लेख-समिक्षण

प्रतीक्षा संगीतप्रधान चित्रपटांची

भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीत यांचे नाते अतूट आहे. सुरुवातीपासूनच भारतीय सिनेमांमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्त्व मिळाले आहे. आजही चांगल्या चाली, हृदयस्पर्शी गीते आणि भावनिक सादरीकरण असलेले संगीतप्रधान चित्रपट प्रेक्षकांना भावतात. मात्र, अलीकडच्या काळात असे चित्रपट कमी होत चालले आहेत. याचे एक कारण म्हणजे रोमँटिक चित्रपटांची कमतरता, ज्यामध्ये प्रसंगानुरूप उत्कृष्ट सूररचना होते. त्याचबरोबर, आता दिग्दर्शकांमध्ये संयमाची कमतरताही जाणवते.
मधुर संगीताचा तो सोन्याचा काळ आठवतो, जेव्हा अगदी साध्या चित्रपटातील सर्व गाणीही शवणीय असायची. अशा गाण्यांसाठी योग्य प्रसंग प्रामुख्याने रोमँटिक चित्रपटांमध्ये निर्माण होत असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये असा एकही रोमँटिक चित्रपट आलेला नाही, जो प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी ठसला आहे. त्यामुळे ही बाब पूर्णतः योग्य ठरते.
1950-80 च्या काळात राज कपूर, देव आनंद, गुरुदत्त यांसारख्या दिग्दर्शकांनी संगीतप्रधान चित्रपटांची एक खास शैली विकसित केली. या चित्रपटांमध्ये गाणी ही केवळ मनोरंजनाचा भाग नव्हती, तर ती कथानकाचा गाभा होती.उदाहरणार्थ, बैजू बावरा (1952) हा संगीतमय चित्रपट शास्त्रीय संगीतावर आधारित होता आणि त्यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. मुगल-ए-आझम (1960), अमर प्रेम (1972), कभी कभी (1976), सिलसिला (1981) यांसारख्या चित्रपटांनी संगीत आणि कथानक यांचा सुंदर मिलाफ साधला. ’बॉबी’, ’लव्ह स्टोरी’, ’एक दूजे के लिए’, ’मैने प्यार किया’, ’कयामत से कयामत तक’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ’हम आपके हैं कौन’, ’गदर – एक प्रेमकथा’ यांसारखा रोमँटिक चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. असे चित्रपटच संगीतप्रधान चित्रपटांची आवश्यकता निर्माण करतात. राज कपूर, देव आनंद, राजेंद्र कुमार यांसारखे जुन्या काळातील अभिनेते याची जाणीव ठेवत आणि त्यांच्या कौटुंबिक चित्रपटांमध्येही रोमँसचा पुरेसा समावेश करीत असत.
म्हणूनच, तो काळ विसरणे अशक्य आहे, जेव्हा अगदी सामान्य चित्रपटाची गाणीही मधुर असत. मात्र, नंतर हा काळ बदलला आणि चित्रपटांमध्ये हिंसाचाराचा प्रभाव वाढू लागला. तरीही यश चोप्रा, आदित्य चोप्रा, संजय लीला भंसाळी यांसारख्या संगीतप्रेमी दिग्दर्शकांनी अ‍ॅक्शनप्रधान चित्रपटांतही माधुर्य टिकवले. मात्र, संगीतप्रधान चित्रपटांची उणीव जाणवू लागली. आता शुद्ध संगीतप्रधान चित्रपटांची चर्चा करणेही व्यर्थ वाटते.
कधी काळी सुप्रसिद्ध संगीतकार राहुल देव बर्मन उर्फ पंचमदा यांनी संगीतप्रधान चित्रपटांबद्दल म्हटले होते, ’अशा चित्रपटांसाठी सूररचना करताना खूप संयम आवश्यक असतो. जोपर्यंत तुम्ही चित्रपटाच्या प्रत्येक प्रसंगात गुंतत नाही, तोपर्यंत उत्तम सूररचना शक्य नाही.’ प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट संगीतकार जोडी नदीम-शवणविषयी सांगतात, ’आशिकी चित्रपटानंतर त्यांना कळले की गाण्यांना प्रसंगानुसार बसवणे आम्हाला उत्तमप्रकारे जमत आहे. त्यामुळे ’सड़क’, ’हम हैं राही प्यार के’, ’दिल है कि मानता नहीं’ यांसारख्या चित्रपटांतील गाण्यांची सूररचना करताना त्यांनी खूप वेळ घेतला.’
