लहान मुलांच्या बहुतांश सवयी सर्वांनाच आवडतात. पण काही विचित्र सवयी पालकांना घाबरवूनही जातात. यापैकी एक सवय म्हणजे वारंवार जीभ बाहेर काढणे. खरे पाहता लहान मूल जीभ बाहेर काढते तेव्हा गोंडस दिसते. पण सतत जर मूल जीभ बाहेर काढत असेल तर पालकांना या सवयीबाबत चिंता वाटते. लहान मूल त्याच्या ओठांना स्पर्श झालेल्या एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करते तेव्हा जीभ बाहेर काढते. याला टंग थ्रस्ट रिफ्लेक्स म्हणतात. खास करुन बाळाला जेव्हा दूध दिले जाते तेव्हा असे होऊ शकते. ही सवय सामान्यतः बाळ 4 ते 6 महिन्यांचे होईपर्यंत टिकते.
मूल पुन्हा पुन्हा जीभ बाहेर काढत असेल तर त्याचा अर्थ भूक लागली आहे, असाही असू शकतो. कारण त्यांना बोलता येत नसल्यामुळे ते अशा काही कृतींद्वारे भूक लागल्याचा संकेत देतात. ओरल मोटर डेव्हलपमेंट – जसजसे मुलांची वाढ होत जाते तसतसे त्यांच्या तोंडाच्या स्नायूंचे नियंत्रण विकसित होते. जीभ बाहेर काढणे हा या प्रक्रियेचा एक भाग आहे. ही क्रिया मुलांना त्यांच्या तोंडाचे स्नायू मजबूत करण्यास आणि त्यांना घन पदार्थ खाण्यासाठी तयार करण्यास मदत करते.
काही अहवाल असेही सांगतात की मुले तोंडातून श्वास घेण्यासाठी जीभ बाहेर काढतात. खोकला, सर्दी, नाक बंद झाल्यास अशी कृती मुलांकडून केली जाऊ शकते. लहान मुलांना कोणत्या सवयी, कशामुळे लागतील याबाबत कुणीच नेमकेपणाने सांगू शकत नाही. बरेचदा पालक किंवा नातेवाईक त्यांना खेळवताना, त्यांच्याशी बोलताना जीभ बाहेर काढतात. या सवयींचे अनुकरण मुलांकडून केले जाऊ शकते. असे असले तरी मुलाची वाढ होत जाताना सतत जर तो जीभ बाहेर काढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Check Also
पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …
पांचजन्य वृत्तपत्र