लेख-समिक्षण

पहलगाममधील हल्ल्याच्या मुळाशी..

जम्मू- काश्मीरमधील पहलगाममधील बैरासन व्हॅलीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत भीषण, नृशंस आणि तितकाच भेदक आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला आहे. पुलवामामधील हल्ला हा लष्करी जवानांवर झाला होता; परंतु पहलगाममधील हल्ल्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषतः पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. हा बदल अत्यंत महत्त्वाचा असून त्यातील गर्भितार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. पहलगाममध्ये यापूर्वीही दहशतवादी हल्ले झालेले आहेत. तथापि, यावेळच्या हल्ल्यामध्ये पर्यटकांना नावे आणि धर्म कोणता हे विचारून गोळ्या घालण्यात आल्या. त्यामुळे या हल्ल्याला एक वेगळी किनार आहे.
वस्तुतः पहलगाममध्ये वापरण्यात आलेली पद्धत पाहिली असता अल् कायदा, आयसिस यांसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून जागतिक समुदायाला भारत एक गोष्ट सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ती म्हणजे पाकपुरस्कृत दहशतवादाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रविरोधी कारवाया करणार्‍या जैश ए मोहम्मद, लष्करे तैय्यबा यांसारख्या संघटना पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय असून तेथून त्या भारतामध्ये दहशतवाद पसरवण्याचे काम करत आहेत. या सर्व संघटना धार्मिक आधारावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या माध्यमातून इतर धर्मियांनी जम्मू-काश्मीरमध्ये येऊ नये असे त्यांना सांगायचे आहे. सध्या अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक या भागातून जाणार आहेत. त्यांना इशारा देणे, त्यांच्या मनात दहशत निर्माण करणे हा पहलगाममधील हल्ल्यामागचा एक प्रमुख तात्कालिक हेतू आहे.
या हल्ल्यातून दहशतवाद्यांनी अलीकडील काळात सुरू केलेल्या ‘टार्गेट किलिंग’च्या नव्या प्रवाहाला आणखी एक भेदक वळण दिले आहे. धर्म विचारून हत्या करण्यातून दहशतवाद्यांना सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आहे. मागील काळात युरोपमध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेकडून ‘लोन वूल्फ’ स्वरुपाचे हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांमध्येही सर्वसामान्यांनाच टार्गेट करण्यात आले होते. असे करण्याने सबंध देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटतात. माध्यमांमधून प्रसिद्धी मिळते. राष्ट्रीय सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पाकिस्तानचा हा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये विशिष्ट वेळा साधून दहशतवादी कारवाया घडवून आणणे. यामुळे काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा त्यांचा हेतू सफल होतो.
गेल्या तीन दशकांचा इतिहास पाहिल्यास पाकिस्तानने नेहमीच भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रसंगांवेळी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले किंवा शस्रसंधीचे उल्लंघन असे प्रकार केलेले आहेत. गतवर्षी पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा पार पडत असताना, शेजारी राष्ट्रांचे प्रमुख भारतात आलेले असताना दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया दौर्‍याकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले असताना त्याआधी कठुआमध्ये हल्ला घडवून आणला होता. सन 2000 मध्ये बिल क्लिंटन भारतभेटीवर आले होते आणि भारतीय संसदेत ते भाषण देत होते त्यावेळीही अशाच प्रकारचा हल्ला काश्मीरमध्ये झाला होता.यामागे एक सुनियोजित रणनीती आहे, ती म्हणजे पाकिस्तानला अशा प्रकारचे हल्ले करुन काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करायचे आहे.
आताही पहलगाममधील हल्ल्याची वेळ पाहिली असता ही बाब स्पष्टपणाने लक्षात येते. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारतभेटीवर आलेले होते. ट्रम्प प्रशासनाचा कार्यभार सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचा विदेश दौरा पार पडला आणि यासाठी त्यांनी भारताची निवड केली. त्यामुळे हा दौरा केवळ भारताच्या दृष्टीनेच नव्हे तर जगाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा होता. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर गेलेले होते आणि भारत व सौदीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्‍या होणार होत्या. अशा वेळी इस्लामिक जगतामधील माध्यमे आणि पश्चिमी देशांमधील मीडिया भारतकेंद्री बनलेला होता. ही वेळ साधून पहलगाममधील हल्ला करण्यात आला, जेणेकरून याला जगभरात प्रसिद्धी मिळेल.
गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमधील हल्ले वगळता उर्वरीत भारतामध्ये एकही दहशतवादी हल्ला झालेला नाहीये. सामाजिक वातावरण शांततेचे आहे. कोविडोत्तर काळात जागतिक पर्यटकांचा भारताकडील ओढा वाढत चालला आहे. या सर्व सकारात्मक प्रवाहांना ठेच पोहोचवण्याचा उद्देशही अशा हल्ल्यांमागे असतो. पाकिस्तान या माध्यमातून भारतात अस्थिरता, अशांतता आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करतो. गेल्या दहा वर्षांमध्ये भारतात थेट विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जगभरातील गुंतवणूकदारांसाठी भारत हा पसंतीचा देश ठरत आहे. याचे कारण भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणारा देश आहे. भारतात भक्कम सरकार आहे, भारतात स्थैर्य आहे, शांतता आहे, दहशतवादमुक्त देश आहे. या गोष्टी गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. अशा परिस्थितीत अशांतता, अस्थिरता निर्माण करून ही गुंतवणूक कमी कशी करता येईल असा पाकिस्तानचा प्रयत्न असतो. यासाठी अनेक दहशतवाद्यांना पाकिस्तान पोसत आला आहे. इतकेच नव्हे तर रियासीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे निवृत्त लष्करी अधिकारी समाविष्ट होते, अशी माहितीही पुढे आली होती. पहलगामच्या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी लष्करी गणवेश परिधान केले असल्याने लोकांची दिशाभूल झाली. यासाठी त्यांनी पूर्णतः पाळत ठेवली होती. यावरुन हे दहशतवादी माथी भडकावलेले नवतरुण नव्हते, तर ते अत्यंत प्रशिक्षित आणि सराईत होते हे स्पष्ट होते.
या सर्व पार्श्वभूमीवर भारताला अत्यंत विचारपूर्वक प्रत्युत्तर द्यावे लागणार आहे. आगामी अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करावा लागणार आहे. तसेच काश्मीरमधील ह्युमन इंटेलिजन्स वाढवावा लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तेथे कार्यरत असणार्‍या स्लीपर सेल्सना शोधून त्यांच्या मुसक्या आवळाव्या लागणार आहेत. अर्थातच हे आव्हान खूप मोठे आहे. कारण पहलगामचा भाग हा डोंगराळ आहे. तेथील शेतांवर अनेकांची घरे असतात. त्यात तळघरे असतात. तेथे या स्लीपर सेल्सना जागा दिली जाते, तेथे त्यांची ऑपरेशन्स चालतात. त्यामुळे स्थानिकांचा सहभाग हा यातील कळीचा मुद्दा आहे. हे आव्हान पेलण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत मोलाची ठरू शकते.
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या माध्यमातून भारताच्या सहनशक्तीची परीक्षा घेत आहे. अशा प्रकारचे छोेटे-मोठे हल्ले केल्यानंतर भारत त्याबाबत काय अ‍ॅक्शन घेतो, कशा प्रकारे प्रतिक्रिया देतो याची चाचपणी करत आहे. या माध्यमातून पाकिस्तान भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन भारताने एखादी कारवाई करावी आणि त्यावरुन जगभरामध्ये भारताविरुद्ध वातावरण निर्माण करण्याची संधी मिळावी, हाही यामागचा एक उद्देश आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अण्वस्रधारी देश असल्याने या दोघातील संघर्षाची झळ संपूर्ण दक्षिण आशियाला बसू शकते, याची चिंता जगभरात असते. त्यामुळे अशा घटनानंतर आपोआपच काश्मीरचा प्रश्न जागतिक पटलावर चर्चेत येतो. तथापि, अशा हल्ल्यांमधून केंद्रातील सरकार हे कमकुवत आहे, असा संदेश जाऊ नये यासाठी याविरोधात ठोस कारवाई गरजेची आहे. -डॉ. शैलेंद्र देवळाणकर,संरक्षण व परराष्ट्र धोरण विश्लेषक

Check Also

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …