इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश मानला जातो, पण एकेकाळी तिथे हिंदू राजे राज्य करीत होते आणि जनतेचाही बहुतांश भाग हिंदू धर्मीय होता. पुढे काळ बदलला, इस्लामचा प्रसार झाला आणि आज तो एक प्रमुख मुस्लिम राष्ट्र म्हणून ओळखला जातो. परंतु सध्या या देशात एक अत्यंत विचित्र आणि वादग्रस्त सामाजिक प्रथा वाढीस लागली आहे, जिला आनंद विवाह किंवा मुताह निकाह असे म्हटले जाते. या प्रथेनुसार, गरीब कुटुंबांतील काही युवती परदेशी पुरुष पर्यटकांशी अल्पकाळासाठी म्हणजेच १० ते १५ दिवसांसाठी विवाह करतात. हा विवाह केवळ तात्पुरत्या कालावधीसाठी केला जातो आणि त्या बदल्यात महिलांना काही रक्कम दिली जाते. त्या काही दिवस त्या पुरुषाच्या पत्नीप्रमाणे राहतात, त्याला घरगुती व शारीरिक सेवा देतात आणि नंतर पर्यटक निघून गेल्यावर विवाह समाप्त होतो. दोघांमधील संबंध पूर्णपणे तोडले जातात आणि पुढे त्या महिला दुसर्या पुरुषाशी पुन्हा असा विवाह करू शकतात. हा मुताह निकाह इस्लामच्या शिया पंथातून आलेला एक धार्मिक संकल्पना आहे. अरबी शब्द मुताह म्हणजे आनंद. या विवाहाचा उद्देश काही काळासाठी सहजीवनाचा करार मानला जातो. याला तात्पुरता विवाह असेही म्हणतात. यात पुरुषाला स्त्रीला निश्चित रक्कम द्यावी लागते आणि त्या कालावधीत दोघांचे वैवाहिक नाते वैध मानले जाते. मात्र कालावधी संपल्यावर हा विवाह आपोआप संपतो.
पश्चिम इंडोनेशियातील पुंकाक हे पर्वतीय पर्यटनस्थळ या प्रथेसाठी विशेष ओळखले जाऊ लागले आहे. इथे मध्यपूर्वेतील पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात आणि स्थानिक एजन्सीमार्फत या विवाहांची व्यवस्था केली जाते. एजंट या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावतात आणि व्यवहारातील मोठा हिस्सा स्वतःकडे ठेवतात. या उद्योगातून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही काही प्रमाणात चालना मिळते, पण महिलांच्या सुरक्षिततेवर आणि सन्मानावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.लॉस एंजिल्स टाइम्सने प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, अनेक महिलांनी आर्थिक गरजेपोटी हा मार्ग स्वीकारला आहे. काहींचे म्हणणे आहे की दुसरे कोणतेही काम केल्यास त्यांना फार कमी मजुरी मिळते, त्यामुळे त्यांना कुटुंब चालवण्यासाठी हा मार्ग निवडावा लागतो. एका इंडोनेशियन महिलेने सांगितले की तिने १३ वर्षांच्या वयात पहिल्यांदा असा विवाह केला आणि नंतर १५ हून अधिक वेळा विविध देशांतून आलेल्या पर्यटकांशी तात्पुरते विवाह केले.
मुताह निकाह सध्या ईरान, इराक, लेबनॉन, सीरिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील काही शिया बहुल भागांमध्ये प्रचलित आहे. ईरानमध्ये याला सिगेह असे म्हणतात आणि तेथे ते कायदेशीरदृष्ट्या मान्य आहे. परंतु इतर देशांत त्याविषयी तीव्र विरोध आणि सामाजिक नापसंती आढळते. या प्रकारच्या विवाहातून महिलांचे शोषण, लैंगिक अत्याचार आणि मानसिक त्रास यांचे अनेक उदाहरणे समोर आली आहेत. ज्या महिलांना थोडी आर्थिक सवलत मिळते, त्या काही काळाने हे काम सोडून देतात आणि आपले सामान्य आयुष्य पुन्हा सुरू करतात. परंतु बहुतेक महिलांसाठी हा चक्रव्यूह बनतो, ज्यातून बाहेर पडणे कठीण होते. इंडोनेशिया आणि इतर देशांमध्येही या प्रथेविरुद्ध सामाजिक आणि धार्मिक पातळीवर विरोधाचा आवाज अधिक तीव्र होत आहे.
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र