लेख-समिक्षण

पोलिओग्रस्त मुलगी ते यशस्वी उद्योजिका

संकटे माणसाला संपवायला येतात की नवी उभारी द्यायला, हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या प्रबळ इच्छाशक्तीवर अवलंबून असते आणि हेच पाटण्याच्या ममता भारती यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओने शरीराची साथ सोडली आणि संपूर्ण शरीर जवळपास अर्धांगवायूने ग्रासले गेले, मात्र मनाची उभारी तसूभरही कमी झाली नव्हती.
पाटण्यातील अनेक रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही जेव्हा डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले, तेव्हा साधे बसणेही ममता यांच्यासाठी दुरापास्त झाले होते. मात्र नियतीने शारीरिक क्षमता हिरावून घेतली असली तरी त्यांना आतून अधिक मजबूत केले होते आणि याच जिद्दीच्या जोरावर आज त्या बिहार राज्य पुरस्काराने सन्मानित एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आल्या आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या शस्त्रकार्ति प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आज दहा जणांना हक्काचा रोजगार मिळत असून त्या महिला सक्षमीकरणाचा एक उत्तम वस्तुपाठ ठरल्या आहेत.
ममता सात वर्षांच्या असताना जेव्हा इतर मुले मैदानावर खेळत असत, तेव्हा शारीरिक व्याधींमुळे येणारा एकाकीपणा घालवण्यासाठी त्यांनी चित्रकलेचा आधार घेतला. हीच मिथिला पेंटिंग त्यांच्या आयुष्याचा केवळ छंद उरली नाही, तर जगण्याचा मुख्य उद्देश बनली. 2012 पासून त्यांनी या कलेकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली आणि ज्यूटच्या वस्तू, साड्या, कुर्ता तसेच विविध वस्त्रप्रावणांवर मिथिला कलेचा अविष्कार घडवून या पारंपरिक कलेला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या या अथक परिश्र्मांची दखल घेत बिहार सरकारने 2013-14 मध्ये त्यांना राज्य पुरस्कार देऊन गौरवले, जो त्यांच्या टीकाकारांना दिलेले एक चोख उत्तर होते. कलाकार म्हणून मिळालेल्या यशानंतर त्यांनी उद्योजिका होण्याचे स्वप्न पाहिले आणि 2020-21 मध्ये बिहार स्टार्टअप अंतर्गत स्वतःची कंपनी सुरू केली. सुरुवातीला तांत्रिक ज्ञान आणि विपणन अनुभवाचा अभाव असूनही त्यांनी हार मानली नाही आणि आज त्या आत्मविश्वासाने आपला व्यवसाय सांभाळत आहेत.
आज ममता यांची कंपनी केवळ नफा कमवत नसून दहा कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत आहे. शारीरिक, आर्थिक किंवा सामाजिक कारणांमुळे खचून जाणाऱ्या महिलांसाठी ममता भारती एक आशेचा किरण आहेत.

Check Also

दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …