर्द करण्यात आला. या क्षेपणास्त्रांचे उत्पादन उत्तर प्रदेशमधील उत्पादन केंद्रात झाले आहे. या केंद्राची स्थापना चार महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. ‘सिंदूर अभियाना’त या क्षेपणास्त्राने भीमपराक्रम केला आहे. वेग आणि अचूकता या दोन्ही निकषांवर हे क्षेपणास्त्र समर्थ ठरले आहे. ब्रह्मोस व्यवस्था ही जगातील सर्वोत्तम यंत्रणांपैकी एक ठरली आहे. भारताच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. हे केवळ एक अस्त्र नसून आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या क्षमतेची ही एक पावती आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे भारताच्या तिन्ही सेनादलांच्या मारक क्षमतेचे एक प्रतीक ठरले आहे. भारताच्या संरक्षण व्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून आज या क्षेपणास्त्राकडे पाहिले जात आहे. भविष्यकाळात यापेक्षाही संहारक अस्त्रांची निर्मिती केली जाणार आहे असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची निर्मिती ‘ब्रह्मोस एअरोस्पेस’ या कंपनीकडून करण्यात येते. नुकतेच या कंपनीने उत्तर प्रदेशात उत्पादन केंद्र स्थापन केले आहे. अत्यंत कमी वेळात कंपनीने या उत्पादन केंद्रातून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा पहिला संच निर्माण केला आहे. या संचाच्या ’फ्लॅगिंग ऑफ’ कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. एप्रिल २०२५ मध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ’ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानकडून भारताविरोधात गरळ ओकण्याचे काम सुरूच आहे. पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ हे भारताविरोधात वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे आता भारताने पाकला पुन्हा एकदा ठणकावले आहे. ऑपरेशन सिंदूर ने ब्रह्मोसला केवळ चाचणी म्हणून नव्हे तर एक व्यावहारिक आणि यशस्वी लष्करी प्रणाली म्हणून स्थापित केले आहे. शास्त्रज्ञांपासून सामान्य नागरिकांपर्यंत, मोठ्या शहरांपासून लहान गावांपर्यंत, सुशिक्षितांपासून ते कमी शिक्षितांपर्यंत प्रत्येकाचा ’ब्रह्मोस’च्या व्यापक शक्तीवर विश्वास आहे. जर भारत पाकिस्तानला जन्म देऊ शकतो, तर भारत आणखी काय करू शकतो त्याबद्दल अधिक सांगण्याची गरज नाही. भारत आता ब्रह्मोस क्षेपणास्त्राद्वारे केवळ स्वतःच्या नव्हे तर मित्र देशांच्या सुरक्षा गरजा देखील पूर्ण करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण गरजांमध्ये भारताच्या स्वावलंबनाचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. भारताकडून होणार्‍या छोट्याशा चिथावणीलाही पाकिस्तान योग्य उत्तर देईल, असे पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी म्हटले आहे. पण ऑपरेशन सिंदुरमुळे त्यांची झालेली नाचक्की जगाने पाहिली आहे. — जगदीश काळे

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …