आजच्या काळात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. पण 90 च्या दशकात, जेव्हा स्त्रियांनी घराबाहेर पडणेही सोपे नव्हते, तेव्हा एका महिलेने बँकेतील सुरक्षित नोकरी सोडून उद्योजकतेच्या अनिश्चित वाटेवर पाऊल ठेवले. ही जिद्दीची कहाणी आहे दीपा पाई यांची, ज्यांनी 5 रुपयांच्या सॉफ्टीपासून सुरुवात करून आज 300 कोटी रुपयांचे ’हँग्यो’ आईस्क्रीमचे साम्राज्य उभे केले आहे.
मंगळुरूमध्ये जन्मलेल्या दीपा पाच भावंडांमध्ये सर्वात लहान होत्या. मुंबईतून आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बँकेत नोकरी सुरू केली. 1995 मध्ये प्रदीप पाई यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्या हुबळीजवळील एका गावात स्थायिक झाल्या. एक सुशिक्षित महिला आणि बँकेतील उत्तम नोकरी असताना त्यांनी ती सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या कुटुंबातूनही याला विरोध झाला. मात्र, दीपा आपल्या निर्णयावर ठाम होत्या.
1997 मध्ये दीपा यांनी पतीच्या सहकार्याने व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीला त्या केवळ 5 रुपयांना सॉफ्टी विकत असत. त्या काळी अनेक प्रस्थापित कंपन्यांचे आईस्क्रीम बाजारात असताना दीपा यांनी अत्यंत चिकाटीने आपला ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवला. दर्जेदार चव आणि माफक दर या जोरावर ’हँग्यो’ ब्रँडने अल्पावधीतच ग्राहकांच्या मनात घर केले.
2007 मध्ये त्यांनी आपल्या मुलाच्या साथीने ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर अधिक लक्ष केंद्रित केले. केवळ एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास आज भारतातील 7 राज्यांमध्ये विस्तारला आहे. व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी नवनवीन प्रयोग केले आणि आज या व्यवसायाची उलाढाल 300 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
दीपा पाई यांचे यश केवळ महिलांसाठीच नाही, तर उद्योजकतेची स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे.
योग्य दिशा, कठोर परिश्र्म आणि जिद्दीच्या जोरावर गृहिणीदेखील एक यशस्वी उद्योजिका बनू शकते, हे दीपा पाई यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे हे खरे नाही काय?
Check Also
दहावी शिकलेला तरुण बनला कोट्यधिश उद्योगपती
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे …
पांचजन्य वृत्तपत्र