महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर महायुतीच्या रथाचे घोडे चौखूर उधळणे स्वाभाविक होते. महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अतिउत्साहात येणे साहजिकच होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर गोपनीय संवाद कार्यक्रमात महायुतीच्या आमदारांना निमंत्रित केले होते. मोदी यांनी या नवनिर्वाचित आमदारांना आणि राज्यातील ज्येष्ठांनाही गोपनीय मंत्र देण्याचे ठरविले होते. स्वत: मोदी यांनी बैठकीतील कोणतीही चर्चा माध्यमांपर्यंत पोहोचू नये, म्हणून पुरेपूर काळजी घेण्याचे आदेश भाजपच्या महाराष्ट्र शाखेला दिले होते. संवाद बैठकीमध्ये आमदारांना त्यांचा भ्रमणध्वनी नेण्यासही मज्जाव होता. तरीही उत्साही आमदारांनी मोदींचा गोपनीय गुरुमंत्र माध्यमांपर्यंत सविस्तरपणे पोहोचविल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सकाळी दहा वाजता बैठकीसाठी पोहोचलेल्या आमदारांची शाळा हेडमास्तर मोदी गुरुजींनी घेतली. व्यासपीठावर मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित होते. आमदारांची शाळा घेताना मोदी यांनी सर्वच आमदारांना केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने मतदारसंघात आढावा घेण्याची सूचना केली. या संवाद कार्यक्रमात धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उपस्थित का नव्हते, याचे नेमके कारण समजू शकले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या काही आमदारांनी अजितदादांची पूर्वपरवानगी घेऊन या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. कदाचित मोदी यांनीच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तसेच यापूर्वी घोटाळ्यात अडकलेल्या आमदारांना बैठकीपासून दूर ठेवण्याची सूचना दिली असण्याची शक्यता आहे. काम करीत असताना कुटुंबाकडेदेखील लक्ष देण्याची सूचना मोदींनी केली. घरामध्ये जर वीस वर्षांची मुलगी असेल तर तिलाही काही वेळ द्या, असा कानमंत्र त्यांनी दिला. सार्वजनिक जीवनात कितीही व्यस्त असलात तरी कुटुंबीयांसाठी वेळ दिलाच पाहिजे, ही बाब पंतप्रधानांनी आमदारांच्या निदर्शनास आणली. सर्व कामे करीत असताना आरोग्याकडेही लक्ष द्या आणि त्यासाठी दररोज योग, प्राणायाम जरुर करा, असा प्रेमळ सल्लाही दिला. मोदी यांची ही शाळा वरवर खेळीमेळीची आणि मार्गदर्शन करणारी दिसत असली तरी प्रत्यक्षात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणे हेदेखील ध्येय असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांच्याबाबत गौरवोद्गार काढून मोदी यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील विस्तारित महायुतीचे सूतोवाच केले आहे. त्याशिवाय पाच वर्षांनी म्हणजे 2029 मध्ये राज्यात शतप्रतिशत भाजपची सत्ता यायला हवी, असा कानमंत्रही त्यांनी जाता जाता देवाभाऊंना दिला असावा.
Check Also
वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था
देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …
पांचजन्य वृत्तपत्र