ऑटोबर महिना येताच जगभराचे लक्ष नोबेल सन्मानाकडे जाते. स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या दुरगामी विचारातून सुरू झालेले नोबेल पुरस्कार आजही मानवतेसाठी सर्वोत्तम योगदानाचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी विज्ञान, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करणार्या व्यक्तीला नोबेल सन्मान दिला जातो. पण भारताचा विचार येतो तेव्हा सुमारे दीड अब्ज लोकसंख्येचा प्रतिभावान देश केवळ नऊ नोबेल सन्मानापुरताच मर्यादित का राहिला आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. वास्तविक भारताने प्रत्येक क्षेत्रात स्वत:ची छाप पाडली आहे. जागतिक कंपन्यांच्या वरिष्ठ पदावर भारतीय नागरिक विराजमान आहेत. आपल्या शास्त्रज्ञांचा डंका चोहीकडे वाजत आहे. तंत्रज्ञानापासून ते साहित्यापर्यंत भारतीयांची कामगिरी अधोरेखित झाली आहे. अशा वेळी नोबेलसारख्या सर्वोच्च सन्मानाचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा आपण कोठेच दिसत नाही. त्यातही आपली नावे फार कमी दिसतात. अशा स्थितीत या सन्मानाकडे आपण गांभीर्याने पाहत नाही का किंवा या सन्मानासाठी आवश्यक असणारी चिकित्सक, संशोधक वृत्ती कमी झाली की काय? असे वाटल्याशिवाय राहत नाही.
भारताशी संबंधित नऊ जणांना आतापर्यंत नोबेल पुरस्कार मिळाला आहे. १९१३ मध्ये रविंद्रनाथ टागोर यांनी साहित्य श्रेणीत आशियातील पहिला नोबेल सन्मान मिळवत इतिहास घडविला. यानंतर थोर शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्र विषयात ‘रामन इफेट आणत विज्ञानाला नवीन दिशा दिली. या कार्याची दखल घेत १९३० मध्ये नोबल पुरस्कार जाहीर करण्यात आला. अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्रात ‘कॅपेबिलिटी अॅप्रोच’च्या सिद्धांताच्या आधारे विकासाला मानवी दृष्टीकोनातून चालना दिली. कैलास सत्यार्थी यांनी बाल हक्कासाठी संघर्ष करताना शांततेचे नोबेल प्राप्त केले. याशिवाय समाजसेविका मदर टेरेसा, हरगोविंद खुराणा, सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, वेंकटरमण रामकृष्णन आणि अभिजित बॅनर्जी यांनी देखील भारताचे नाव जागतिक पटलावर नेले. त्यांच्या कामगिरीबद्धल अभिमान व्यक्त केला जात असताना लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण खुपच कमी असल्याचे दिसून येते.
अमेरिकेकडे ४०० पेक्षा अधिक नोबेल आहेत. ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्सकडे देखील शंभरपेक्षा अधिक नोबेल आहेत. स्वीडनसारख्या लहान देशाने देखील ३५ नोबेल विजेत्यांची नोंद केली आहे. त्यामुळे आपल्या देशात शिक्षण, संशोधन आणि चिकित्सक वृत्ती हरविली आहे का किंवा भरकटली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. वास्तविक आपली शिक्षण व्यवस्था जिज्ञासावृत्ती नाही तर ‘हो ला हो’ चालना देणारी आहे. प्रश्न विचारणे काहीवेळा गुन्हा मानला जातो आणि निमूटपणे शिक्षण पद्धत स्वीकारण्याला शहाणपणाचे लक्षण समजले जाते. या कारणामुळेच आपल्याकडे प्रयोगशाळा वाढल्या असल्या तरी भरीव संशोधन होत नाही. आजही हजारो भारतीय शास्त्रज्ञ दर्जेदार संस्थेत संशोधन कार्य करतात. परंतु नोबेल सन्मानाची पातळी अद्याप गाठलेली नाही. शिवाय एवढेच कारण नाही तर भारतात प्रतिभावंताची कमतरता नाही, परंतु आपल्या प्रणालीत नाविण्यपूर्णतेच्या आधारावर जोखीम उचलण्याचे धाडस कोणी दाखवत नाही.
शास्त्रज्ञांचे यश हे केवळ पेपर प्रकाशित करणे किंवा पेटंटच्या संख्येतून पाहिले जात नाही तर त्याच्या संशोधनातून होते. मानवतेला दिशा देणारे संशोधन हा शास्त्रज्ञांच्या कार्याचा गौरव असतो. कोरोना लसीकरणापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचे सर्व संशोधन ऐतिहासिक आणि क्रांतिकारी ठरले. हे संशोधन पुरस्कारासाठी नाही तर कालचक्र पाहून वेळेच्या मागणीनुसार झाले आणि मानवतेचा आधार ठरले. अर्थात जिज्ञासा, चिकित्सक वृत्ती हा मानवी स्वभाव आहे. का आणि कशामुळे? या प्रश्नापासून मनुष्याची संशोधक वृत्ती सुरू होते. मात्र काहीवेळा शाळा आणि महाविद्यालयात सरांना प्रश्न विचारणे हे बेशिस्तपणाचे लक्षण मानले जाते. परिणामी आपण व्यावसायिक पातळीवर यश मिळवणारे शास्त्रज्ञ घडवत आहोत, पण नवखे, नाविण्यपूर्ण नाही. जिज्ञासावृत्ती ही केवळ विरुंगुळा नसून तो नवकल्पनांचा आधार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच आपल्याला शिक्षण प्रणाली ही प्रश्न विचारण्यास प्रेरित करणारी आणि संवादावर भर देणारी विकसित करावी लागेल.
संशोधनामध्ये संख्येपेक्षा मुलभूत तत्त्वांना अधिक महत्त्व द्यावे लागेल. आपल्या सरकारला आव्हानात्मक मात्र काळानुरुप संशोधनात गुंतवणूक वाढवावी लागेल. शिवाय मुलांचा आवाज दाबण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देण्याची शिकवण समाजाला द्यावी लागेल. नोबल सन्मान हा केवळ व्यक्तिगत कामगिरीचा गौरव नसून तो एखाद्या देशाची विचारसरणी आणि संशोधन संस्कृतीचा आरसा असतो. अमेरिका, ब्रिटन किंवा जर्मनीतील शेकडो विजेत्यांमागे अनेक दशकांपासूनची चिकित्सक प्रधान शिक्षण प्रणाली आणि संशोधनाला पाठिंबा देणारे धोरण कारणीभूत आहे.
२०४७ पर्यंत विकसित देश होण्याच्या दृष्टीने वाटचाल करताना विज्ञान, साहित्य आणि मानवतेच्या क्षेत्रात नवीन विचारांचे योगदान आपल्याला द्यावे लागेल. जोपर्यंत मुलांच्या मनात प्रश्न उपस्थित होत राहतील, तोपर्यंत भारताचे भविष्य उज्ज्वल राहिल. नोबेल सन्मान हा एखाद्याच्या आयुष्यात मैलाचा दगड असला तरी जिज्ञासा वृत्ती ही वायफळ गोष्ट नसून ती एक नामी संधी आहे, असे समजणारा समाज या सन्मानाला खरा पात्र आहे. भारताला नोबेल मिळवायचा असेल तर केवळ प्रयोगशाळा किंवा विद्यापीठाची उभारणी करून चालणार नाही तर विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्याची मोकळीक द्यावी लागेल आणि त्याच्या शंकांचे निरसनही करावे लागेल. मग तो सुदिन दूर राहणार नाही. प्रश्न विचारण्याचे धाडस निर्माण करणारी संस्कृती ही भविष्यकाळात जगासाठी आदर्शवत ठरू शकते.-विनायक सरदेसाई
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र