सत्यजित राय, राज कपूर यांसारख्या दिग्दर्शकांना संगीताची उत्तम जाण होती. या यादीत संजय लीला भंसाळी हे आधुनिक काळातील सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यांनी ’खामोशी’पासून ’पद्मावत’पर्यंत प्रत्येक चित्रपटाला संगीतप्रधान बनवले.
’दिल तो पागल है’, ’दुश्मन’, ’गदर’ यांसारख्या चित्रपटांसाठी सुरेल संगीत देणारे उत्तम सिंह सांगतात, ’माधुर्य हे कधीही कृत्रिम पद्धतीने तयार करता येत नाही. यासाठी संगीतात पूर्णपणे तल्लीन होणे आवश्यक आहे. प्रत्येक वाद्याची उत्तम जाण असली पाहिजे. सध्याचे बरेच संगीतकार याची पूर्ण समज ठेवत नाहीत, त्यामुळे माधुर्य हरवत चालले आहे.’
ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांनी जुन्या काळाच्या आठवणी सांगताना म्हटले होते, ’संगीतनिर्मिती संयमाशिवाय शक्य नाही. आमच्या काळातील बहुतांश निर्माते-दिग्दर्शक नेहमीच संगीत बैठकांमध्ये हजर असत. चित्रपटाची संहिता आणि प्रत्येक प्रसंग आधीच आम्हाला समजावून सांगितला जात असे. त्यामुळे सुरुवातीला संपूर्ण चित्रपटाची गाणी तयार केली जात. आवश्यकतेनुसार त्यात सुधारणा करण्यासाठी वेळही उपलब्ध असायचा.’
अनु मलिक आपल्या अनुभवाबद्दल सांगतात, ’जेपी दत्तासाहेबांनी ’बॉर्डर’, ’रिफ्युजी’, ’एलओसी’ आणि ’उमराव जान’ या चित्रपटांसाठी माझ्याकडून खूप मेहनत करून घेतली. मी नेहमीच इच्छितो की प्रत्येक निर्माता इतका वेळ घालवून माझ्याकडून उत्तम गाणी तयार करून घेईल, पण असे निर्माते फार कमी भेटतात.’
1990-2000 च्या दशकात दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (1995), हम दिल दे चुके सनम (1999), देवदास (2002) यांसारख्या चित्रपटांनी संगीताला मोठे स्थान दिले. मात्र, अलीकडच्या काळात अ‍ॅक्शन आणि थ्रिलर शैलीच्या चित्रपटांचा वाढता प्रभाव दिसून येतो, ज्यामध्ये संगीत गौण ठरते. संगीतनिर्मितीसाठी वेळ आणि समर्पण आवश्यक असते. जुन्या काळातील चित्रपटांत संगीतकार, गीतकार आणि दिग्दर्शक मिळून गाण्यांवर महिने मेहनत घेत असत. मात्र, सध्याच्या वेगवान फिल्ममेकिंग प्रक्रियेमुळे संगीतनिर्मितीवर पुरेसा वेळ दिला जात नाही. आजच्या काळातील संगीतकार पाश्चात्य बीट्स आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिकचा जास्त वापर करत असल्यामुळे पारंपरिक मेलोडी कमी झाली आहे. परिणामी, गाणी पटकन लोकप्रिय होतात, पण दीर्घकाळ लक्षात राहत नाहीत.
एकूणच संगीतप्रधान चित्रपट हे भारतीय सिनेमाचे खरे वैभव होते आणि आजही असू शकतात. चांगल्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेला भारतीय सिनेमा हा फक्त संवाद आणि दृश्यांपुरता मर्यादित राहू नये. जर चित्रपट निर्माते, संगीतकार आणि प्रेक्षकांनी पुन्हा एकदा चांगल्या संगीताला प्राधान्य दिले, तर संगीतप्रधान चित्रपटांची हरवलेली लोकप्रियता नक्कीच परत येईल.- सोनम परब

Check Also

कलाकारांचा आर्थिक संघर्ष

सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …