लेख-समिक्षण

पालकत्वात हवी सीमारेषा

आजच्या पालकांना मुलांशी कठोर वागू नये, असे धडे दिले जात असल्याने ते मुलांशी मैत्रीपूर्ण वागतात. असे वागण्यात गैर काही नाही, पण मुलांनी मित्र बनून उद्धट होऊ नये याची काळजीही पालकांनी घ्यायला हवी. यासाठी पालकांनी मुलांसोबतच्या नात्यामध्ये एक सीमारेषा आखली पाहिजे. त्याचबरोबर पालकांनी स्वतःचे आचरण आणि वागणूक अशी ठेवली पाहिजे की ज्यामुळे मुले सुसंस्कृत होतील.
•काय मम्मा, तुझा ड्रेसिंग सेन्स खूप खराब आहे. तू कधी सुधारणार? यार, तू या ड्रेसमध्ये घाण लागलेल्या फुटबॉलसारखा दिसतोस’ अशी वाक्ये हल्ली मुले-मुली आई-वडिलांशी बोलताना वापरतात. कदाचित त्यांच्यामध्ये असे बोलणे खूप सामान्य असू शकते. म्हणूनच अनेकदा ते पालकांच्या लक्षात येत नाही. एक काळ असा होता जेव्हा वडिलांचा घरात दरारा असायचा. त्यांना जे काही सांगायचं असेल तर आईकरवी सांगितलं जायचं. मुलं आईला काहीही बोलायला कचरायची. पण आज अशी वेळ आली आहे की आई-वडिलांना मुले फाडफाड वाट्टेल ते बोलतात आणि त्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. मुलांचे असे वागणे आपल्या चुकीमुळे होतेय का? मैत्रीच्या नावाखाली आपण या नात्यातला आदरयुक्त धाक संपवूनच टाकला आहे का?की या नव्या युगात आपल्याला त्याची गरज वाटत नाही?
•आजची मुलं आपल्या पालकांशी मोकळेपणाने बोलतात ही खूप चांगली गोष्ट आहे, त्यांना त्यांच्या पालकांची भीती वाटत नाही. पण पालक आणि मुले यांच्यातील नातेसंबंधांत एक सीमारेषा असायला हवी. मुळात, वडिल किंवा आईच नव्हे तर ज्येष्ठांशी, प्रौढांशी कसे बोलावे हे मुलांना सांगितले पाहिजे. मोठ्यांशी सौजन्यानेच बोलले पाहिजे. अनेकदा असे दिसून येते की मुले त्यांच्या पालकांच्या शरीरावर टिप्पणी करतात. तुम्ही त्यांना असे करण्यापासून थांबवायला हवे. कारण घरात वडिलांना जर अशी टिप्पणी चालत असेल तर बाहेर कुणालाही ती वापरली तरी चालते असा मुलांचा समज होऊ शकतो.
•मुलं खूप निरागस असतात. त्यांना चांगला माणूस बनवण्याची जबाबदारी पालकांची आहे. यासाठी तुमच्या मुलाच्या भाषेकडे लक्ष द्या. तो उद्धटपणे बोलला तर त्याला अडवा. आजकाल इंग्लिश मीडियमची बरीच मुले वडिलांशी बोलताना ’यार’ हा शब्द वापरतात. पण वडिलांना अशा शब्दांनी संबोधणे योग्य नाही. हे शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे. ही बाब आईने मुलांना सांगितली पाहिजे.
•अर्थात, मुलांना दुरुस्त करण्याआधी, आपले स्वतःचे आचरण आणि आपण आपल्या मोठ्यांशी कसे वागतो पाहिले पाहिजे. विशेषतः जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपल्या भाषेची पातळी काय असते, याचा विचार पालकांनी करायला हवा.
•मुलांसमोर आपण कोणाच्याही उंचीवर, दिसण्यावर किंवा कपड्यांवर कधीही भाष्य करू नये. मुलं घरात अशा गोष्टी ऐकतात तेव्हा तेही तशाच प्रकारे बोलू लागतात. घरात नवरा-बायको आपापसात बोलतात त्याचा परिणाम मुलांवर सर्वाधिक होतो.
•अनेक वेळा महिला पतीशी भांडण झाल्यानंतर सासरच्या मंडळींविषयी मनसोक्त टीका करतात. सतत ते शब्द कानावर पडले की मुलेही तशाच प्रकारे बोलू लागतात. त्यामुळे वाढत्या वयाच्या मुलांसमोर विचारपूर्वक बोला. काहीही बोलण्यापूर्वी हे समजून घ्या की मुले तुमच्या बोलण्यातून आणि वागण्यातून खूप काही शिकतात. सबब तुमच्या संभाषणात आणि वागण्यात असे काहीही करू नका ज्याचा मुलांवर नकारात्मक परिणाम होईल. आई-वडिलांचे चांगले आचरण आणि वागणूक पाहूनच ते सुसंस्कृत होतात.

Check Also

पांढऱ्या केसांवर तेलचिकित्सा

आजकाल कमी वयातच केस पांढरे होणे ही स्रियांमधील एक सामान्य समस्या बनली आहे. पूर्वी वय …