लेख-समिक्षण

बॉलिवूडच्या मानगुटीवर ‘डिजिटल लीक’चे वेताळ

सिध्याच्या इंटरनेटयुगात डाटा चोरीला उधाण आले आहे. सिनेसृष्टीही त्यापासून दूर राहिलेली नाहीये. ‘डिजिटल लीकेज’ ही समस्या बॉलीवूडच नव्हे तर जगभरातील सर्वच चित्रपट उद्योगांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. एखादा चित्रपट किंवा वेब मालिका लीक झाल्यास टॉकीज सोडा ओटीटीवर देखील प्रदर्शित होत नाही. त्याचवेळी लीक म्हणजे फुटलेला चित्रपट आवडला नाही तर त्याबाबत प्रेक्षकांचे नकारात्मक मत तयार होते. म्हणजेच या फुटीचा कळत नकळतपणे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकाराच्या अर्थकारणावर आणि करियरवर विपरित परिणाम होतो. भारतीय चित्रपट उद्योगाला या लीकेजमुळे दरवर्षी सुमारे 20,000 कोटींचा फटका सहन करावा लागत आहे.
———

तुम्हाला ‘उडता पंजाब’, ‘बाहुबली-2 कनक्लूजन’, ‘मणिकर्णिका: द क्विन ऑफ झांसी’, ‘कबीर सिंह’ आणि ‘थलायवी’ या चित्रपटातील समान गोष्ट काय वाटत असेल? 2016 ते 2021 या काळात प्रदर्शित झालेले चार बॉलिवुड आणि एक दक्षिण भारतीय चित्रपटाचा एक समान धागा म्हणजे सर्व चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच डिजिटली लीक झाले होते. डिजिटल लिकेचा अर्थ कोणताही चित्रपट, वेब मालिका, चित्रपटाचे गाणे किंवा अन्य कोणत्याही डिजिटल सामग्रीचे अधिकृतरित्या प्रदर्शन होण्यापुर्वीच कोणत्याही परवानगीशिवाय इंटरनेटवर लीक होणे.
‘डिजिटल लीकेज’ची समस्या ही एकट्या बॉलिवुडची नाही तर हा प्रश्न संपूर्ण देश आणि जगभरातील चित्रपट उद्योगांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण डिजिटल लीकेजमुळे चित्रपटाच्या उत्पन्नावर थेट परिणाम होतो आणि अनकेदा तर ही लीकेज एवढ्या धोकादायक पातळीवर पोचते की काहीवेळा एखादा चित्रपट किंवा वेब सिरिीज, ओटीटीवर देखील प्रदर्शित होत नाही. शेवटी हे चित्रपट वाहिन्यांवर प्रीमियर करून कसाबसा खर्च काढतात. मुळातच हे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लीक झाल्याने त्याचे हक्क घेण्यास कोणी तयार होत नाही. प्रदर्शित होण्यापुर्वीच अनेकांनी तो पाहिलेला असतो. एकुणातच चित्रपट उद्योगासाठी डिजिटल लीकेजचे एवढे गंभीर रुप धारण केले की भारतीय उद्योगाला दरवर्षी सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. यावरून त्याचे गांभीर्य लक्षात येते. केवळ भारतापुरतीच हे नुकसान मर्यादित राहत नाही तर दुसर्‍या देशांत प्रामुख्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढे असलेल्या देशांतही डिजिटल समस्या ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.
असे होते डिजिटल लीकेज
कोणत्याही चित्रपटांची एडिटिंग किंवा डबिंगच्या काळात महत्त्वाचा डेटा चोरीस जाण्याची शक्यता राहते. एखादा चित्रपट तयार झाल्यानंतर निरीक्षक, समीक्षक किंवा प्रमोशनसाठी तो प्रिव्युच्या रुपातून दाखविला जातो किंवा कोणासाठी प्रिव्युची लिंक पाठविली जाते, तेव्हा तो चित्रपट लीक होऊ शकतो. अनेकदा चित्रपट हा स्टुडिओ किंवा स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचा डेटा हॅक करत कंटेट चोरला जातो. थिएटर्समध्ये दाखविण्यासाठी सुरुवातीच्या प्रिंट्स डिजिटल डेटाच्या रुपातून पाठविण्यात येतो तेव्हाही लीक होण्याची शक्यता असते. ओटीटीवर रिलिज झाल्यानंतर तातडीने त्याची रिकॉर्डिंग किंवा डेटा एक्स्ट्रेशनमार्फत डेटा फाइल लीक होतो. याप्रमाणे चित्रपट लीक होण्याचे अनेक मार्ग आहेत.
लीकेजची डोकेदुखी कशामुळे
डिजिटल लीकेजने एकीकडे चित्रपट निर्मात्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते, त्याचवेळी लीक चित्रपट लोकांना आवडला नाही तर त्याबाबत नकारात्मक चर्चा सुरू होते. ऑनलाइनवर पोस्ट फिरत राहतात आणि शेवटी चित्रपट हा प्रदर्शन होण्यापूर्वीच पडतो. शिवाय संबंधित प्रॉडक्शन हाऊसच्या दुसर्‍या प्रॉडक्टला देखील कमी लेखण्याची मानसिक वृत्ती तयार होते. यासारख्या डिजिटल लीकेजमुळे कलाकारांची मेहनत आणि कोट्यावधी रुपये मातीमोल होतात. निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार या ‘धक्क्क्या’ने केवळ नाराज होत नाही तरत अनेकदा त्यांचे संपूर्ण करियर खराब होण्याची शक्यता असते आणि तो सर्वात कळीचा मुद्दा आहे. चित्रपट कितीही चांगला का असेना त्याचा क्लायमॅक्स लोकांना अगोदरच कळाला तर प्रेक्षकांना तो चित्रपट पाहण्यात स्वारस्य राहत नाही. उदा. बॉबी देवलच्या ‘गुप्त’ चित्रपटात मारेकरी कोण आहे, हे जर सुरुवातीलाच ठाऊक असले असते तर तो चित्रपट चालला नसता. अर्थात तो व्हॉट्सअपचा जमाना नसल्याने उत्कंठावर्धक चित्रपट बर्‍यापैकी गल्ला गोळा करत होते.
पारंपरिक पायरसी आणि डिजिटल लीकेज
डिजिटल लीकेज हे पारंपरिक पायरसीच्या तुलनेत अधिक धोकादायक आणि चिंताजनक आहे. पारंपरिक पायरसीमध्ये टॉकीजमध्ये बसून लपूनछपून चित्रपटाचे रिकॉर्डिंग करण्यात येते आणि नंतर त्याची सीडी आणि डीव्हीडी तयार केली जाते. तेव्हा लाखो किंवा हजारोच्या संख्येने सीडी किंवा डीव्हीडीची कॉपी करून त्याची विक्री केली जाते. त्याचवेळी डिजिटल लीकेजनुसार चित्रपट साहित्य थेट क्लाऊड, सर्व्हर किंवा डिजिटल प्रिंट्समध्ये रुपांतरीत केली जाते. डिजिटल लीकेज अनेकदा केवळ एका नकारात्मक उद्देशातून केले जाते. यानुसार डिजिटल लीकेज खूप वेगाने एकाचवेळी सर्वत्र देशात, जगाच्या कानाकोपर्‍यात पोचू शकते आणि त्यामुळे चित्रपटाला प्रचंड आर्थिक अणि व्यावसायिक नुकसान सहन करावे लागते. डिजिटल लीकेज हे कोणत्याही साहित्याला पापणी लवण्याच्या आत जगातील कोणत्याही कोपर्‍यात पोचू शकते आणि काही मिनिटांत हे साहित्य टोरंट साइट्स, टेलिग्रॅम चॅनल्स किंवा अन्य माध्यमांपर्यंत पोचते. पारंपरिक पायरसीत एकीकडे फिजिकल मीडियाची गरज भासते, त्याचवेळी डिजिटल लीकेजमध्ये केवळ इंटरनेट आणि डिजिटल फाइल्स पुरेशी असते. पारंपरिक पायरसी रोखण्यासाठी पोलिस अणि फिजिकल कारवाई देखील परिणामकारक ठरते. मात्र डिजिटल लीकेजला रोखणे एवढे सोपे नाही आणि अजूनही जगाकडे ते रोखण्यासाठी सक्षम सायबर कायदा पण नाही.
जेव्हा चित्रपट बासनात जातात
अलिकडच्या काळात प्रदर्शित झालेले ‘थलाइवी’ आणि सलमान खानचा ‘राधे’ या चित्रपटांची झालेली शोचनिय अवस्था कदचित अन्य बड्या बजेटच्या चित्रपटांची झालेली नसेल. थलाइवी हा दक्षिण भारतातील प्रसिद्ध जोडी एम.जी. रामचंद्रन अणि जयललिता यांच्या कथेवर साकारलेला चित्रपट. यात कंगना राणावत आणि अरविंद स्वामी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. एक अब्ज बजेटचा हा चित्रपट हा टॉकीजवर येण्यापूर्वीच डिजिटल लीक झाला आणि आपटला. मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी लोक टॉकीजमध्ये गेले नाहीत. अशीच वाईट स्थिती सलमानच्या ‘राधे’ ची पण झाली. एकीकडे सलमान हा अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे मारधाड करत सुपरहिट चित्रपट देण्याच्या तयारीत असताना 90 कोटी रुपयात तयार झालेला हा चित्रपट डिजिटल लीकेजमुळे खर्च काढण्याचे सोडा परंतु चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभु देवा यांना भरपाईसाठी दुसरा चित्रपट देखील घोषित करता आले नाही. हे दोन्ही चित्रपट डिजिटल लीक झाल्याने त्यांचा टॉकीजवरील गल्ला रिकामा राहिला. ओटीटी व्यूजवर देखील परिणाम झाला. कारण लोकांनी पाठ फिरवली होती. प्रदर्शित होण्यापूर्वीच लीक होत असल्याने या चित्रपटांना प्रमोशनल रणनिती देखील आखता आली नाही.
रोखण्याची गरज
डिजिटल लीकेजची समस्या ही चित्रपट उद्योगासाठी अलिकडच्या काळात मोठी गंभीर समस्या म्हणून उभी राहिली आहे. त्यामुळे डिजिटल लीकेज रोखण्याची मागणी केली जात आहे. ते रोखण्यासाठी कोणकोणते उपाय करायला हवेत, हा देखील प्रश्न आहे. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, प्रॉडक्शन हाऊसला मजबूत सायबर सुरक्षा तंत्रज्ञान आणि एन्क्रिप्शिनचा वापर करावा लागेल. त्याचवेळी चित्रपट डिजिटल लीक होण्याचे स्रोत शोधून त्यावर कडक देखरेख ठेवणे आवश्यक आहे. प्रिव्यू स्क्रीनर्सला ट्रॅक करण्यासाठी डिजिटल वॉटरमार्किंगचा देखील वापर करता येऊ शकतो. डिजिटल लीकेजसंदर्भातील गुन्ह्याचा निपटारा करण्यासाठी कडक कायदा आणावा लागेल आणि दोषी असणार्‍यांना शिक्षेबरोबरच आर्थिक दंड देखील आकारावा. त्याचवेळी स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मच्या कंटेटला सुरक्षेच्या हेतूने चांगले उपाय योजावे लागतील. वास्तविक डिजिटल लीकेजचा मुद्दा हा केवळ बॉलिवुडसाठीच नाही तर देशाच्या संपूर्ण चित्रपट उद्योगांसाठी ‘वेताळ’ म्हणून समोर आला आहे आणि त्यावर तातडीने नियंत्रित मिळवणे गरजेचे आहे. अन्यथा हा ‘वेताळ’ तंत्रज्ञानाच्या बळावर अब्जावधी रुपयांचा उद्योग देशोधडीला लावण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.- सोनम परब

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …