ब्लेझ पास्कल हे फ्रेंच गणित तज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक व कॅथॉलिक तत्त्वज्ञ होते. त्यांनी आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरून द्रव पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण संशोधन केले. एवांगेलिस्ता तॉरिचेल्ली याने दाब व निर्वाताविषयी पहिल्यांदा प्रतिपादलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण पास्कालाने मांडले. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आधुनिक विचारवंतांमधील त्यांचे स्थान अनन्यसाधारण गणले जाते.
ब्लेझ पास्कल यांचा जन्म 19 जून 1623 रोजी झाला. ब्लेझचा सांभाळ त्याचे वडील आणि गिल्बर्ट व जॅकेलिन या त्याच्या दोन थोरल्या बहिणींनी केला. कर संकलन अधिकारी म्हणून काम करणार्या आपल्या वडिलांना ब्लेझने खूप मेहनत घेऊन गिअर्स आणि चाकं यांच्या सहाय्याने आकडेमोड करणारं यंत्र तयार करून दिलं. अठराव्या वर्षी पास्कलने तयार केलेलं हे बेरीज-वजाबाकी करू शकणारं यंत्र पुढील काळातील कॅलक्युलेटरची नांदी ठरलं.
इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांनी तयार केलेलं वायुभारमापक यंत्र घेऊन पास्कल 1200 मीटर उंचीच्या ‘प्यू डे डोम’ या शिखरावर गेले. जसजसं उंच जावं तसतसा हवेचा दाब कमी होत जात असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. या निरीक्षणावरून वातावरणाच्या बाहेर निर्वात पोकळी असली पाहिजे, असा निष्कर्ष त्यांनी काढला. हवेच्या दाबासंदर्भात केलेल्या या संशोधनातूनच पास्कल यांनी द्रव आणि वायूंच्या संदर्भातला मूलभूत नियम मांडला.
बंदिस्त द्रव किंवा वायू पदार्थावर दाब दिला असता हा दाब पदार्थाच्या सर्व बिदूंवर समान पारेषित होतो, हा नियम ‘पास्कलचा नियम’ म्हणून प्रसिद्ध झाला. या नियमांचा उपयोग आजही ‘हायड्रॉलिक्स’ तंत्रावर चालणार्या अनेक उपकरणांमध्ये केला जातो. पियेर फरमॅट यांच्याबरोबर झालेल्या पत्रव्यवहारातून पास्कल यांनी ‘संभाव्यता सिद्धांत’ (प्रोबॅबिलिटी थिअरी) विकसित केला. पास्कल यांच्या द्विपदीमधल्या क्रमाने येणार्या घातांकाचे सहगुणक शोधण्याची पद्धती तसेच ‘प्रक्षेप्य भूमिती’ (प्रोजेक्टिव्ह जॉमेट्री) प्रसिद्ध आहेत. ब्लेझ पास्कल यांचे 19 ऑगस्ट 1662 रोजी निधन झाले.
आपण बुध्दीमत्तेला जर कष्टाची जोड दिली तर आपल्या हातुन असामान्य गोष्टी घडु शकतात ही बाब पास्कल यांच्या उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र